कांद्याने केला वांदा; महागाईच्या दरात झाली वाढ!

वृत्तसंस्था
Monday, 16 December 2019

महागाई दर तुलनेने कमीच असल्याने रिझर्व्ह बँकेला मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या पतधोरणात रिझर्व्ह बँकेने रेपो दर कायम ठेवत येत्या काही महिन्यात महागाई वाढेल, असा अंदाज व्यक्त केला होता.

नवी दिल्ली : घाऊक मूल्यावर आधारित महागाई दरात नोव्हेंबरमध्ये किरकोळ वाढ झाली आहे. तो आता 0.58 टक्‍क्‍यावर पोचला आहे. घाऊक बाजारात महागाई दर अजूनही नीचांकी पातळीवर आहे. त्याआधीच्या ऑक्‍टोबरमध्ये तो 0.16 टक्के होता.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गेल्या महिन्यात देशभरात कांद्याचे दर वाढले आहेत. तसेच अन्नधान्य आणि खाद्यपदार्थांच्या किंमतीत वाढ झाल्याने किरकोळ महागाई दरात देखील वाढ झाली होती. मात्र घाऊक चलनवाढीच्या पातळीवर केंद्र सरकारला दिलासा मिळाला आहे.

महागाई दर तुलनेने कमीच असल्याने रिझर्व्ह बँकेला मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या पतधोरणात रिझर्व्ह बँकेने रेपो दर कायम ठेवत येत्या काही महिन्यात महागाई वाढेल, असा अंदाज व्यक्त केला होता. 

- चलनवाढीचा पारा चढला

केंद्र सरकारने सोमवारी (ता.16) घाऊक महागाई दराची आकडेवारी जाहीर केली. नोव्हेंबरमध्ये घाऊक मूल्यावर आधारित महागाई दर 0.58 टक्‍क्‍यांपर्यंत वाढला आहे. मुख्यतः उडीद (19 टक्के), मासे-सागरी (6 टक्के), मूग (5 टक्के), राजमा ( टक्के), ज्वारी, अंडी, मसाले, फळे आणि भाज्या आणि मसूर ( प्रत्येकी 3 टक्के), गहू, चिकन आणि बाजरी (प्रत्येकी 2 टक्के) आणि हरभरा, मासे आणि मांस (प्रत्येकी 1 टक्के) या खाद्यपदार्थांच्या किंमतीत वाढ झाली आहे.

- लुफ्तान्सा एअरलाईन्सची विस्ताराबरोबर हातमिळवणी

- एल अँड टी फायनान्सचा ‘एनसीडी’ इश्‍यू १६ डिसेंबरपासून

भाजीपाला आणि इतर खाद्यान्न वस्तूंच्या किमती वाढल्याने नोव्हेंबर महिन्यात किरकोळ बाजारातील चलनवाढीचा दर देखील 5.54 टक्‍क्‍यांपर्यंत वाढला आहे. किरकोळ चलनवाढीच्या दराने गेल्या तीन वर्षांतील उच्चांकी स्तर गाठला आहे. नोव्हेंबर महिन्यात शहरी आणि ग्रामीण भागातील अन्नधान्यातील महागाई दर 10.01 टक्‍क्‍यांवर पोचला आहे, जो ऑक्‍टोबरमध्ये 7.89 टक्के होता. वर्षभरापूर्वी तो 2.61 टक्के होता.

- भारतात २०१६ पासूनच मंदीची सुरवात

तसेच प्राथमिक वस्तूंच्या महागाई दरात 7.68 टक्‍क्‍यांपर्यंत वाढ झाली. ऑक्‍टोबरमध्ये तो 6.4 टक्के होता. कारखाना उत्पादीत वस्तूंमधील महागाई -0.84 टक्के राहिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wholesale inflation increased in November with onion rates