व्होडाफोन-आयडिया बंद होणार?

टीम ईसकाळ
शनिवार, 7 डिसेंबर 2019

कुमार मंगलम बिर्ला यांची स्पष्टोक्ती; दिलासा देण्याची मागणी 
नवी दिल्ली, ता. 6 (पीटीआय) : व्होडाफोन आयडिया आर्थिकदृष्ट्या अडचणीत असून, आम्ही कंपनीत आणखी भांडवल टाकू शकत नाही. सरकारकडून व्होडाफोन आयडियाला दिलासा न मिळाल्यास कंपनी बंद करावी लागेल, अशी स्पष्टोक्ती कंपनीचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांनी केली आहे. 

कुमार मंगलम बिर्ला यांची स्पष्टोक्ती; दिलासा देण्याची मागणी 
नवी दिल्ली, ता. 6 (पीटीआय) : व्होडाफोन आयडिया आर्थिकदृष्ट्या अडचणीत असून, आम्ही कंपनीत आणखी भांडवल टाकू शकत नाही. सरकारकडून व्होडाफोन आयडियाला दिलासा न मिळाल्यास कंपनी बंद करावी लागेल, अशी स्पष्टोक्ती कंपनीचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांनी केली आहे. 
व्होडाफोन आयडिया या देशातील आघाडीच्या दूरसंचार कंपनीत आदित्य बिर्ला समूहाचा 27.66 टक्के, तर व्होडाफोनचा 44.39 टक्के हिस्सा आहे. येथे एका कार्यक्रमात बोलताना बिर्ला म्हणाले, ""कंपनीला सरकारकडून दिलासा मिळण्याची आशा आहे; परंतु तो न मिळाल्यास कंपनीला कामकाज गुंडाळावे लागेल. या क्षेत्रात तग धरून राहण्यासाठी आम्हाला सरकारकडून आणखी मदतीची अपेक्षा आहे. आणखी मदत मिळाली नाही तर व्होडाफोन आयडियाचा प्रवास इथेच थांबेल.'' 
""या विषयातील सर्वांत मोठा मुद्दा "ऍडजस्टेड ग्रॉस रेव्हेन्यू' (एजीआर) हा आहे. हा मुद्दा न्यायालयाच्या निकालाधीन आहे. हा खटला सरकारनेच दूरसंचार कंपन्यांविरुद्ध न्यायालयात दाखल केला होता. यात निकाल सरकारच्या बाजूने लागला आहे. त्यामुळे सरकार यात न्यायालयाशी संवाद साधून यातून काही मार्ग काढू शकते. हे नक्की कशा पद्धतीने होऊ शकेल हे मला सांगता येणार नाही; परंतु यातून मार्ग निघेल अशी मला आशा आहे,'' असे बिर्ला यांनी सांगितले. याआधी व्होडाफोनचे ग्लोबल सीईओ निक रेड यांनीसुद्धा भारत सरकारकडून मदत न मिळाल्यास कंपनीचे कामकाज थांबवावे लागेल, असे विधान केले होते. 

कंपनीचे भवितव्य धोक्‍यात 
दूरसंचार सेवेतील तीव्र स्पर्धा आणि सर्वोच्च न्यायालयाचे थकीत परवाना शुल्क भरण्याचा दिलेला आदेश यामुळे व्होडाफोन आयडियाला सप्टेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत तब्बल 50 हजार 921 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. त्या पार्श्‍वभूमीवर कंपनीचे भारतातील भवितव्य धोक्‍यात आल्याचे बोलले जात आहे. 

ताळेबंद कोलमडला 
सर्वोच्च न्यायालयाच्या शुल्क भरण्याच्या आदेशाने कंपनीचा ताळेबंद कोलमडला आहे. सप्टेंबरअखेर व्होडाफोन आयडियावर 1 लाख 17 हजार 300 कोटी रुपयांचे कर्ज आहे. यातच स्पेक्‍ट्रम शुल्कापोटी 89 हजार 170 कोटींचे सरकारचे देणे थकीत आहे. 

आर्थिकदृष्ट्या संकटात असलेल्या कंपनीत आणखी भांडवल गुंतवण्यात कोणतेच शहाणपण नाही, त्यामुळे आमचा दूरसंचार क्षेत्रातील प्रवास इथेच संपू शकतो. 
- कुमार मंगलम बिर्ला, अध्यक्ष, व्होडाफोन आयडिया  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vodafone Idea will shut shop if there is no govt support