नियम व्याजदराच्या गुरुत्वाकर्षणाचा

अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने महागाईला नियंत्रणात ठेवण्यासाठी गेल्या आठवड्यात व्याजदरात वाढ केली.
US Federal Reserve raises interest rates last week to keep inflation in check investor share market
US Federal Reserve raises interest rates last week to keep inflation in check investor share market sakal
Summary

अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने महागाईला नियंत्रणात ठेवण्यासाठी गेल्या आठवड्यात व्याजदरात वाढ केली.

अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने महागाईला नियंत्रणात ठेवण्यासाठी गेल्या आठवड्यात व्याजदरात वाढ केली. परिणामी, जगभरातील शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात पडझड झाली. जागतिक पातळीवर नकारात्मक संकेत मिळाल्याने; तसेच परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) भारतीय भांडवली बाजारात विक्री केल्याने गेल्या शुक्रवारी ‘सेन्सेक्स’ व ‘निफ्टी’मध्ये घसरण झाली. गेल्या आठवड्यात ‘सेन्सेक्स’ ५१,३६० अंशांवर, तर ‘निफ्टी’ १५,२९३ अंशांवर बंद झाले.

गुंतवणूक गुरू वॉरेन बफे म्हणतात, ‘व्याजदर हे मूल्यांकनातील गुरुत्वाकर्षणासारखे असतात. जर व्याजदर काहीही नसतील, तर मूल्ये जवळजवळ अमर्याद असू शकतात. जर व्याजदर खूप जास्त असतील, तर ते मूल्यांवर मोठे गुरुत्वाकर्षण आहे.’ १९९४ मध्ये व्याजदर आणि मूल्यांकनाचा संबंध सांगताना बफे म्हणाले होते, ‘प्रत्येक व्यवसायाचे मूल्य, शेताचे मूल्य, अपार्टमेंटचे मूल्य, कोणत्याही आर्थिक मालमत्तेचे मूल्य हे व्याजदरांना संवेदनशील असते. व्याजदर जितके जास्त असतील, तितके सध्याचे मूल्य कमी होईल. प्रत्येक व्यवसाय, मग तो कोका-कोला असो किंवा जिलेट असो किंवा वेल्स फार्गो असो, त्याचे आंतरिक मूल्यांकन व्याजदरांबाबत संवेदनशील आहे.’

बिकट आर्थिक परिस्थितीमधून मार्ग काढण्यासाठी; तसेच अर्थचक्राला गती देण्यासाठी जगभरातील मध्यवर्ती बँकांनी व्याजदर कमी ठेवण्याचे धोरण स्वीकारले होते, अशा वेळेस कंपन्यांच्या मिळकतीनुसार शेअर बाजाराचा परतावा बँकेतील अल्प व्याजदरांपेक्षा चढा दिसत असल्याने पूर्वीपेक्षा महाग झालेल्या शेअर बाजाराने देखील आणखी वाढ दर्शविली. तुलनात्मकदृष्ट्या शेअर बाजाराचा परतावा बँकेतील अल्प व्याजदरांपेक्षा चढा दिसत असल्याने शेअर बाजारात पैशाचा ओघ आला. मात्र, आगामी काळात महागाईदरात प्रमाणबाह्य वाढ होऊ लागल्याने जगभरातील मध्यवर्ती बँकांनी व्याजदरात टप्प्याटप्प्याने वाढ करण्याचे धोरण स्वीकारले, तर शेअर बाजारात केवळ व्याजदर कमी असल्याने होणाऱ्या वाढीवर मर्यादा येतील.

प्रत्येक व्यवसायाचे आंतरिक मूल्यांकन व्याजदरांबाबत संवेदनशील आहे. मात्र, केवळ तुलनात्मकदृष्ट्या बँकेतील अल्प व्याजदरामुळे मूल्यांकनात भावनांच्या जोरावर चढ-उतार करणाऱ्या; तसेच गुंतविलेल्या भांडवलावर अल्प परतावा मिळवत सुमार दर्जाचा व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याऐवजी दीर्घावधीमध्ये मिळकतीमध्ये उत्तम वाढ दर्शवू शकणाऱ्या कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करणे योग्य ठरू शकेल. ज्या कंपन्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये टिकाव धरून प्रगती करू शकतात, कार्यरत क्षेत्रातील स्वतःचे स्थान बळकट करीत बाजारातील हिस्सा वाढता ठेऊन दीर्घावधीमध्ये प्रगती करू शकतात, ज्या कंपन्यांकडे कच्च्या मालाच्या किमतींमधील होत असलेली भाववाढ अंतिम ग्राहकांपर्यंत पोचविण्याची क्षमता आहे, अल्पावधीतील बिकट परिस्थितीत टिकाव धरून व्यवसायातील होणाऱ्या बदलांना सामावून घेत, भांडवलावर उत्तम परतावा मिळवत प्रगतीची चक्रे चालू ठेऊ शकतात, अशा कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणे हिताचे ठरू शकते.

डिव्हिज लॅबोरेटरीज (शुक्रवारचा बंद भाव रु. ३४८१)

डिव्हिज लॅबोरेटरीज ही कंपनी जागतिक अग्रगण्य फार्मा कंपन्यांसाठी ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इंग्रेडियंट्स (एपीआय), इंटरमीडिएट्स आणि न्यूट्रास्युटिकल घटकांच्या निर्मितीमध्ये गुंतलेली आहे. ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इंग्रेडियंट (एपीआय) हा औषध उत्पादनाचा जैविकदृष्ट्या सक्रिय घटक आहे. कंपनीकडे विविध उपचारात्मक क्षेत्रांमध्ये सुमारे १३० उत्पादनांचा पोर्टफोलिओ आहे. हैदराबाद आणि विशाखापट्टणम येथे कंपनीचे जागतिक दर्जाचे उत्पादन युनिट आहे. कंपनीच्या उत्पादनांचा पुरवठा सुमारे ९५ देशांना केला जातो. डिव्हिज लॅब १० पेक्षा जास्त जेनेरिक ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इंग्रेडियंट्स (एपीआय) मध्ये जागतिक पातळीवर आघाडीवर आहे. अमेरिका, युरोपीय समुदाय; तसेच जपानमधील आघाडीच्या दहा मोठ्या फार्मा कंपन्यांपैकी सहा कंपन्या १० वर्षांहून अधिक काळ डिव्हिज लॅबोरेटरीजबरोबर काम करीत आहेत. ‘चायना प्लस वन’च्या पार्श्‍वभूमीवर विकसित होत असलेल्या मागणीनुसार कंपनी आणखी काही विशिष्ट ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इंग्रेडियंट्समध्ये क्षमता निर्माण करीत आहे. सध्या जागतिक पातळीवरील बिकट परिस्थितीमुळे कंपनीच्या नफ्यावर काही काळ परिणाम होऊ शकतो; ज्याकडे कंपनीच्या व्यवस्थापनाचे लक्ष आहे. दीर्घावधीचा विचार करता, ‘एपीआय’ची देशांतर्गत उत्पादनाची वाढती मागणी; तसेच जागतिक पातळीवरील ‘एपीआय’ची मागणी लक्षात घेता, डिव्हिज लॅबोरेटरीज या कंपनीला आगामी काळात व्यवसायवृद्धीस भरपूर मोठ्या प्रमाणात वाव आहे. व्यवसायात गुंतविलेल्या भांडवलावर सातत्याने २५ टक्क्यांपेक्षा जास्त परतावा मिळवत या कंपनीने विक्री; तसेच नफ्यामध्ये गेल्या १० वर्षांत दरवर्षी १५ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ दर्शवत व्यवसायवृद्धी केली आहे. आगामी काळातील कंपनीची व्यवसायवृद्धीची क्षमता आणि शक्यता लक्षात घेता, डिव्हीज लॅब या कंपनीच्या शेअरमध्ये जोखीम लक्षात घेऊन गुंतवणूक केल्यास चांगला फायदा मिळू शकतो.

सध्या ‘फंडामेंटल्स’चा विचार करता, ‘निफ्टी’ १८ पीईच्या आसपास ‘ट्रेड’ होत आहे. आलेखानुसार ‘निफ्टी’ नकारात्मक कल दर्शवत आहे. यामुळे जोपर्यंत आलेखानुसार सक्षम तेजीचे संकेत मिळत नाहीत, तोपर्यंत अल्पावधीसाठी ट्रेडर्सनी व्यवहार करण्याची गडबड करू नये. मात्र, दीर्घावधीच्यादृष्टीने विचार करता, पोर्टफोलिओमध्ये डिव्हिज लॅबोरेटरीज बरोबरच, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (शुक्रवारचा बंद भाव रु. ३०८८), पीआय इंडस्ट्रीज (शुक्रवारचा बंद भाव रु. २४७३), एचडीएफसी बँक (शुक्रवारचा बंद भाव रु. १२८९) आदी शेअरचा गुंतवणूकदारांनी जरूर विचार करावा.

या लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली गेली आहे. प्रत्यक्ष व्यवहार करताना जोखीम ओळखून वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com