अल्प बचत योजनेचे व्याजदर 'जैसे थे'!

वृत्तसंस्था
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

यंदाच्या वर्षी जुलै ते सप्टेंबर या तिमाहीकरीता 0.1 टक्क्यांची कपात करण्यात आली होती. 

नवी दिल्ली : केंद्र सरकारने तिसऱ्या तिमाहीसाठी अल्पबचत योजनांचे व्याजदर 'जैसे थे' ठेवले आहेत.  

जुलै ते सप्टेंबर २०१९ या तिमाहीसाठी असलेलेच व्याजदर आता ऑक्टोबर ते डिसेंबर २०१९ या कालावधीसाठी कायम राहतील. आज रात्री यासंदर्भात परिपत्रक जारी करण्यात आले.

अल्पबचत योजनांमध्ये सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (पीपीएफ), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी), किसान विकास पत्र (केव्हीपी), मासिक प्राप्ती योजना (एमआयएस), आवर्ती ठेव (आरडी) आदी योजनांचा समावेश आहे. 

अल्पबचत योजनांवरील व्याजदराचा तिमाही आढावा घेण्यात येतो. उद्यापासून (१ आॅक्टोबर) सुरू होणाऱ्या नव्या तिमाहीसाठी 'पीपीएफ'चा वार्षिक व्याजदर 7.9 टक्के असेल. पाच वर्षीय 'एनएससी'चा व्याजदरही तेवढाच असेल. 'केव्हीपी'वर 7.6 टक्के व्याज दिले जात असून, यातील गुंतवणूक 113 महिन्यांत दामदुप्पट होणार आहे.

निवृत्तीधारकांमध्ये लोकप्रिय असलेल्या 'एमआयएस'वर 7.6 टक्के व्याज दिले जात आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या बचत योजनेवर (एससीएसएस) 8.6, तर खास मुलींसाठीच्या सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर 8.4 टक्के राहणार आहे. 

याआधी सप्टेंबर 2016 मध्ये व्याजदरात कपात करण्यात आली होती. जुलै 2018 मध्ये व्याजदर तत्कालिन परिस्थितीनुसार 'जैसे थे' ठेवण्यात आले होते. त्याचवर्षी सप्टेंबर महिन्यात 0.4 टक्के वाढ करण्यात आली होती.

त्यानंतर यंदाच्या वर्षी जुलै ते सप्टेंबर या तिमाहीकरीता 0.1 टक्क्यांची कपात करण्यात आली होती. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या :

- ... यासाठी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना पाकने दिले निमंत्रण!

- उपचारासाठी बुमरा जाणार लंडनला 

- Vidhan Sabha 2019 : पश्चिम महाराष्ट्रात भाजपमधील पहिली बंडखोरी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Not any changes in the interest rate of a small savings scheme by central government