मी, ‘सेन्सेक्स’ ५० हजारी!

सुहास राजदेरकर
Friday, 22 January 2021

आज सर्वजण माझं कौतुक करत आहेत, कारण माझं मूल्य ५०,००० झालं...

आज सर्वजण माझं कौतुक करत आहेत, कारण माझं मूल्य ५०,००० झालं...

एक जानेवारी १९८६ रोजी जेव्हा माझा जन्म झाला, तेव्हा माझं मूळ वर्ष १९७९ आणि मूळ मूल्य १०० ठरवण्यात आलं.  तेव्हा कुणाचाही विश्वास बसला नसता, की मी ५० हजारी होईन. तब्बल ४२ वर्षानंतर हे शक्य झालं. सुरुवातीला माझी फार उपेक्षा झाली. मला 

नावं ठेवली जात, की मी एक ‘जुगार’ आहे. परंतु कालांतरानं, जेव्हा इतर गुंतवणूक पर्यायांवरचा परतावा ६ टक्क्यांपेक्षा खाली आला आणि खूपशा नियामक सुधारणा झाल्या, तेव्हा माझं महत्त्व लोकांच्या लक्षात येऊ लागलं. आजही फक्त ३ ते ४ टक्के लोकंच माझ्यावर विश्वास ठेवतात. ‘हर्षद मेहता प्रकरणा’पासून ते ‘कोरोनाच्या महासाथी’पर्यंतचे अनेक धक्के मी पचवले आणि त्यातून सावरत पुन्हा ताठ मानेने उभा राहिलो.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आज मला सांगायला आनंद होत आहे, की आजच्या तारखेला, मागील ४२ वर्षांत मी सर्वांपेक्षा जास्त म्हणजेच, दरवर्षी १६ टक्के इतका घसघशीत परतावा दिला आहे. अर्थात, ज्यांनी १९७९ मध्ये माझ्यात १००० रुपये गुंतवले असतील, त्यांचे आज ५ लाख रुपये झाले आहेत. २०१४ पासून १२ टक्क्यांप्रमाणे ६ वर्षांतच मी दुपटीने वाढलो. मी काळाप्रमाणे बदलतसुद्धा गेलो. सुरवातीला असलेल्या ३० शेअरपैकी मी आतापर्यंत २६ शेअर बदलले. फक्त ४ शेअर अजूनही कायम आहेत आणि ते म्हणजे हिंदुस्थान युनिलिव्हर, आयटीसी, लार्सन अँड टुब्रो आणि महिंद्रा अँड महिंद्रा.

1 हजार ते 50 हजारांचा प्रवास; सेन्सेक्सची ऐतिहासिक उसळी तर BSE सांगितले महत्त्वपूर्ण आकडे

माझं भवितव्य काय?
२०१४ मध्ये जेव्हा मी २५,००० अंशांचा टप्पा पार केला, तेव्हा ‘खूप झाले’ म्हणून लोकांनी माझ्यातले पैसे काढून घ्यायला सुरवात केली. आजही तसंच काहीसे घडतंय का? समजा २०२६-२७ पर्यंत माझं मूल्य १ लाख झालं तर? फार नाही, १२ टक्केच परतावा गृहीत धरला आहे. आजही फक्त परकी गुंतवणूकदारांच्या भरवशावर मी वाढणार आहे का? भारतात मागील ६ वर्षांत इतक्या चांगल्या गोष्टी घडल्या आहेत, की पुढील १० वर्षे तरी भारताचीच राहतील, यात शंका का वाटायला हवी? 

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठे बदल, जाणून घ्या आजचे दर

या साऱ्या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडं नाहीत; परंतु तुमच्यासारख्या सूज्ञ लोकांकडं ती असली पाहिजेत. अमेरिका जोपर्यंत व्याजदर वाढवत नाही, तोपर्यंत मी फार पडेन, असं वाटत नाही. शेअर घेताना कदाचित तुमच्या चुका झाल्या असतील (बहुतेकांच्या होतात), तर हीच योग्य वेळ नाही का त्या चुका सुधारून चांगल्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याची? आणि समजा, तुम्हाला माझ्यावर विश्वास असेल; पण शेअर बाजाराची भीती वाटत असेल, तर म्युच्युअल फंडांच्या ‘इंडेक्स योजना’ आहेतच की गुंतवणुकीसाठी... तेव्हा बघा, मला साथ द्यायची का ते!      

चला तर, पुन्हा भेटू ७५,००० आणि १,००,००० अंशांच्या टप्प्यांवर... तोपर्यंत या सर्व प्रवासात माझ्याबरोबर राहिल्याबद्दल धन्यवाद!

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Suhas Rajderkar Writes about Sensex