Father's Day : 'बाप डोईवरची सावली असतो...' वडिलांच्या आठवणीत अमोल कोल्हे भावूक

Amol Kolhe
Amol Kolhe esakal

डॉ.अमोल कोल्हे

खरं तर अगदी १५-२० वर्षांपूर्वी Father’s Day साजरा केला पाहिजे, असं कुणी आपल्याकडे म्हटलं असतं तर काय खुळचटपणा आहे? अशी सहज प्रतिक्रिया उमटली असती. कारण बापाचं नातं भावनिक कमी आणि कर्तव्य जास्त, अधिकार जास्त असेच संस्कार आपल्यावर कायम झालेले असतात. त्यातही पुरुषसत्ताक समाजव्यवस्था म्हटलं की हे ओघानं आलंच.

आज तिशी चाळिशी मधील कुणी आठवून पाहिलं तर “ वडील माझ्याशी अगदी मित्रासारखे वागतात” हे वाक्य आपल्यासाठी शाळेत किंवा कॉलेजमध्ये असतानाही अनेकांसाठी दुर्मिळ होतं. बाप म्हणजे धाक, बाप म्हणजे दरारा हे अनेकांसाठी समीकरण होतं.. आणि तारुण्याच्या उंबरठ्यावर पाय ठेवल्यावर “ आयुष्यात चुकलेला, आपल्यासाठी काहीच भव्य न करू शकलेला खलनायक म्हणजे बाप” हे कित्येकांच्या डोक्यात डोकावून गेलेले विचारही नाकारता येणार नाहीत.

Amol Kolhe
Manipur Violence: मणिपूर भारताचा भाग आहे का? असेल तर पंतप्रधान शांत का? विरोधकांनी विचारला सवाल

पण पोराच्या पायाला काटा टोचू नये म्हणून आपल्या पायांच्या भेगांचा विचार न करणारा, पोराला जग दिसावं म्हणून त्याला खांद्यावर उचलून घेणारा, पोरांना चांगले कपडे मिळावेत म्हणून भोकं पडलेलं बनियन घामेजलेल्या शर्टखाली लपवून राबणारा, कुटुंबाचा डोलारा सांभाळण्यासाठी बाहेरच्या जगात होणारे मानापमान मनातल्या मनात गिळणारा, कधी शेतात राबणारा, कधी लोकलच्या, बसच्या वाऱ्या करणारा, ऑफिस मध्ये बॉसची बोलणी खाऊनही काही घडलं नाही अशा आविर्भावात घरी येणारा,

लेकरांच्या लहानशा यशानं देखील काळीज सुपाएवढं होणारा, चुकून अपयश आलं तर स्वतः लाच दोष देणारा, फक्त लेकीची सासरी पाठवणी करताना जाहीरपणे रडण्याची मुभा असणारा आणि आयुष्यभर खपून उभ्या केलेल्या घरट्यात पिल्लं बापापेक्षा भावनिक दृष्ट्या आईच्याच जवळ असतात याने अजिबात असूया न बाळगणारा बाप अनेकदा समजत नाही आणि डोळ्यासमोर असूनही दिसत नाही… तो असेपर्यंत! आणि माझ्या वडिलांचं एक वाक्य होतं –“ हे तुला बाप झाल्याशिवाय कळणार नाही!”

प्रामाणिकपणे सांगायचं तर याबाबत मी खूप नशीबवान होतो. लहानपणी धाक, दरारा या सर्व गोष्टी होत्याच. म्हणजे एवढं की पप्पांच्या बुलेट चा आवाज आला तरी आम्ही आतील खोलीत धूम ठोकायचो. पण अभ्यास आणि शिस्त या दोन गोष्टींकडे त्यांचा कटाक्ष असायचा. फाजील लाड अजिबात नाही पण गणेशोत्सवात पुण्याला गणपती दाखवायला नेण्यापासून ते दिवाळीला पुण्यात लक्ष्मी रोड ला जाऊन आवर्जून चांगले कपडे घेण्याची हौस हमखास पुरवली जायची. खाण्यापिण्याची ददात कधीच नव्हती. पण त्यातही इयत्ता ९ वी मध्ये पुण्यात हॉस्टेलला राहायला गेल्यावर आमच्यात अगदी आदरयुक्त मित्रत्वाचं नातं निर्माण झालं.

Amol Kolhe
''मराठवाड्याचं पाणी बारामतीने पळवलं नाही, विलासरावांच्या नेतृत्वाखाली झाला होता एक निर्णय'' पवार म्हणाले...

मी बारावीत शिकत असताना पप्पांना पक्षाघाताचा झटका आला. परंतु हॉस्पिटलमधून बाहेर आल्यावर आपल्या आजारपणामुळे मुलाचं अभ्यासात नुकसान नको हीच काळजी त्यांना होती. त्या कठीण दिवसांनी एक महत्वाची गोष्ट माझ्या मनावर कोरली. बारावी चे वर्ष होते. जवळपास संपूर्ण डिसेंबर महिना घर आणि हॉस्पिटल यांच्या फेऱ्या करण्यात गेला होता. त्यामुळे अनेकांचा सल्ला होता की एक वर्ष ड्रॉप घ्यावा. पण पप्पांनी एका रात्री मला जवळ बोलावलं आणि सांगितलं की माझ्या आजारपणामुळे तुझं वर्ष वाया गेलं तर मला अपराधी वाटेल.

आपल्या वडलांची मान कधीच खाली जाऊ नये असं प्रत्येकाला वाटतं.. त्याला मी कसा अपवाद असेन? आणि त्याचा परिणामही दिसून आला. बारावीला बोर्डात येऊन एमबीबीएससाठी जी. एस. मेडिकल कॉलेजला ऍडमिशन सुद्धा मिळाली. पण त्याहीपेक्षा या घटनेनं आयुष्यात फार काही शिकवलं. भिंतीला पाठ लागल्यावर उसळणे, अशक्य ते शक्य करून दाखवणं, स्वतःच्या क्षमतांना आव्हान देणे असं सगळ्या सेल्फ हेल्प किंवा motivational पुस्तकांमध्ये लिहिलेलं असतं ते मी प्रत्यक्ष अनुभवू शकलो..

आणि त्याबरोबर पप्पांचा एक सल्ला कायम लक्षात राहील – “आयुष्यात कोणताही निर्णय चुकीचा नसतो. पण पुढे भविष्यात मागे घेतलेला निर्णय बरोबरच होता हे सिद्ध करण्याची जबाबदारी तुमच्यावर असते!” अनेकदा वाटून जातं हे जगण्याच्या संघर्षातून तावूनसुलाखून निघालेलो तत्वज्ञान आहे.

पप्पा गेले त्यावेळी “स्वराज्य रक्षक संभाजी” मालिकेचं चित्रीकरण सुरू होतं.. ५-६ दिवसांत सर्व विधी पूर्ण करून मी शूटिंगसाठी रुजू झालो होतो. आणि त्याच दरम्यान चॅनल meeting मध्ये मी समोरच्या white बोर्ड वर पटकथेचे मुद्दे लिहीत होतो आणि मागे अचानक शांतता जाणवली. मी वळून पाहिलं.. रूम मधील वातावरण काहीसं भावूक झालं होतं.. मी नुकताच पप्पा गेल्याच्या दुःखातून सावरत होतो आणि समोर छत्रपती शिवाजी महाराजांचे महानिर्वाण आणि शंभूराजांची ओढाताण यांचे प्रसंग लिहीत होतो.. रील लाईफ आणि रिअल लाईफ यांची अशी सांगड होईल याचा स्वप्नातही विचार केला नव्हता.

पप्पांबरोबर अनेकदा चर्चा आणि वाद सुद्धा व्हायचे. पण निष्कर्ष न निघणाऱ्या अनेक गोष्टींचा समारोप “तुला काय कळतं?” यापेक्षा “तुला बाप झाल्यावर कळेल!” या वाक्याने होत असे. आज ते वाक्य पदोपदी जाणवत राहतं. कदाचित म्हणूनच “ मी इतका बिझी होतो की माझ्या मुलांना मी झोपेतच मोठं होताना पाहिलं” या अनेक यशस्वी लोकांच्या वाक्याची मला कधीच भुरळ पडली नाही.

आद्या आणि रुद्र यांच्या प्रत्येक developmental mile stone चा मी साक्षीदार आहे. अनेकदा आता राजकारणात असूनही मी रविवारी कार्यक्रम घेणे टाळतो आणि मी हा वेळ कुटुंबाला देतो. कलाकार, निर्माता आणि खासदार अशा भूमिका पार पाडताना नक्कीच तारांबळ होते. पण त्यातही शक्य तेवढा quality time देण्याचा माझा प्रयत्न असतो. मग कधी आवर्जून वेळ काढून खेळणं असेल कधी फिरणं असेल कधी फक्त गप्पा मारणं असेल. पण एक वस्तुस्थिती नाकारून चालत नाही.

राजकारणात सक्रिय असलेल्या अनेक ‘ बापांची ‘ जबाबदारी आईला पार पाडावी लागते आणि मीही याला अपवाद नाही. मग मुलांना शाळेत सोडायला किंवा क्लासेस ला घेऊन जाणाऱ्या बापाला बघून आपण चुकतोय का असं कधीकधी वाटून जातं.. आणि सकाळी बाईक वर रुद्रला शाळेत सोडून मग दिल्लीची flight पकडून संसदेचे अधिवेशन attend करणं किंवा मतदार संघाचा दौरा आटोपून आद्याला आवडते. म्हणून माटुंग्याला फूटपाथवर बैठक मारुन चटई पावभाजी खाणं असेल..

या सर्वसामान्य बापाच्या आयुष्यातील गोष्टी achievement वाटू लागतात तेव्हा अनेक प्रश्न मनात वावटळीसारखे फेर धरतात पण पदाचे स्टेटसचे जोडे घराच्या उंबरठ्याबाहेर काढून घरात प्रवेश करताच मुलं मिठी मारतात आणि “ we are proud of you” म्हणतात तेव्हा मिळणारं समाधान कोणत्याही पदापेक्षा, पुरस्कारापेक्षा लाखमोलाचं असतं.. आणि हीच ऊर्जा असते जगातल्या प्रत्येक बापासाठी अविरत लढण्याची.

आज माझ्या घरातील देवघरात पप्पांचा फोटो आहे कारण ज्या देवांची पूजा करतो त्यांच्यापैकी कुणालाच मी पाहिलं नाही, भेटलो नाही पण ज्या माणसाने माझ्यासाठी खस्ता खाल्लेल्या मी पहिल्या, अनुभवल्या तो माझ्यासाठी देवाहून कमी कसा असेल?

म्हणूनच आज father’s day च्या निमित्ताने बापाला कडकडून मिठी मारा आणि मनापासून “thank you” म्हणा. कारण तुमच्या आयुष्यात ती अशी व्यक्ती आहे ज्या व्यक्तीला तुमच्याकडून हरण्यात सुद्धा जग जिंकल्याचं समाधान मिळतं.. आणि त्या बापाचं असणं सावलीसारखं असतं… डोईवर असेपर्यंत महत्व कळत नाही आणि निघून गेल्यावर मागूनही मिळत नाही…

Happy Father’s Day!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com