esakal | पाच राज्यांच्या निवडणुकांचा रिझल्ट म्हणजेच मृतदेहांचा खच

बोलून बातमी शोधा

election
पाच राज्यांच्या निवडणुकांचा रिझल्ट म्हणजेच मृतदेहांचा खच
sakal_logo
By
भाग्यश्री राऊत

देशातील अ‌ॅक्टीव्ह कोरोना रुग्णांची संख्या १७ लाखांच्या घरात पोहोचली आहे आणि मृत्यू हे पावणेदोन लाखांच्या घरात आहेत. कोणी ऑक्सिजनसाठी धावाधाव करतो, कोणी बेडसाठी, कोणी उपचारासाठी, तर कोणी इंजेक्शनसाठी. कोणी स्ट्रेचरवर जीव सोडतोय, तर कोणी अॅम्बुलन्समध्ये, तर कोणाचा घरीच मृत्यू होतो. रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेलं, तर फक्त बेडसाठी ५ लाख रुपये भरा, अशी अट घातली जाते. ग्रामीण भागात लोक किड्या-मुंग्यांसारखे मरत आहेत. कोणी कोरोनानं मरतोय, तर कोणी मेला तर त्याला कोरोना झाला होता हे माहिती देखील नसते. कारण आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे.

नागपुरात आशिया खंडातील सर्वात मोठे शासकीय रुग्णालय आहे. पण तिथेदेखील मृतदेह ठेवण्यासाठी शवागार कमी पडले आहेत. कोणाच्या घरातील कर्ता पुरुष, तर कोणाच्या अख्ख्या कुटुंबाचा कोरोनानं घात केला आहे. घाटावर एकाचवेळी कितीतरी मृतदेह जळताना दिसतात. दररोज ५-५ मिनिटांनी अॅम्बुलन्सचे आवाज येतात. महाराष्ट्रात इतकी भंयकर परिस्थिती असताना आपण मात्र राजकारण करतोय. रेमडेसिव्हीर, ऑक्सिजन केंद्र देत नाही, असे राज्यातील सत्ताधारी सांगतात. पण, केंद्रांनी ते का देऊ नये? हा देखील प्रश्नच आहे. महाराष्ट्र हे काय दुसऱ्या देशातील राज्य आहे का? असो...तुमचं केंद्र अन् राज्याच्या भांडणाचं आम्हाला काहीही करायचं नाही. आम्हाला फक्त आमचा आणि आमच्या घरच्या लोकांचा जीव महत्वाचा आहे. पण, तुम्ही तो देखील वाचवू शकत नाही. राजकारणी स्वार्थी असतात हे तर माहिती होतं. पण तुम्ही आता पूर्णपणे बिनकामी लोकप्रतिनिधी आहात हे देखील कळलंय. सत्ताधारी असो की विरोधी पक्षांचे आमदार खासदार सर्व एकाच माळेचे मणी आहेत. अरे पण लक्षात ठेवा तुम्हाला जनतेनी त्यांच्या भल्यासाठी निवडून दिले आहे, ना की तुमच्या भल्यासाठी. आज या नागपूर शहरात पालकमंत्री नितीन राऊत, मंत्री सुनिल केदार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार कृपाल तुमाने या सर्व नेत्यांना जनतेनं निवडून दिलंय. पण कोरोनाच्या गंभीर परिस्थितीचं त्यांना जराही भान नसावं का? किंबहुना त्यांना ते नाहीच हे त्यांच्या आतापर्यंतच्या कामगिरीवरून दिसतंच. (यात नितीन गडकरी यांचं नाव मुद्दाम घेतलं नाही. कारण त्यांनी पुढाकार घेतला म्हणून शहरात १०० बेड तरी उपलब्ध झालेत. ऑक्सिजनचा पुरवठ्यासाठीही ते धडपडत आहेत. तरीही त्यांना जनतेनी जे काही दिलंय ते पाहता ही सर्व मदत तोकडीच आहे.)

ग्रामीण भागातील लोकांना मरण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही. सरकार लक्ष देत नाही आणि प्रायव्हेटमध्ये उपचार घ्यायला पैसे नाहीत. मग शेवटी मेलं ते कामाचं, अशी भावना प्रत्येकाची तयार झाली आहे. कारण त्यांनी निवडून दिलेले आमदार खासदार किती लायकीचे आहेत हे त्यांना कळून चुकले आहे. ही झाली नागपूरची परिस्थिती. पण महाराष्ट्रातही काही वेगळी स्थिती नाही. सर्वजण कोरोनाच्या सावटाखाली जगत आहेत. कधी मृत्यू ओढावेल याचा नेम नाही. पण आमचे राजकीय नेते, मग ते सत्ताधारी असो की विरोधी प्रत्येकजण राजकीय सभा घेण्यात गुंतला आहे. पंढरपूर निवडणूक प्रत्येकाच्या प्रतिष्ठेची बनली आहे. सत्ताधाऱ्यांनी कोरोना नियमांचा भंग करून सर्वात आधी सभा घेतली. त्यात कोरोनाचे रुग्ण सापडले. पण त्यांनी निदान तोंडाला मास्क तरी घातला होता, देवेंद्र फडणवीस असतील किंवा गोपीचंद पडळकर असेल यांनी तर मास्क न लावता जनतेशी संवाद साधला. मग दुसऱ्याला कोरोनाचे नियम शिकवायचे आणि स्वतः मात्र सर्व नियम मोडायचे आणि जनतेला पुन्हा मृत्यूच्या दरीत ढकलायचं. मग हा कुठला लोकप्रतिनिधी. अरे कोरोनाच्या काळात तुम्हाला निवडणूक महत्वाची वाटतेय. निवडणूक आहे, पण त्याठिकाणी गर्दी न जमवताही प्रचार केला जाऊ शकतो. तुमच्या अशा या मूर्खपणाच्या वागण्यामुळे तर तुम्हाला निवडून देणारी जनताच किड्या-मुंग्यांसारखी मेली तर पुढच्या निवडणुकीत कोणाला मतांची भीक मागणार?

ही झाली महाराष्ट्राची स्थिती. पण भारतातही कोरोनाची स्थिती काही वेगळी नाही. महाराष्ट्र आणि केरळ हे दोन राज्य सोडले तर महत्वाच्या राज्यांपैकी कोणत्याही राज्याच्या आरोग्य विभागाच्या वेबसाईटवर कोविडचा डॅशबोर्ड नाही. या दोनच राज्यात दररोज किती टेस्टींग केल्या जातात याचे अपडेट आहेत. त्यामुळेच इतर राज्यांतील कोरोनाचे आकडे कमी दिसतात, असं म्हणायला हरकत नाही. पाच राज्यात तर अजून निवडणुकांचं भूत उतरलं नाही. देश ज्यांच्या हातात दिलाय तेच सन्मानीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी साहेब त्या-त्या राज्यात जाऊन लोकांची गर्दी जमवून सभा घेत आहेत. PM Modi Live असं दररोज नोटीफिकेशन येतं आणि मी ते ओपन करून बघतेही. ते बघताच तळ पायाची आग मस्तकात जाते. आपण या माणसाला का निवडून दिलंय याची जाणीव होते. त्या सभेत चिक्कार गर्दी, त्यातही कोणाच्या तोंडाला मास्क नाही. आपले सन्मानीय पंतप्रधानही मास्क न लावताच बोलत असतात. भाईयो और बहनों आप मेरे लिए इतने दूर यहाँ इकठ्ठे हुए हैं, असं बोलताना आपण या शेकडो लोकांना मृत्यूच्या दरीत ढकलत आहोत, याची जाणीव खरंच आपल्या पंतप्रधनांना नसेल का? किंबहूना ती नसावीच. नाहीतर त्यांनी इतक्या सभा घेऊन कोरोना पसरवायला मदत केली नसती. पण, सध्या निवडणुकांचं भूत डोक्यावर आहे. त्यामुळे काहीही जाणवत नाही. ज्यावेळी या भारताची स्थिती इटली, ब्राझीलपेक्षाही गंभीर होईल ना...महायुद्धासारखे लोकांचे मृतदेह जागोजागी पडलेले दिसतील ना, तेव्हा तोच निवडणुकांचा रिझल्ट समजावा.

ज्या देशात कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी गाईडलाईन्स जारी केल्या जातात. कुठल्याही धार्मिक कार्यक्रमाला बंदी असल्याचे बोलले जाते. त्याच देशात कुंभमेळा भरविला जातो. आता त्याच कुंभमेळ्यात गेलेले लाखो भाविक आपआपल्या घरी परतील आणि कोरोनाचं लोण पसरतंच जाईल. शेवटी काय...मृत्यू येऊन ठेपलाय आणि तो स्विकारणे भाग आहे, आपण इतकंच म्हणू शकतो. कारण आपल्या हातात काहीच नाहीये.

- भाग्यश्री राऊत