चाचडगाव, वाचन संस्कृती आणि वाचनालय...

Library
Libraryesakal


एखाद्या गावात वाचनालय सुरु होणं ही तशी एक सामान्य बाब. पण वाचनालयाचा प्रारंभ होताना संपूर्ण गावानं उत्सव साजरा करणं, अत्यानंदीत होणं, नाचणं, ग्रंथ दिंडी काढणं, गावकऱ्यांच्या आनंदाला पारावार न राहणं ही गोष्ट सामान्य नक्कीच नाही. साधारणपणे शहरांमध्ये वाचनालये ओस पडत असल्याचं चित्र आहे. शहरी वाचनालयांच्या आपल्या स्वतंत्र समस्या आहेत. या बाबी बहुतेककरुन सरकारी अनुदान, पगार आणि मनुष्यबळाशी संबंधित आहेत. पण वाचनालयांच्या या समस्यांचा आणि वाचकांचा तसा थेट संबंध येत नाही. तरीही शहरी वाचनालये मात्र ओस पडत आहेत. दुसरीकडे नाशिकपासून अवघ्या २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या चाचडगाव (ता. दिंडोरी) येथे ग्रामपंचायतीच्या छोट्याशा खोलीत एक वाचनालय सुरु होते, त्याचा मोठा उत्सव साजरा होतो. नाशिकमधील आदिवासी बांधवांसाठी कार्यरत असलेल्या सोशल नेटवर्किंग फोरमच्या प्रमोद गायकवाड यांच्या माध्यमातून खास शालेय विद्यार्थ्यांसाठी हे वाचनालय सुरु झालंय.

वाचनालय आणि ग्रंथांच्या स्वागतासाठी चाचडगाव गेल्या कित्येक वर्षांपासून जणू आसुसलेलं होतं. पाण्यावाचून, रस्त्यावाचून, वीजेवाचून आसुसलेली गावे आपण पाहिली आहेत, अशा गावांबद्दल वाचलं-ऐकलं आहे. पण चाचडगाव हे पुस्तकांच्या भेटीसाठी तळमळत होतं, ही बाब या गावाला भेट दिल्यानंतर चटकन जाणवली. इथल्या गावकऱ्यांच्या डोळ्यांमध्ये पुस्तकांबद्दलची चमक दिसून येत होती. अनेक वाचनालये निर्माण होतात, ती लुप्तही होतात. पण इथे इतक्या आश्वासक पद्धतीनं वाचलनायचं स्वागत झालं, ते केवळ शब्दातीत. गावातील विद्यार्थिनी आणि विद्यार्थी नवे पोषाख परिधान करुन पुस्तकांच्या स्वागतासाठी सज्ज होते. लहानग्या मुलींनी डोक्यावर मंगल कलश घेऊन ग्रंथांचं स्वागत केले. गावातील वडिलधाऱ्या मंडळींनी ग्रंथांचं पूजन केलं आणि ग्रंथ दिंडी काढली. माध्यमिक शाळेच्या मुलींनी लेझीम खेळत पुस्तकांचं आगमन साजरं केलं. एवढी जाणीव या छोट्याशा गावातील मंडळींमध्ये कुठून निर्माण झाली असावी, हे शोधण्यासाठी स्वतंत्र अभ्यास करावा लागेल.

Library
औषधे एवढी का महागली?

वाचन संस्कृती आणि वाचन संस्कार रुजवण्यासाठी काही मंडळी जरुर प्रय़त्न करताना दिसतात. सध्याच्या माहितीच्या युगात माहितीचा मारा अत्यंत वेगानं सगळ्या समाजावर आदळताना दिसून येतो. पण डोक्यात येऊन पडणाऱ्या माहितीचा कचरा आणि आणि ज्ञान यांत मुलभूत फरक आहे. हा फरक समजून घेण्यासाठी प्रत्यक्ष वाचन, चिंतन, मनन, लेखन करावं लागेल. ग्रामीण भागातील सुज्ञांनी ही गोष्ट वेळीच ओळखली आहे, हे चाचडगावमध्ये प्रामुख्यानं दिसून आलं. आजच्या पिढीला ज्ञानाची भूक आहे, पण ती कशी शमवावी, याचं अचूक मार्गदर्शन करणारी मंडळी आता फारशी उरलेली नाहीत. क्षणिक आणि वेगवान यशासाठी ही पिढी आतूर आहे. ज्ञान मिळविण्याची पारंपरिक माध्यमे त्यांना नकोशी झाली आहेत. पारंपरिक माध्यमे मग त्यात पुस्तके, वर्तमानपत्रे यांची आवड या पिढीमध्ये निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. चाचडगावमधील सुज्ञ, सज्जन लोकांनी हे आव्हान स्वीकारलंय, ही कौतुकास्पद बाब आहे. शहरातील मंडळी ही गरज कधी ओळखणार हा प्रश्न आहे.

महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज यांच्यासह विज्ञानाच्या जगात मौलीक कार्य केलेल्या शास्त्रज्ञांच्या जीवनावर आधारित पुस्तके चाचडगावच्या छोटेखानी ग्रंथालयात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. स्पर्धा परीक्षांची पुस्तकही इथं आहेत. या पुस्तकांबद्दल आणि थोर विचारवंतांबद्दल चाचडगावच्या शालेय विद्यार्थ्यांनी अतिशय मार्मिक अशी भाषणं केली. या मुलांच्या भाषणांमधून समाजात विधायक बदल घडविण्यासाठी या गावातील मुलं आतुर असल्याचं जाणवलं. ही उत्कटता, आतूरता सध्या दुर्मिळ झाली आहे. स्पष्ट दिशा आणि गुणग्राहकता या गुणांचा अभाव शहरातील तरुण पिढीत दिसून येतो. शहरातली मुलं सोशल मीडिया, वेब सीरिजमध्ये अडकून पडलेली असताना ग्रामीण भागातील पिढी पारंपरिक ज्ञान साधनांकडे आकर्षित होणं ही घटना अप्रृप निर्माण करणारी आहे.

Library
सत्यच बोलणाऱ्या मुलाची गोष्ट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com