दिवाळीत खरेदी करा स्वस्त सोनं; सरकारने सुरू केली योजना

सकाळ वृत्तसेवा
Monday, 9 November 2020

फिजिकल गोल्डच्या तुलनेत डिजिटल गोल्डमधील गुंतवणूक सध्याच्या काळात योग्य राहील. डिजिटल गोल्डची किंमत कमी, गुंतवणूक करणं सहज शक्य असते आणि रिटर्न चांगला मिळतो. 

नवी दिल्ली - धनत्रयोदशीच्या (Diwali 2020) आधी पुन्हा एकदा स्वस्तात सोनं खऱेदी (Gold ) करण्याची संधी मिळत आहे. सरकारने स्वर्ण बाँड योजना  2020-21 गुंतवणुकीसाठी 9 ते 13 नोव्हेंबर 2020 या कालावधीत उघडली आहे. सोमवारपासून स्वर्ण बाँड योजनेत गुंतवणूक करता येणार आहे. सॉवरेन गोल्ड बाँडसाठी सरकारने 5 हजार 177 रुपये प्रति ग्रॅम इतकी किंमत निश्चित केली आहे. तज्ज्ञांनी म्हटलं की, फिजिकल गोल्डच्या तुलनेत डिजिटल गोल्डमधील गुंतवणूक सध्याच्या काळात योग्य राहील. डिजिटल गोल्डची किंमत कमी, गुंतवणूक करणं सहज शक्य असते आणि रिटर्न चांगला मिळतो. 

ऑनलाइन सॉवरेन गोल्ड बाँडमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना प्रति ग्रॅम 50 रुपयांची सूट दिली जाईल. तसंच ऑनलाइन गुंतवणूकदारांसाठी प्रति ग्रॅम किंमत 5 हजार 127 रुपये असेल. याआधी 12 ते 16 ऑक्टोबरदरम्यान गुंतवणूक खुली करण्यात आली होती. त्यामध्ये सोन्याची किंमत 5 हजार 51 रुपये प्रति ग्रॅम इतकी होती. 

गुंतवणूक करण्याआधी समजून घ्या
भारत सरकारकडून भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे सॉवरेन गोल्ड बाँड 2020-21 जारी केले जात आङेत. गुंतवणूकदार 1 ग्रॅम पासून सुरुवात करू शकतात. या योजनेंतर्गत एका आर्थिक वर्षात कोणतीही व्यक्ती जास्ती जास्त 4 किलोग्रॅम पर्यंत गोल्ड बाँड खरेदी करू शकते. हीच मर्यादा एखाद्या संस्थेसाठी 20 किलोपर्यंत आहे.  सरकारकडून गोल्ड बाँडमध्ये कऱण्यात आलेल्या गुंतवणुकीवर 2.5 टक्के वार्षिक व्याजही दिलं जातं. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, फिजिकल गोल्डच्या तुलनेत गोल्ड बाँड मुदत संपेपर्यंत ठेवल्यास त्याचा गुंतवणूकदारांना फायदा होतो. गोल्ड बाँडच्या मॅच्युरिटीचा कालावधी आठ वर्षांचा असतो मात्र तो पाच वर्षांनंतरही काढता येतो. 

हे वाचा - Gold prices:सोने-चांदीच्या दरात वाढ; दिवाळीच्या मुहूर्तावर खरेदीसाठी गर्दी

गोल्ड बाँड खरेदी करण्यासाठी बँक, बीएसई, एनएसईचे संकेतस्थळ किंवा पोस्ट ऑफिसमध्ये संपर्क करावा लागेल. याठिकाणी डिजिटल पद्धतीने गोल्ड बाँड खरेदी करता येतात. ही एक सुरक्षित गुंतवणूक आहे काऱण यामध्ये शुद्धता किंवा सुरक्षितता यांची चिंता नसते. सरकारने फिजिकल गोल्डची मागणी कमी करण्याचं लक्ष्य ठेवून नोव्हेंबर 2015 मध्ये ही योजना सुरू केली होती. योजनेची सुरुवात करण्यात आली होती तेव्हा गुंतवणूकदारांना सोनं 2 हजार 684 रुपये प्रति ग्रॅमने देण्यात आलं होतं. आता एखाद्याने पाच वर्षांपूर्वी गोल्ड बाँड खरेदी केला असेल तर त्याला आजच्या दरानुसार जवळपास दुप्पट पैसे मिळतील. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sovereign-gold-bond-scheme-buy cheaper gold know scheme