
देशातील रिटेल व्यवसायाचा चेहरामोहरा लवकरच बदलण्याची शक्यता असून रिलायन्स आणि अमेझॉन अशी नवी आर्थिक भागीदारी या क्षेत्रामध्ये पाहायला मिळू शकेल.
नवी दिल्ली - देशातील रिटेल व्यवसायाचा चेहरामोहरा लवकरच बदलण्याची शक्यता असून रिलायन्स आणि अमेझॉन अशी नवी आर्थिक भागीदारी या क्षेत्रामध्ये पाहायला मिळू शकेल. मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने अमेझॉनला रिलायन्स रिटेल व्हेंचर लिमिटेडमधील (आरआरव्हीएल) २० अब्ज डॉलरचे (१.४७ लाख कोटी) समभाग खरेदी करण्याची ऑफर देऊ केली आहे. हा करार प्रत्यक्षात आल्यास रिलायन्स तिच्या रिटेल क्षेत्रातील उपकंपनीमधील ४० टक्के एवढा वाटा अमेझॉनला देऊ करेल.
अमेझॉनने रिलायन्सच्या रिटेल व्यवसायामध्ये गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली असून कंपनीच्या प्रवक्त्याने मात्र हा मुद्दा धोरणात्मक असल्याने त्यावर आताच भाष्य करणे योग्य होणार नसल्याचे सांगत या मुद्द्यावर सविस्तर बोलणे टाळले. रिलायन्स आणि अमेझॉनमध्ये हा करार झाल्यास तो आतापर्यंतचा सर्वांत मोठा करार असेल अशी माहिती सूत्रांनी दिली.
हे वाचा - भारतासमोरील आर्थिक संकट आणखी काही काळ कायम
अंबानींचे वर्चस्व
देशातील रिटेल व्यवसाय एकहाती ताब्यात घेण्याचा मुकेश अंबानी यांचा विचार असून त्यासाठीच त्यांनी अमेझॉनसोबत भागीदारी करण्याची तयारी चालविली आहे. अमेरिकेतील वॉलमार्ट देखील रिलायन्ससोबत भागीदारी करण्यास अनुकूल असल्याचे बोलले जाते. याआधी वॉलमार्टने २०१८ साली ई- कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टची खरेदी केली होती.