esakal | कलावंतांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं मन हेलावून टाकणारं पत्र
sakal

बोलून बातमी शोधा

Letter-to-Cm-From Drama-Artists

कलावंतांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं मन हेलावून टाकणारं पत्र

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

विविध गावांतील रंगकर्मी व कलाकारांनी पत्राद्वारे सांगितले हृदय पिळवटून टाकणारे अनुभव

------------------------------------------------------

माननीय उद्धव ठाकरे,

मुख्यमंत्री,

महाराष्ट्र राज्य

सप्रेम नमस्कार.

आमचे हे पत्र तुमच्यापर्यन्त पोहोचेल की नाही कल्पना नाही. आम्ही सारे प्रायोगिक नाटक करणारे कलावंत आहोत. आम्हाला पूर्ण कल्पना आहे की सारे जग गेले दीड वर्ष अतिशय संकटातून जात आहे. विविध क्षेत्रांसमोर जीवघेणे प्रश्न कोविडने उभे केले आहेत. त्याकरता आपला देश आणि आपले राज्य आपापल्या पातळीवर उपायही करू पाहात आहे. या संकटातून बाहेर पडण्याकरता इथल्या नागरिकांनीही आपापल्या मगदुराप्रमाणे मदत केली आहे. त्यात आम्हीही आपापल्या कुवतीने मदत केली आहे. कोविडची स्थिती नक्की आणि पक्की कोणालाच वर्तवता येत नसल्याने सरकार आपल्या परीने जबाबदार पावले टाकत आहे हेही आम्हाला कळत आहे. शिक्षण या अतिशय महत्वाच्या गोष्टीला अजून कुलूप आहे हेही आम्ही जाणत आहोत. हे सर्व सुरळीत सुरू झाल्यावर मग करमणूक या नावाखाली जे काही क्षेत्र येते ते सुरू होणार याबाबतही आम्ही सहमत आहोत. पण हे सर्व आता दीड वर्ष सुरू आहे. आधीपेक्षा आता थोडीफार सुधारणा होत आहे. लसीकरण त्यात मोलाची भर घालत आहे. लोक आता हॉटेलात काही दिवस का होईना, पण जाऊन जेवूखाऊ लागलेले आहेत.

हेही वाचा: निर्बंध हटवा, अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार; दादरच्या व्यापाऱ्यांचा इशारा

बदलत्या या चित्रात सर्वांनी कोविडची काळजी घेणं अर्थातच आवश्यक आहे. त्याबाबत सतत जनजागृती होणं गरजेचं आहे. या संकटाने आर्थिक प्रश्न जसे निर्माण केले तसे मानसिक प्रश्न गंभीर केलेले आहेत. त्याकरता समुपदेशन आणि मार्गदर्शन काही डॉक्टर्स करत आहेत. आपल्यावरील हे असह्य ताण दूर होण्याचा एक मार्ग नाटक ही जिवंत कला पाहाणे हाही आहे. पहिली लाट ओसरल्यावर मराठी रंगभूमीवर काही लोकांनी सर्व काळजी घेऊन नाट्यप्रयोग केले. प्रायोगिक रंगभूमीवर केवळ २५/३० लोकांसमोर आम्ही काही लोकांनी अतिशय सुरक्षित आणि यशस्वीरीत्या प्रयोग केले. सभा, समारंभ,मंडई, हॉटेल अशा जागांपेक्षा 'थिएटर' ही अधिक सुरक्षित जागा आहे. याचा आम्ही अनुभव घेतला आहे.

हेही वाचा: "लोकलने प्रवास करू द्या किंवा मुंबईकरांना ५ हजार भत्ता द्या"

आपणांस नम्र विनंती अशी की निदान ५० लोकांकरता छोट्या स्वरूपातील प्रयोग करायला आपण परवानगी द्यावीत. यामुळे समाजात मनस्वास्थ्य टिकायला नक्की मदत होईल.

कृपया आमच्या या रंगभूमीच्या प्रातिनिधिक पत्राचा आपण गंभीरपूर्वक विचार करावा ही विनंती.

करोनाविरुद्धच्या या संकटात आमची साथ होतीच आणि पुढेही असेलच.

कळावे,

आपले नम्र.

अतुल पेठे (पुणे), शंभू पाटील (जळगाव), वामन पंडित (कणकवली), दत्ता पाटील (नाशिक), अभिजित झुंजारराव (मुंबई), अनिल कोष्टी (भुसावळ)

आणि अनेक गावांतील रंगकर्मी

loading image