Gofan Article
Gofan Articleesakal

गोफण | त्यागमूर्ती... वैराग्यमूर्ती प्रतोदशेठ

...तर गोष्ट आहे प्रतोदशेठची. प्रतोदशेठ म्हणजे कोकणातल्या कातळ कड्यातून गोड्या पाण्याचा झरा पाझरावा तसा माणूस. एकदम मोकळा-ढाकळा गडी. मागच्या अगणित वर्षांपासून गावचं राजकारण त्यांच्या आवतीभोवती फिरतंय. पण प्रतोदशेठला अजिबात गर्व नाही. खरंतर या माणसानं आज मोठी मजल मारायला पाहिजे होती. निदान जिल्हा बोर्डावर तरी निवड व्हायला पाहिजे होती. पण गावच्या झंझटीत साधं सरपंचपदसुद्धा त्यांच्या वाट्याला आलेलं नव्हतं. म्हणून काय त्यांचा वकूब कमी नव्हता.

प्रतोदशेठ गल्लीत आले म्हटलं की बारकाली पोरंसोरं गोठ्यात, पोत्यात, गंजीमागं, झाडावर, गुरामागं दडून बसत. जरा टणक असलेली पोरं खाली मान खालून, गपगुमान कडेकडेनं निघून जात... मोठाली माणसं आदबीनं राम-राम घालीत. सगळा मामला जिथल्या तिथं सेट होता. पण प्रतोदशेठ राजकीयदृष्ट्या सेट होत नव्हते.

बाईमाणसासमोर मात्र प्रतोदशेठचा इलाज चालत नसे. म्हंजे बघा, प्रतोदशेठ गल्लीत आले म्हटलं की सगळे कसे गप् पडायचे. पण गल्लीतल्या बायांचा गलका काही थांबायचा नाही. नळावरच्या बायका तर जोरजोरात भांडणं करायच्या. का तर प्रतोदशेठच्या कानावर गलका जाईल अन् अजून एखादा हातपंप नाहीतर नळ गावाला मिळेल.

प्रतोदशेठची मोठमोठ्या पुढाऱ्यांत उठबस असे. त्यामुळं पाणी म्हणू नका, लाईट म्हणू नका, गटारी म्हणू नका की रस्ते म्हणू नका सगळे प्रश्न ते एका फोनवर सोडवायचे. त्यांच्या त्यागाचे किस्से तर अपरंपार आहेत.

मागे एका शेतकऱ्याची दाना-वैरण संपली म्हणून जनावरं उपाशी मरायला लागली. बायकोनं तातडीने नवऱ्याला प्रतोदशेठकडं पाठवलं. प्रतोदशेठनं मागचापुढचा विचार केला नाही. दोन बैलगाड्या भरुन त्याला वैरण दिली. घरातल्या मंडळींनी जरा आरडाओरड केली पण शेठनी ते घरातल्या घरात निभावून नेलं.

प्रतोदशेठच्या दारासमोर एक भलामोठा पाण्याचा हौद आहे. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा कायम हौद डबडबलेला. त्यामुळे गावच्या जनावरांनी कधीच पाण्याची कमी पडत नसे. गावातली काही पोरं घरात शेठ नसल्याची खात्री करुन हौदात उड्या मारीत, काहींनी तर घागरी-हांडे भरुन पाणी न्यायला सुरुवात केली. प्रतोदशेठने एकेदिवशी एकदोन जणांना असा हासडला की पुन्हा ते हौदावर फिरकले नाहीत.

पण बायामाणसं हौदावर आली की प्रतोदशेठचा नाईलाज होई. त्यांच्या नाकासमोर हंडेच्या हडे भरुन नेले जात. पण ते एक शब्द बोलले तर नवल. बाईमाणसाबद्दल त्यांचा आदर म्हणजे अपरंपार. गावातल्या एक-दोघींनी तर हौदाच्या पाण्यात धुणं धुवायचा सपाटा लावला. प्रतोदशेठच्या घरच्या मंडळींनी त्या बायकांना भांडून हाकलून लावलं होतं.

प्रतोदशेठचं हे प्रजाप्रेम वरचेवर वाढतच चाललं होतं. एखाद् दिवशी हा माणूस घरावरचं माळवद सरपण म्हणून कुणाला देईल, म्हणून घरच्यांना चिंता लागलेली. पण इकडे गावात तर प्रतोदशेठचे 'त्यागमूर्ती प्रतोदशेठ' झाले होते. राजकीय करिअरच्या बाबतीत शेठला अपेक्षा खूप होत्या.. पण ऐनवेळी अशीकाही परिस्थिती उद्भवायची की शेठ गोंधळून जाईत. त्यामुळे त्यांना मागे 'त्यागमूर्ती प्रतोदशेठ-गोंधाळले' असंही म्हटलं जाई.

यंदाच्या वेळी प्रतोदशेठनी ठरवलेलं- काहीही झालं तरी सरपंच व्हायचंच.. खूप वर्षे झाली लोकांची सेवा करुन. लोकांच्या घरचा बाजार करण्यापासून ते बियाणं भरुन पेरणी करुन देईपर्यंत कामं केली. जनावराच्या डाक्टरनी दांडी मारली तर लाळ्या, खुरकुतावरची इंजेक्शनं तेच देईत. एवढं करुनही शेठला सरपंच होता आलं नव्हतं. कारण शेठ म्हणजे त्यागमूर्ती. ऐनवेळी कुणीतरी त्यांना फसवत होतं. त्या कुणीतरीमध्ये हमखास बाईमाणूस असे.

यावेळी प्रतोदशेठ सतर्क होते. फॉर्म भरायच्या दिवशी देवदर्शन नाही ना कुणाकडे बघायचं नाही. थेट तहसीलमध्ये जावून अर्ज भरुन यायचा. प्रतोदशेठ बसथांब्यावर बसची वाट बघत होते. तेवढ्यात लांबून एक आरोळी आली. ''ओ शेठSS... प्रतोदशेठ.S..SS..थांबा'' प्रतोदशेठनी तिरक्या नजरेनं बघितलं. ओळखीतलाच कुणीतरी हाक देत होता.

धापा टाकत तो सद्गृहस्थ प्रतोदशेठजवळ थांबला. तेवढ्यात बसदेखील आली. शेठ म्हणाले, ''बोल लवकरच काय झालं?''

''झालं काय न्हाई. पर आता व्हईल. लै इपरित घडल.'' धापा टाकतच तो बोलला. बस थांबली होती. कंडक्टर बसा-बसा म्हणत होता. प्रतोदशेठ चिडले, ''आरं बोलतो का कसा? झालं काय?''

तसा तो बोलला, ''माझी बायकू फाशी घ्यायला निघाली. तुमी आल्याबिगर थांबणार न्हाई म्हण्ती. चला लवकर मरल ती. माजे लेकरं-बाळं उघड्यावर पडतील राव...'' प्रतोदशेठ पुन्हा गोंधळले, ''आर पर मी काय करु, मी सांगितलय का तिला फाशी घ्यायला.. माझा काय संबंध?''

तसा त्याने खुलासा केला ''प्रतोदशेठ तुम्ही सरपंचकी लढवीनार ना? त्यासाठीत तालुक्याला फाम भरायला निघालात. माजी बायकू मला म्हण्ती प्रतोदशेठ नगं तुमीच सरपंच झाले पाह्यजेल. नाहीतर मी फाशी घीन. मरन व बिचारी मरन. मला होऊ द्या सरपंच.. शेठS..प्रतोदशेठSS ''

प्रतोदशेठ त्याच्याकडं बघतच राहिले. काही बोलणार तेवढ्यात घुर्रर्रर्र..रुरुरुSSS करीत बस निघून गेली होती. प्रतोदशेठ शांतपणे शून्याकडं बघत थांबले होते. पुन्हा एकदा त्यांची संधी हुकली होती.

''त्यागमूर्ती प्रतोदशेठ गोंधळेंचा विजय असो.. शेठ हम तुम्हारे साथ हैंS'' तोच बायकापोरावाला घोषणा देत होता. प्रतोदशेठ घोषणेमुळे भानावर आले अन् शानदारपणे खांद्यावर गमचा टाकून ऐटीत तिथून निघून गेले.. त्यांची त्यागभावना पुन्हा उफाळून आली होती म्हणे.

Gofan Article
गोफण| काका चिडले पण नमोभाईंपुढे करणार काय?
Gofan Article
गोफण| नमोभाईंची 'ही' खेळी दादारावांना पटली नाही
Gofan Article
गोफण| गद्दार, खोके, लाचार, खंजीर... अन् मुलाखत संपली!
Gofan Article
गोफण | जंगलाचाही एक कायदा असतो, पण इथे...
Gofan Article
गोफण | बंद दाराआडची गुपितं
Gofan Article
गोफण | गुगलीने घेतली विकेट!
Gofan Article
गोफण | मम्मी मेरी शादी कर दो Gofan
Gofan Article
गोफण| ऐका हो ऐकाSS.. कोण जास्त लोकप्रिय?
Gofan Article
गोफण | 'काळा चष्मा घातल्यावर पित्त वाढत नस्तंय'
Gofan Article
गोफण| थू..थूS..थूSS...!
Gofan Article
गोफण| तुमची 'केरळ स्टोरी' वेगळी आमची वेगळी...
Gofan Article
गोफण | पराभव जिव्हारी लागला अन् मोटाभाई दिल्लीकडे निघाले...
Gofan Article
गोफण | खरं सांगा, राजीनाम्याची आयडिया कुणाची होती?
Gofan Article
गोफण | एका दगडात पक्षी तरी किती मारावेत
Gofan Article
गोफण| फडतूस नहीं काडतूस!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com