Sahitya Sammelan 2023
Sahitya Sammelan 2023esakal

Sahitya Sammelan 2023 : मराठी साहित्य संमेलनाचा मराठीला फायदा काय?

एकीकडे साहित्य संमेलनातले वाद, खर्च याची आकडेमोड होत असताना खरंच संमेलनाचा तुम्हाला मला फायदा काय? असा प्रश्न निर्माण होतो.

९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आजपासून वर्ध्याला सुरु झालंं आहे. त्यामुळे साहित्य, सांस्कृतिक विश्वात नवीन उत्साह आणि उत्सवाचं वातावरण या काळात अनुभवायला मिळणार आहे. वर्ध्याला यंदाचं यजमान पद मिळाल्याने आजवरचा इतिहास पाहता तिथे तर उत्सवच साजरा होत असणार यात दुमत असण्याचं काही कारण नाही.

साहित्यिक, साहित्यप्रेमी, टिकाकार, विद्यार्थी, पत्रकार आणि हौशे-नवशे-गवशे सगळ्यांचीच मांदीयाळी इथे बघायला मिळणार. रांगोळ्या, रस्त्यांची सजावट, पुस्तकांचे लांबच लांब स्टॉल लागणार... त्यातली कलात्मकता उत्सुकतेने बघणाऱ्या अनेकांची गर्दी इथे बघायला मिळणार.

राजकीय, औद्योगिक, साहित्यिक मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संमेलनाची सुरुवात होईल. पण त्यानंतर चर्चा रंगतील त्या म्हणजे इथल्या आर्थिक उलाढालींची आणि वादांची. साहित्यिकांचा मानापमानाचा अंक रंगवला जाईल... त्यामुळे एकूणच सामान्य नागरिकांना प्रश्न पडतो की, का भरवलं जातं साहित्य संमेलन, याचा खरंच फायदा काय?

त्यामुळे आज आपण संमेलनाच्या सकारात्मक बाजूकडे जरा बघूया. सामान्य नागरिक म्हणून खरंच संमेलनाचा फायदा आहे का? हे जाणून घ्यायचा प्रयत्न करूया.

संमेलनाचं यजमान गाव

अखिल भारतीय साहित्य संमेलन दरवर्षी जिथेही मराठी माणूस आहे त्या प्रत्येक भागात हे संमेलन होत असल्याचा या ९६ वर्षांचा इतिहास आहे. त्यात फक्त महाराष्ट्रच नाही तर गुजरात, पंजाब यांचाही समावेश आहे. जेव्हा एखाद्या गोष्टीला मोठ्या पातळीवर मांडण्याचा एकत्रीत प्रयत्न होतो तेव्हा तो अनेकांच्या नजरेस नक्कीच पडतो. त्यामुळे देशातील विविध भागांमध्ये मराठी साहित्य संस्कृतीला पोहचवण्यासाठी याची मदतच झाली आहे.

संमेलनाचे आयोजन हे भव्य स्वरुपात होते हे तर सर्वांनाच माहित आहे. त्यामुळे ज्या गावामध्ये संमेलन होत असते त्या गावाबरोबरच आजुबाजूच्या अनेक गावांचं त्याकडे लक्ष लागलेले असते. मराठी साहित्य संमेलन हा विषय सुशिक्षीत असूनही साहित्यांपासून लांब असणाऱ्यांपासून ते अशिक्षितांपर्यंत पोहचतो. एक उत्सुकता निर्माण करतो. संमेलनाच्या आयोजनाशी निगडीत लहान मोठ्या गोष्टी जाणून घेण्यात त्या काळा पुरतं का असेना या लोकांना कुतुहल असतं. त्यामुळेच नकळत इथल्या लोकांमध्ये मराठी साहित्याविषयीचं औत्सुक्य वाढतं हे आजवरच्या निरिक्षणातून समोर आलं आहे.

त्यात आयोजनात स्थानिक राजकीय नेत्यांचा मोठा सहभाग असतो. पर्यायाने त्यांचे कार्यकर्तेही मराठी साहित्य आणि संमेलनाशी त्या अनुशंगाने जोडले जातात हे विसरुन चालणार नाही.

पुस्तक प्रदर्शन आणि विक्री

काही ठराविक जनसमुदायासाठी मराठी साहित्य संमेलनाला जाणं हे प्रतिष्ठेचं लक्षण असतं. काही लोक खरंच आवड म्हणून जातात. पण संमेलनात येणारे बहुतांश लोक हे संमेलन नक्की काय असतं हे बघावं म्हणून आलेले असतात. त्यांमुळे याच लोकांच्या उपस्थितीवर संमेलनाच्या गर्दीचा आकडा मोजला जातो यात अतिशयोक्ती वाटण्याचं काही कारण नाही. ही गर्दी तिथल्या स्थानिकांची असते. साहित्यिक आणि साहित्य प्रेमींच्या या मांदियाळीत भारावून अनेक लोक ज्या साहित्याची इथे चर्चा सुरू आहे ते बघुया तरी म्हणून पुस्तक प्रदर्शन स्टॉल्सकडे वळतात. त्यामुळेच दुर्मिळ साहित्यापेक्षा प्रसिद्ध, गाजलेल्या पुस्तकांचीच इथे जास्त विक्री होत असल्याचं निदर्शनास आलं आहे.

पण यातून एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे सहसा पुस्तक खरेदी न करणारे अनेक जण इथे या भारावलेल्या वातावरणात एका पेक्षा जास्त पुस्तकांची खरेदी करतात. ज्यामुळे वाचन संस्कृतीला हातभार लावण्याचं महत्वाचं योगदान संमेलन नक्कीच करतं. आता हा वाटा सिंहाचा की, खारीचा हा शोध ज्याने त्याने लावावा.

विद्यार्थ्यांचा सहभाग

साहित्य संमेलन म्हणजे ज्येष्ठांचा उद्योग असं जर कोणाला वाटत असेल तर त्यांचा समज ठाम खोटा ठरवणारं दरवर्षीचं संमेलन असतं असं म्हणायला हरकत नाही. तरुण साहित्यिक, कवींसह उपस्थित प्रेक्षकांमध्येही सर्वाधिक उपस्थिती तरुणांची असते असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. मराठीचं भविष्य ठरवणारी तरुण पिढी लाक्षणिक संख्येने जर संमेलनाला उपस्थिती लावत असेल तर संमेलनाचा फायदा काय? असा प्रश्न विचारणं योग्य नाही असं वाटतं.

यात विद्यार्थ्यांची संख्याही मोठी असते. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांपासून ते शाळकरी विद्यार्थ्यांपर्यंत सर्वच स्तारातले तरुण इथे उपस्थिती लावतात. त्यांना इथे होणाऱ्या साहित्यिक चर्चांमध्ये किती रस असतो हा भाग अलहिदा; पण पुस्तक प्रदर्शनात, कवी संमेलनात, नाटक, उद्घाटन, समारोप अशा ठिकाणी त्यांची भरपूर उपस्थिती आढळते. त्यांच्या कानांवर पडणारे विचार कळत न कळत त्यांच्या मनावर परिणाम करतात हे सत्य नाकारता येणार नाही.

संमेलनानंतर

संमेलन दरवर्षी त्या वेळच्या संमेलनाध्यक्षांना वेगवेगळ्या ठिकाणी फिरून मराठी भाषेच्या, साहित्याचा प्रचार करावा म्हणून काही निधी दिला जात असतो. याच्या सखोलात शिरलो नाही, तरी संमेलनाध्यक्ष म्हणून विविध कार्यक्रमांत या साहित्यिकाला आमंत्रित केले जाते. सतत कानावर एकच नाव पडत असल्याने नकळत त्यांचे नाव बहुपरिचीत होत त्यांच्या साहित्याविषयी कुतुहल अनेकांच्या मनात निर्माण होते, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.

एकूणच काय साहित्यिकांची सहल, उत्सवाचा खर्च, जेवणावळी, पदार्थ, वाद, मानापमान या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून जर सकारात्मक दृष्टीने मराठी साहित्य संमेलनाकडे बघितले तर सामान्य नागरिकांमध्ये मराठी साहित्याविषयी दिवसेंदिवस मलीन आणि उदासीन होणारी भावना आपण रोखू शकू. मराठीला जे भविष्य संमेलनाने द्यावे अशी अपेक्षा ठेवत आहोत त्यासाठी हातभार लावायला थोडा सकारात्मक दृष्टीकोन आवश्यक आहे. त्रुटींकडे कानाडोळा करा असं अजिबात नाही. पण त्यालाच अधिकाधिक ठळक करत चांगल्या गोष्टी दुर्लक्षीत होत तर नाही ना...? याची काळजी नक्कीच घ्यायला हवी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com