पोर्टफोलियोच्या फेरसंतुलनाच्या ताणातून मुक्तता हवीय?

पोर्टफोलियोच्या फेरसंतुलनाच्या ताणातून मुक्तता हवीय?

दीर्घ मुदतीत संपत्तीनिर्माणाचा प्रवास आपण सुरू केला असल्यास, योग्य पद्धतीने ‘अ‍ॅसेट ॲलोकेशन’ अर्थात मालमत्ता विभाजन केलेले असणे, ही त्या प्रवासातील अत्यावश्यक गोष्ट ठरते. तथापि, यशस्वी गुंतवणुकीच्या मार्गावरील सर्वांत मोठे अडसर म्हणजे लोभ आणि भीती. हे अडसर वाटेत आडवे आल्यास, गुंतवणूकदार ठरलेली वाट सोडून भरकटत जातो. या आव्हानाचा सामना करण्यासाठी भारतातील म्युच्युअल फंड उद्योगाने ‘ॲसेट ॲलोकेशन’ योजना प्रस्तुत केल्या आहेत. या योजनांमध्ये गुंतविलेला पैसा बहुविध मालमत्ता पर्यायांमध्ये योग्य त्या प्रमाणात विभागलेला असतो. त्या त्या वेळी ज्या मालमत्ता वर्गात संधी असेल, तिचा विनाविलंब लाभ घेण्याचा या योजनांचा प्रयत्न असतो.

कोणत्याही दीर्घ मुदतीच्या गुंतवणूक नियोजनात या फंडांच्या सहभागाची तीन ठोस कारणे अशी -

१) मालमत्ता वाटपाच्या अंगाने वेगवान दृष्टिकोन

२) एक छत्र उपाययोजना - या फंडातून समभाग, रोखे आणि सोने या सारख्या मालमत्ता वर्गांमध्ये गुंतवणूक होत असल्याने, गुंतवणूकदारांना एकाच योजनेतून त्या त्या वेळी बहरात असलेली गुंतवणूक साधता येते.

३) पोर्टफोलियोच्या फेरसंतुलनाच्या ताणातून मुक्तता - आवश्यकतेनुसार पोर्टफोलियोचा फेरआढावा घेऊन त्याची पुनर्रचना नियमितपणे करणे गरजेचे असते. मात्र, अ‍ॅसेट ॲलोकेशन फंडातील गुंतवणुकीमुळे या ताण व काळजीतून गुंतवणूकदारांना मोकळीक मिळते. निधी व्यवस्थापकाचे पोर्टफोलियोवर बारीक लक्ष असते आणि तोच आवश्यक त्यावेळी व संधी मिळेल त्याप्रमाणे पोर्टफोलियोचे फेरसंतुलन करीत असतो. हे तो पूर्ण अभ्यासाअंती करतो, त्यामुळे गुंतवणुकीला असलेला भावनेचा पदर आड येण्याचाही संभव नसतो. या शिवाय, असे फेरसंतुलन गुंतवणूकदाराने व्यक्तिश: करायचे म्हटले तरी प्रत्येक विक्री व्यवहाराला अल्प मुदतीच्या किंवा दीर्घ मुदतीच्या भांडवली लाभ कराचा आणि खर्चाचा पैलू निश्चितच राहतो. पण हीच गोष्ट निधी व्यवस्थापकांकडून केली गेल्यास गुंतवणूकदारांवर कराचा बोजा येण्याची भीती बाळगण्याचे कारण राहणार नाही, उलट रोखे गुंतवणुकीला मिळणाऱ्या कर-कार्यक्षमतेचा लाभही मिळेल.

सारांशात, या फंडातील गुंतवणुकीतून गुंतवणूकदाराला त्याचा पोर्टफोलिओ फेरसंतुलित करून मिळण्यासह, गुंतवणुकीला प्रभावीरीत्या कर-कार्यक्षमही बनविता येईल.

फंडाची कामगिरी
कामगिरीची बाब स्पष्ट करायची झाल्यास, याच वर्गवारीतील आयसीआयसीआय प्रुडेन्शियल अ‍ॅसेट ॲलोकेटर फंडाच्या कामगिरीची सातत्यपूर्णता उदाहरण म्हणून सांगता येईल. गेल्या एका वर्षात, समभागसंलग्न गुंतवणुकीत घट होऊनही या फंडाने १४.४ टक्के दराने परतावा निर्माण केला आहे, त्याच वेळी फंड वर्गवारीचा एकूण सरासरी परतावा ११.९४ टक्के इतका आहे. तीन वर्षे, पाच वर्षाच्या कालावधीतही या फंडाने वार्षिक सरासरी अनुक्रमे १०.९ टक्के आणि १२.३ टक्के परतावा देऊन या वर्गवारीत अव्वल कामगिरी साधली आहे.

(लेखक पेलिकन इन्व्हेस्टमेंटसचे संचालक आहेत.)
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com