esakal | विजेअभावीही 'शाॅक' देत रुग्णांची ह्रदयक्रिया पूर्ववत करणारी 'जीवट्राॅनिक्स' स्टार्टअप
sakal

बोलून बातमी शोधा

Jeevtronic Startup

विजेअभावीही 'शाॅक' देत रुग्णांची ह्रदयक्रिया पूर्ववत करणारी 'जीवट्राॅनिक्स' स्टार्टअप

sakal_logo
By
सलील उरुणकर

ह्रदयाची क्रिया अचानक बंद पडल्यानंतर रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी डाॅक्टर किंवा वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी 'शाॅक ट्रिटमेंट' दिल्याचे आपण अनेक चित्रपटांमध्ये आपण पाहिले असेल. पण हे जे शाॅक देण्याचे उपकरण (डिफिब्रिलेटर किंवा डिफायब्रिलेटर - defibrillator) आहे ते अजूनही भारतामध्ये विशेषतः ग्रामीण भागात सहजासहजी उपलब्ध नाही. त्यामुळे अनेक रुग्णांना अल्पावधीत उपचार मिळत नाहीत आणि ते दगावतात. वैद्यकीय क्षेत्रातील उपकरणांच्या बाबतीतील ही उणिव लक्षात घेत आशिष गावडे आणि अनिरुद्ध अत्रे या दोघांनी जीवट्राॅनिक्स या त्यांच्या स्टार्टअपच्या माध्यमातून भरीव काम केले आहे. (Startup Jeevtronics’ product is critical care intervention for masses)

शाॅक कशासाठी द्यायचा?

ह्रदयामध्ये सिनो-अॅट्रियल नोड (sino atrial node - SAN) असते जेथे ह्रदयाच्या ठोक्यांसाठी आवश्यक असलेली विद्युत शक्तीची निर्मिती होते. रक्ताभिसरणाची क्रिया सुरळितपणे पार पाडण्यासाठी हे नोड ह्रदयाला मदत करते. थोडक्यात हे नोड म्हणजे नैसर्गिक पेसमेकर आहे. ह्रदयाची क्रिया अचानक बंद पडल्यानंतर रुग्ण क्षणार्धात गंभीर अवस्थेत जातात. त्यांना वाचविण्यासाठी म्हणजेच ह्रदयाचे ठोके पूर्ववत करण्यासाठी, ह्रदयाची क्रिया पुन्हा सुरू करण्यासाठी लागणारी विद्युत शक्तीच्या निर्मितीसाठी डिफिब्रिलेटर उपकरणाद्वारे शाॅक दिला जातो. पण हा शाॅक पहिल्या दहा मिनिटाच्या कालावधीतच देणे गरजेचे असते.

हेही वाचा: राकेश झुनझुनवालांची मोठी घोषणा; माफक दारातील विमान कंपनी करणार सुरु

छोट्या रुग्णालयांची गरज

डिफिब्रिलेटर हे अँब्युलन्स आणि अतिदक्षता विभाग (आयसीयू) या दोन ठिकाणी लागणारे खूप महत्त्वाचे उपकरण आहे. महाग असल्यामुळे असे उपकरण सर्वत्र सहजरित्या उपलब्ध नाहीत. त्यामुळे, अन्य देशांच्या तुलनेत भारतामध्ये तीन ते चार पटी अधिक रुग्ण दगावल्याचे आकडेवारी सांगते. जागतिक निकषांप्रमाणे तीन आयसीआयू बेड्समागे एक डिफिब्रिलेटर असणे गरजेचे आहे, मात्र भारतात त्याचे प्रमाण ५० किंवा १०० बेड्समागे एक एवढे कमी आहे.

ग्रामीण भागात त्याची गरज अधिक भासत आहे. तसेच, उपकरण असले तरी अनेक भागात वीज पुरवठा सुरळित असेलच याची खात्री नाही. ही सगळी परिस्थिती आशिष आणि अनिरुद्ध यांनी २०१३ मध्ये अनुभवली आणि वीज पुरवठ्यावर अवलंबून नसलेले तसेच स्वस्त असे डिफिब्रिलेटर बनविण्याचा निश्चय केला. मूलभूत विज्ञानाच्या नवसंकल्पनेवर आधारित असलेल्या त्यांच्या उपकरणाला एक दांडा (हँडल) आहे (hand-cranked defibrillator) जो हाताने १५ सेकंद फिरविल्यास रुग्णाला बाय-फेसिक शाॅक डिलिव्हर केला जाऊ शकतो.

हेही वाचा: सुकन्या समृद्धी योजना मुलींसाठी चांगली; गुंतवणूक करण्याचे आहेत अनेक फायदे

स्टार्टअप संस्थापकांविषयी

आशिष गावडे आणि अनिरुद्ध अत्रे हे दोघेही बालमित्र. लोणावळ्यातील मनशक्ती केंद्रातील साधक. आशिष यांनी उद्योग-व्यवसायात उतरण्यापूर्वी टाटा मोटर्स, कमिन्स इंडिया आणि अमेरिकेतील फोर्ड मोटर कंपनी येथे नोकरी केली. तर, अनिरुद्ध हे प्रा. सी के प्रल्हाद यांचे शिष्य असून सिस्टिम्स इंजिनिअरिंग, इलेक्ट्राॅनिक्स व मेकॅनिकल इंजिनिअरिंग क्षेत्रातील दोन दशकांहून अधिक काळाचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे.

उच्चशिक्षण व नोकरीनिमित्त अमेरिकत असलेल्या आशिष हे २००६ मध्ये भारतात परतले. मनशक्ती केंद्रातील स्वामी विज्ञानानंद यांच्याकडून प्रेरणा घेत त्यांनी ग्रामीण भारतातील लोकांसाठी काम करण्याचे ठरविले. पुण्या-मुंबईपासून जवळ असलेल्या गावांसह अन्य ग्रामीण भागांमध्ये ते फिरले. बाॅटम आॅफ पिरॅमिड एनर्जी अँड एन्व्हायरन्मेंटल इनोव्हेशन या नावाने त्यांनी कंपनी सुरू केली. पर्यावरणपूरक ऊर्जा उपकरणांद्वारे ग्रामीण भागामध्ये वीज पुरविण्याचा त्यांचा विचार होता. त्यांनी चक्र नावाने पेडल जनरेटर विकसित केला, मात्र त्यानंतर सौर ऊर्जेवर आधारित दिवे स्वस्तात उपलब्ध होऊ लागल्याने त्यांच्या उत्पादनाची मागणी घटली. ज्ञानप्रबोधिनीच्या सहाय्याने त्यांनी प्रखर नावाचे दिवे तयार केले. हा व्यवसाय करत असतानाच, विजपुरवठ्याअभावी ग्रामीण भागात निर्माण होणाऱ्या अन्य प्रश्नांकडे त्यांचे लक्ष वेधले गेले. डिफिब्रिलेटर उपकरणांचा अभाव त्यांच्या निदर्शनास आला. दरम्यान, २०१० मध्ये अनिरुद्धही भारतात परतले होते.

ऑगस्ट २०१३ मध्ये आशिष आणि अनिरुद्ध यांनी जीवट्राॅनिक्स ही कंपनी पुण्यातील कर्वेनगर येथे स्थापन केली. वीज तसेच विजेअभावी हाताने दांडा फिरविल्यानंतर चालणारा सन्मित्र १००० एचसीटी हे डिफिब्रिलेटर यंत्र त्यांनी विकसित केले. हे उपकरण प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात ठेवता येते. तसेच अँब्युलन्समध्ये वापरण्यासाठी योग्य असलेले जीवट्राॅनिक्स सन्मित्र १००० एचसीटी ईएमएस हे उपकरणही त्यांनी विकसित केले. या उपकरणांची चाचणी एआरएआय या संस्थेत केली असून परदेशी कंपन्यांच्या तुलनेत अत्यल्प किमतीत ते उपलब्ध करून देण्यात आले आहे.

हेही वाचा: Paytmमध्ये नोकरीची संधी! 20,000 Sales Executivesची मेगा भरती

आशिष म्हणाले, "आतापर्यंत आम्ही भारतामध्ये २०० उपकरणांची विक्री केली आहे तर आफ्रिकेत दोन उपकरणांची विक्री झाली आहे. यामध्ये बहुतांश छोटी रुग्णालये (५ ते ५० बेड्स क्षमतेची) आहेत जे पहिल्यांदाच असे उपकरण खरेदी करू शकले. जीवट्राॅनिक्सच्या डिफिब्रिलेटर उपकरणाद्वारे एकूण १६००० पेक्षा अधिक वेळा शाॅक डिलिव्हर केला जाऊ शकतो व हे आंतरराष्ट्रीय मानकांच्या तुलनेत चार पटीने अधिक आहे. उत्पादन निर्मितीसाठी आतापर्यंत कर्ज आणि अनुदानाच्या माध्यमातून एकूण ६ कोटी रुपयांचा निधी उभारण्यात आला आहे."

कोव्हिड रुग्णांसाठीही वरदान

आशिष आणि अनिरुद्ध म्हणाले, "वापरण्यास सुलभ असल्यामुळे नर्स, अन्य वैद्यकीय कर्मचारीही आमचे उपकरण सहजपणे वापरतात. कोव्हिड रुग्णांमध्ये (१७ टक्के) ह्रदयाच्या ठोक्यांची ताल असामान्य असल्याचे आढळून येते. काही औषधांच्या वापरामुळे हा धोका अधिक असतो. अचानक कार्डिअॅक अरेस्टचा धोका असल्यामुळे अशा रुग्णांसाठी प्रत्येक कोव्हिड हाॅस्टिपलमध्ये डिफिब्रिलेटर उपकरण असणे गरजेचे होते. महाराष्ट्र, छत्तीसगड आणि राजस्थानमधील कोव्हिड सेंटर्समध्ये जीवट्राॅनिक्सचे ६० डिफिब्रिलेटर बसविण्यात आले आहेत. यामध्ये एम्स नागपूरचाही समावेश आहे.”

loading image
go to top