मन करा रे प्रसन्न... 

Indrjeet Deshmukh
Indrjeet Deshmukh

मन करा रे प्रसन्न। 
सर्व सिद्धीचे कारण। 
मोक्ष अथवा बंधन। 
सुख समाधान ईच्छा ते।।।। 
मने प्रतिमा स्थापिली। 
मने मन पूजा केली। 
मने ईच्छा पुरविली। 
मन माऊली सकळांची।।धृ।। 
मन गुरू आणि शिष्य। 
करी आपुलेचि दास्य। 
प्रसन्न आपआपणास। 
गती अथवा अधोगती।।1।। 
साधक वाचक पंडित। 
श्रोते वक्‍ते ऐका मात। 
नाही नाही आनूदैवत। 
तुका म्हणे दुसरे।।2।। 

"जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती। 
देह कष्टविती परोपकारे।।" 

या न्यायाने आमचं सर्वांगीण हित साधण्यासाठी जगातील सर्व संतांनी आम्हाला नीतीमानता शिकविली आणि ती शिकवताना समाज निकोप राहील, समाजातील समूहद्वेष कमी होईल व सहजीवी प्रेमभावना वाढीस लागेल यासाठी खूप प्रयत्न केले. हे प्रयत्न करत असतानाच व्यक्ती आणि समाजविकास या कल्पना सत्यात उतरवण्यासाठी संतांनी व्यक्तीच्या भौतिक व पारमार्थिक प्रगतीस बाधा करणाऱ्या सर्व समस्यांची उकल करणारे सिद्धांत तुम्हाला आणि मला दिले. ज्या सिद्धांतांचा 
"मार्ग दाऊनी गेले आधी। 
दयानिधी संत ते।। 

या न्यायाने उपयोग करून आम्हाला आजही आमचा जीवनप्रवास सुखाचा करता येतो आणि जीवन सुखाचे करता येते. 
याच विचाराचे सूत्र पकडून आमच्या तुकाराम महाराजांनी आपल्या प्रगतीच्या वाटेवर अडथळा ठरणारा सगळ्यात महत्त्वाचा एक मार्मिक विचार वरील अभंगातून आपल्यासमोर मांडलेला आहे. आमच्या प्रगतीसाठी सगळ्यात अडथळा ठरणारा सगळ्यात महत्त्वाचा शत्रू दुसरं बाहेरच कुणीच नाही तर या बाबतीतील मुख्य अडथळा म्हणजे आमच्या मनातील नकारभाव होय. याचसाठी महाराज म्हणतात, 
"माझा मीच झालो शत्रू। कैसे पुत्र दारा कैसा मितरू।।' प्रगतीविषयक प्रवास सुरू करताना मनाचा चलबिचलपणा आम्हाला पूर्ण ताकदीने ध्येयप्राप्तीसाठी प्रयत्न करूच देत नाही. याचसाठी महाराज आम्हाला सर्व सिद्धीचे कारण असणारे मन प्रसन्न करायला सांगतात. 


मनातील मुक्त आणि सकारत्मकतेच्या उच्चतेमुळेच आम्हाला मुक्त म्हणजे कोणताच दबाव न घेता मोकळेपणाने जगता येऊ शकते. आज आमच्या जीवनात जे तणाव येतात आणि त्या तणावामुळे जीवनामध्ये जे विस्कटलेपण निर्माण होत आहे, त्यावरचा खूप मोठा उपाय आमच्या तुकोबारायांनी आम्हाला सांगितला आहे आणि तो म्हणजे मनाची प्रसन्नता. महाराजांच्या मते या प्रसन्नतेमुळेच मुक्तता, बंधन आणि सुख-समाधान या सगळ्या गोष्टी आपण अनुभवू शकतो. मनाने गृहित धरलेली ग्राह्यता आमच्या वृत्तीवर प्रभाव पाडत असते. याचसाठी आम्ही आमच्या माध्यमातून जे ग्राह्य संकल्प करत असतो, ते तसेच घडत असतात. आम्हाला आज सांगितला जाणारा आकर्षणाचा सिद्धांत संतांनी त्या वेळी जाणला होता म्हणूनच ते आम्हाला सांगतात, की 
"तू मन हे मीची करी' 
आपल्या मनाद्वारेच एखादी प्रतिमा आपण आपल्या मनात रंगवू शकतो आणि त्या प्रतिमेची प्राप्ती अथवा धिक्कार यासाठी प्रयत्न करत असतो. एखाद्या उच्चपदाच्या नोकरीच्या प्राप्तीसाठी रात्रंदिवस अभ्यास करत धडपडणारा एखादा विद्यार्थी त्या पदाच्या परीक्षेत उत्तीर्ण व्हायचा असेल, तर त्याने अगोदरचं आपल्या मनात आपल्याला त्या पदावर जायचे आहे याचे स्वप्न पाहावे लागते. त्यास अनुसरून आपल्या मनाला आपला जवळचा मित्र समजून दूर कुठेही भरकटू न देता प्रयत्न किंवा मेहनत करावी लागते. असं झालं की स्वप्नजन्य कल्पनेतून त्या विद्यार्थ्यांला यश प्राप्त होईपर्यंत हे मनच त्याला गतिशील बनवत असतं. एखाद्या ध्येयाच्या प्राप्तीसाठी त्या ध्येयास अनुसरून असणाऱ्या प्रयत्नांची पूजा या मनाद्वारे केली, की आपल्याला नक्की यश मिळत असते. 

कधी कधी हेच सकारात्मक मन आपल्याला एखाद्या अरिष्टजन्य स्थितीतून बाहेर पडायचा मार्ग सुचवत तेव्हा हे मन आपलं गुरू असतं. कधी कधी जीवनातील एखाद्या छोट्याशा पराभवामुळे खचलेल्या मनाचं सांत्वन करतेवेळी हेच मन आपलं शिष्य असतं. कधी हे मन आपलं सेवक म्हणून काम करतं, तर कधी आपल्यावर अधिकार गाजवतं. मनाची प्रसन्नता आपल्या प्रगतीस तर मनाची निराशा आपल्या अधोगतीस कारणीभूत ठरत असते. मन खंबीर असेल तर खूप कमी सामग्री असताना आणि परिस्थिती पूर्णपणे विरोधात असली, तरी यश प्राप्त करता येते; पण हे सगळं जवळ असून, निव्वळ मन असहाय असेल, तर आपण पराभूत होऊ शकतो. याचसाठी आपण सगळेचं जण साधक, वाचक, पंडित श्रोते या आपल्या मनाची मनोभावे आराधना करून आपल्या मनाला प्रसन्न बनवूया आणि यशस्वी बनूया हीच मनापासून मनोकामना.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com