Niropya' Magazine : एकशे एकवीस वर्षांचे एक सर्वाधिक दीर्घायु मराठी मासिक `निरोप्या'

‘निरोप्या’ हे मासिक 1903 च्या एप्रिल महिन्यापासून सुरू
Niropya' Magazine
Niropya' Magazineesakal

Niropya' Magazine : बाळशास्त्री जांभेकरांनी 1832 साली ‘दर्पण’ मासिक सुरू करून मराठी वृत्तपत्रकारितेचा पाया रोवला. त्यानंतर मराठी भाषेत अनेक नियतकालिके सुरू करण्यात आली. यापैकी बहुतेक नियतकालिके आज काळाच्या ओघात गडप झाली आहेत.

Niropya' Magazine
Travel Story : मे महिन्यात फिरायला जायचंय ? ही ठिकाणं आहेत उत्तम

‘ज्ञानोदय’ हे 1842 साली सुरू झालेले नियतकालिक आजही पुण्यातून प्रसिद्ध होत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील वळण या आजही अत्यंत आडवळणाच्या ठिकाणी असलेल्या खेडेगावी फादर हेन्री डोरिंग या येशूसंघीय (जेसुईट) जर्मन धर्मगुरूने ‘निरोप्या’ हे मासिक 1903 च्या एप्रिल महिन्यापासून सुरू केले. हे मासिक अजूनही पुण्यातून प्रकाशित होत आहे.

Niropya' Magazine
सचिनकडे आहेत आलिशान गाड्या त्यांची किंमत म्हणजे.... | Sachin Tendulkar car collection

4 जानेवारी 1881 पासून गोपाळ गणेश आगरकर यांच्या संपादकत्वाखाली ‘केसरी’ हे नियतकालिक सुरू झाले.

त्यामुळे सर्वाधिक दीर्घायुषी ठरलेल्या मराठी नियतकालिकांमध्ये ‘निरोप्या’ या मासिकाने या एप्रिल २०२३च्या महिन्यात एकशेएकविसाव्या वर्षांत पदार्पण केले आहे ही बाब कौतुकास्पद आहे. आर्थिकदृष्टया स्वतःच्या पायावरही उभा राहिला आहे हे या मासिकाच्या रंगीत पानांच्या जाहिरातीवरून दिसून येते.

Niropya' Magazine
Car Tips : कार चालवतांना अचानक क्लच अडकतोय? या टिप्स करतील १००% मदत...

मराठी भाषिक कॅथोलिक समाजाची आध्यात्मिक गरज भागविणाऱ्या, या समाजातील सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील वृत्त पुरविणाऱ्या या मासिकाची महाराष्ट्रातील विविध भागातील त्याचप्रमाणे देशातील इतर राज्यातील मराठी भाषक ख्रिस्ती वाचक आतुरतेने प्रतीक्षा करत असतात. यावरून या मासिकाची लोकप्रियता लक्षात येते.

Niropya' Magazine
Tata ची सगळ्यात जास्त विकली जाणारी कार घरी आणा फक्त 1.5 लाखांत, वाचा सविस्तर

हिंदू मागासवर्गीय जातींतून नव्यानेच ख्रिस्ती धर्मात आलेल्या अशिक्षित, आर्थिकदृष्ट्या अत्यंत मागास असलेल्या समाजासाठी विसाव्या शतकाच्या सुरुवातीस नियतकालिक सुरू करणारे फादर हेन्री डोरिंग हे धर्मगुरू निश्‍चितच द्रष्ट्ये मिशनरी होते हे यावरून दिसून येते.

‘निरोप्या’च्या या संस्थापकाचे त्यामुळे मराठी भाषिक ख्रिस्ती समाजावर आणि त्याचप्रमाणे मराठी भाषेवर मोठे ॠण आहेत.

Niropya' Magazine
Tata Cars : टाटा कंपनीनं वाढवल्या कार्सच्या किंमती, नेक्सॉनसह या कार्स 1 मे पासून होणार महाग

विशेष म्हणजे ‘ज्ञानोदय’ आणि ‘निरोप्या’ ही मराठीतील दोन्ही दीर्घायुषी मासिके मराठी भाषिक ख्रिस्ती समाजाची मुखपत्रे आहेत. ‘ज्ञानोदय’ हे रेव्ह. हेन्री बॅलन्टाईन या अमेरिकन धर्मगुरूने सुरू केलेले नियतकालिक प्रॉटेस्टंट समाजात, तर ‘निरोप्या’ हे कॅथोलिक समाजात प्रामुख्याने वितरित केले जाते.

या मासिकांचा खप केवळ ख्रिस्ती समाजापुरताच मर्यादित असला तरी महाराष्ट्रातील सामाजिक स्थित्यंतराचे या नियतकालिकांत प्रतिबिंब उमटत असल्याने संपूर्ण मराठी समाजाची ही मासिके एक महत्त्वाचा सांस्कृतिक ठेवा आहेत.

Niropya' Magazine
Upcoming Tata Cars : आता टाटाच्या या दोन गाड्यांमध्ये मिळणार इलेक्ट्रिक आणि सीएनजी पॉवरट्रेन

हेन्री डोरिंग यांचा जन्म जर्मनीत बोकोल्ट येथे 13 सप्टेंबर 1859 रोजी झाला. 1882 मध्ये त्यांना गुरुदीक्षा मिळाली. 1895 मध्ये फादर डोरिंग यांचे अहमदनगर जिल्ह्यातील राहुरीपाशी असलेल्या वळण येथे आगमन झाले. वळण शेजारी असलेले केंदळ हे गाव अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे.

या खेडेगावातूनच कॅथोलिक मिशनरींनी महाराष्ट्रातील ग्रामीण भागात सर्वप्रथम धर्मप्रसार सुरू केला. आज अहमदनगर, औरंगाबाद, नाशिक, बीड, पुणे या जिल्ह्यात मराठी भाषिक कॅथोलिक ख्रिस्ती समाजाची मोठी संख्या आहे. यापैकी बहुसंख्य लोकांनी पूर्वाश्रमीच्या हिंदू महार या अस्पृश्‍य जातीतून ख्रिस्ती धर्मात प्रवेश केला.

Niropya' Magazine
Tata Harrier : 11 महिन्यांपूर्वी खरेदी केली होती टाटा हॅरियर, भर रस्त्यात गाडी पेटली

फादर डोरिंग वळण येथे आले तेव्हा अहमदनगर जिल्ह्यातील मिशनकार्य नुकतेच सुरू झाले होते. अस्पृश्‍य जातीतून अनेकजण ख्रिस्ती धर्मात येत होते तरी केवळ धर्मांतरामुळे त्यांच्या सामाजिक वा शैक्षणिक परिस्थितीत एकदम मोठा बदल होत नव्हता.

या नवख्रिस्ती समाजाला शिक्षित करण्यासाठी मिशनऱ्यांनी प्राथमिक शाळा सुरू केल्या. या नवसाक्षरांसाठी ख्रिस्ती धर्माचे ज्ञान देण्यासाठी मग या मिशनऱ्यांनी स्वतः मराठी भाषेचे ज्ञान प्राप्त करून घेतले आणि नंतर या भाषेत धर्मशिक्षणाची पुस्तकेही तयार केली.

Niropya' Magazine
Lungs Health : नुसती सिगारेट सोडली म्हणजे झालं नाही फुप्फुसांचं आरोग्यही सुधारा

फादर डोरिंग वळणला येण्याआधीच काही मिशनऱ्यांनी मराठी भाषेत धर्मशिक्षणाची काही पुस्तके लिहिली होती असे दिसते. अहमदनगर आणि नजिकच्या जिल्ह्यातील कॅथोलिक समाजातील पहिल्या पुस्तकाचा मान ‘लहान कॅथेखिसम’ या धर्मशिक्षणविषयक पुस्तकाला मिळतो.

या पुस्तकाच्या लेखकाच्या नावाची नोंद मिळत नसली तरी या पुस्तकाचे लेखक केंदळ वळणमध्येच काम करणारे फादर दालिंग असावेत असे फादर डॉ. ख्रिस्तोफर शेळके यांनी म्हटले आहे.

Niropya' Magazine
Tech Tips : चुकीच्या UPI आयडीवर पेमेंट केले? पैसे परत मिळण्यासाठी हे काम लगेच करा

मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील असणारे आणि रोम येथील विद्यापीठात तौलनिक धर्मशास्त्राचे प्राध्यापक असणारे फादर शेळके यांनी अहमदनगर जिल्ह्यातील ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या कार्यावर संशोधन केलेले आहे.

फादर शेळके पुढे म्हणतात की, फादर डोरिंग केंदळ वळण येथे स्थायिक झाले तेव्हा त्यांना स्थानिक लोकांमध्ये ‘सुभक्तीसार’ या शीर्षकाचे धर्मशिक्षणाचे पुस्तक सर्वाधिक लोकप्रिय आहे असे आढळले.

फादर डोरिंग यांच्या आधी म्हणजे 1892 च्या मध्यास केंदळ येथे आलेल्या फादर फ्रान्सिस ट्रेनकाम्प यांनी ‘सुभक्तीसार’ हे पुस्तक 1895 पूर्वी लिहून प्रसिद्ध केले. फादर ट्रेनकाम्प यांनी मराठी भाषेचा चांगला अभ्यास केला.

या पुस्तकासाठी त्यांनी पुण्या-मुंबईच्या पुस्तकात आढळणाऱ्या भाषेऐवजी अहमदनगर जिल्ह्यात प्रचलित असलेल्या बोलीभाषेचा वापर केला. थोडेफार शिक्षण झालेले नवख्रिस्ती लोक या पुस्तकाचा वापर करत. देवळात मिस्साच्या वेळी प्रार्थना करण्यासाठीही धर्मगुरू या पुस्तकाचा वापर करत असत.

धर्मकार्यासाठी अहमदनगर जिल्ह्यात स्थायिक झालेल्या फादर डोरिंग यांना केवळ ‘लहान कॅथेखिसम’, ‘मोठे कॅथेखिसम’ या भाषांतरित आणि ‘सुभक्तीसार’ या पुस्तकांचाच उपयोग करावा लागत असे.

त्याकाळी मिशनऱ्यांना आपल्या घरापासून लांबवर असलेल्या खेडेगावात उपदेशासाठी, मिस्सासाठी जावे लागत असे. ग्रामीण भागातील अशिक्षित लोकांना ख्रिस्ती धर्माचे मराठीतून धर्मज्ञान देण्यासाठी त्याकाळी मराठी भाषेत पुस्तकेच नसल्याने या भाषेत धर्मविषयक साहित्याची निर्मिती करण्याची गरज फादर डोरिंग यांना भासू लागली.

अशा प्रकारचे साहित्य नसल्याने लहान मुलांना आणि प्रौढांना ख्रिस्ती धर्माची शिकवण देणाऱ्या धर्मशिक्षकांना किंवा पालकांना त्यांचे कार्य करणे कठीण जात होते.

या समस्येवर उपाय म्हणून फादर डोरिंग यांनी मराठी भाषेतून धर्मविषयक माहिती देणारे मासिक सुरू करण्याचे ठरविले. येशूसंघाच्या अधिकाऱ्यांनी या मासिकासाठी आर्थिक मदत देण्याचे मान्य केले.

अशाप्रकारे 1903 च्या एप्रिल महिन्यात फादरनी ‘येशूच्या अतिपवित्र हृदयाचा निरोप्या’ या आपल्या मासिकाचा पहिला अंक प्रसिद्ध केला.

तेव्हापासून पहिल्या महायुद्धाच्या काळातील काही वर्षांचा अपवाद वगळता ‘निरोप्या’ आजपर्यंत नियमितपणे प्रकाशित होत आहे.

येसूसंघ या कॅथोलिक धर्मगुरूंच्या संस्थेच्या मालकीचे हे नियतकालिक असल्याने केवळ एक अपवाद वगळता गेली १२० वर्षे येशूसंघीय धर्मगुरूच या मासिकाच्या संपादनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

फादर डोरिंग यांनी ‘निरोप्या’सुरू केल्यानंतर या मासिकात लिहिण्यासाठी स्वतःच्या मराठी भाषेच्या ज्ञानात अधिक भर घालण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

अहमदनगर जिल्ह्यातील लोकांची बोलीभाषेतील शब्द, हिंदू धर्मसाहित्यात वापरले जाणारे शब्द तसेच संकल्पना ते शिकले. या ज्ञानाचा वापर करून आपले मासिक नवसाक्षर नवख्रिस्ती लोकांसाठी अधिकाधिक उपयुक्त करण्याचा ते प्रयत्न करू लागले.

फादर डोरिंग हे या मासिकाचे संपादक आणि लेखकही होते. सुरुवातीच्या काळात ‘निरोप्या’ मुंबईतील ‘एक्झामिनर’ प्रेसमध्ये छापले जात असे. ‘निरोप्या’च्या पहिल्या अंकाची एकूण दहा पाने होती आणि त्यात पाच विषयांवर लेख होते.

एप्रिल महिन्यासाठी प्रार्थनेचा विषय, पवित्र मिस्साचा चाकर होणे, लिओ तेरावे परमगुरुस्वामींचा (पोप) सण, तुझे राज्य येवो आणि एक रक्तसाक्षी (हुतात्मा) हे ते पाच विषय होत.

राहुरी तालुक्यातील एका आडवळणाच्या ठिकाणी ‘निरोप्या’च्या संपादकांचे वास्तव्य होते आणि त्यांचे मासिक तर मुंबईतून प्रसिद्ध होत होते. त्यामुळे अंक वेळेवर छापला जाईल यासाठी संपादकांना खास प्रयत्न करावे लागत असत.

आपल्या या मासिकाचा चौथा अंक तर खुद्द संपादक महाशयांनीच सरळ स्वतःच्या हाताने लिहून काढला होता असे दिसते. हा अंक त्यावेळी का छापला गेला नाही हे आजही स्पष्ट होत नसले तरी या मासिकाच्या हस्तलिखित प्रतींवरून आपले नियतकालिक वेळेवर प्रकाशित झाले पाहिजे याबद्दल फादर डोरिंग विशेष आग्रही होते हे दिसून येते.

‘निरोप्या’तून ख्रिस्ती संतांची चरित्रे आणि ख्रिस्ती जगातील विविध घडामोडींविषयी लेख असत. शंभरी गाठलेल्या या मासिकात आजही ही सदरे प्रसिद्ध होत आहेत.

त्याशिवाय ख्रिस्ती अध्यात्मात अभिजात वाङ्मय समजल्या जाणाऱ्या इमिटेशन ऑफ ख्राईस्ट या लॅटिन पुस्तकाचा अनुवादही त्यांनी या मासिकातून क्रमशः प्रसिद्ध केला. ‘ख्रिस्तानुवर्तन’ या नावाने या पुस्तकाच्या तिसऱ्या अध्यायापर्यंत हे पुस्तक ‘निरोप्या’तून प्रकाशित केले गेले.

दर महिन्याला नियमितपणे प्रभूचा संदेश घेऊन ‘निरोप्या’ हे चिमुकले मासिक अहमदनगर आणि शेजारच्या जिल्ह्यातील खेड्याखेड्यांतून प्रवासाला निघत असे.

त्याकाळी पुस्तकांची किंवा मासिकांची वानवाच असल्याने या छोट्याशा नियतकालिकाने शंभर वर्षांपूर्वीच्या ग्रामीण भागातील ख्रिस्ती धर्मीय वाचकांची वाचनाची आणि अध्यात्माची भूक भागविली असणार.

1907 मध्ये फादर डोरिंग यांची पुणे धर्मप्रांताचे महागुरुस्वामी किंवा बिशप म्हणून नेमणूक झाली. केंदळ वळण येथे असताना त्यांना केवळ आपल्या धर्मग्रामाची जबाबदारी सांभाळावी लागे.

बिशप झाल्यानंतर त्यांना आता संपूर्ण पुणे धर्मप्रांतात येणाऱ्या विविध जिल्ह्यांच्या धर्मग्रामांचे धर्माधिकारी म्हणून काम पाहावे लागत असे. त्याकाळच्या पुणे धर्मप्रांतात पुणे, अहमदनगर, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी, सातारा, सांगली वगैरे जिल्ह्यांचा परिसर येत असे.

बिशप म्हणून डोरिंग यांची जबाबदारी अनेक पटींनी वाढली तरीसुद्धा या साहेबांनी ‘निरोप्या’ चे संपादन आणि लेखन सोडले नाही. ‘निरोप्या’च्या संपादकांची धर्मगुरुपदावरून महाधर्मगुरुपदावर बढती होऊन पुण्याला बदली झाली तसे या मासिकाचे प्रकाशनस्थळही पुण्याला हलविण्यात आले.

पहिल्या महायुद्धाला तोंड फुटले तेव्हा बिशप डोरिंग पोपमहाशयांना भेटण्यासाठी रोम येथे गेले होते मूळचे जर्मन असलेल्या बिशपांना ब्रिटिशांची वसाहत असलेल्या आपल्या कर्मभूमीत परतणे अशक्य झाले.

पोपनी जपानमधील हिरोशिमा धर्मप्रांताचे अपोस्तोलिक व्हिकर म्हणून त्यांची 1921 साली नेमणूक केली. या काळातच आर्चबिशप हे ख्रिस्ती महामंडळातील आणखी एक उच्च पद त्यांना देण्यात आले.

जपानमध्ये नेमणूक झाल्यानंतरही आपल्या कर्मभूमीत परतण्याची डोरिंग यांची तीव्र इच्छा असावी असे दिसते, कारण ब्रिटिश सरकारची परवानगी मिळताच त्यांनी पुन्हा 1927 साली पुणे धर्मप्रांतातील मराठी ख्रिस्ती समाजाचे मेंढपाळ म्हणून पुन्हा एकदा सूत्रे हाती घेतली.

पुण्यात परतल्यानंतर केवळ सहाच महिन्यात म्हणजे जून 1928 मध्ये त्यांनी बंद पडलेल्या ‘निरोप्या’चे पुन्हा एकदा आधीच्याच उत्साहाने प्रकाशन सुरू केले. ‘निरोप्या’ त्याच्या गुरूप्रमाणेच (येशू ख्रिस्ताप्रमाणे) पुनरुत्थित झाला’’ असे या घटनेचे फादर ख्रिस्तोफर शेळके यांनी वर्णन केले आहे.

‘निरोप्या’ हे मराठी भाषिक कॅथोलिक समाजाचे सर्वात पहिले मुखपत्र. गेले एक शतक हे मासिक महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कॅथोलिक कुटुंबांमध्ये नियमितपणे जात आहे.. त्यादृष्टीने आर्चबिशप डोरिंग यांनी या समाजास मोठे उपकृत करून ठेवले आहे यात शंकाच नाही.

1981 साली या मासिकाची वार्षिक वर्गणी केवळ तीन रुपये हेाती आणि किरकोळ अंकाची किंमत तीस पैसे होती. पुण्यातल्या रामवाडी इथल्या आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या पेपल सेमिनरीचे रेक्टर असलेले फादर भाऊसाहेब संसारे हे जेसुईट धर्मगुरु निरोप्याचे आताचे संपादक आणि माधव खरात व्यवस्थापक आहेत.

नारायण पेठेत मॅजेस्टिक प्रकाशनासमोर स्नेहसदन येथे निरोप्याचे कार्यालय आहे. आज रंगीत मुखपृष्ठ असलेल्या आणि एकूण ४० पाने असलेल्या या मासिकाची वार्षिक वर्गणी दोनशे रुपये आहे.

आर्चबिशप डोरिंग यांच्या ‘निरोप्या’ने मराठी भाषिक कॅथोलिक समाजात वाचनाची आवड निर्माण करण्याबरेाबरच या समाजात लेखकांच्या आणि कवींच्या पिढ्या निर्माण करण्याचेही मोठे योगदान दिले आहे.

मराठी सारस्वतात पुढे मोठे नाव कमाविणाऱ्या अनेक कॅथोलिक आणि प्रॉटेस्टंट पंथीय लेखकांना त्यांच्या उमेदवारीच्या काळात ‘निरोप्या’ ने त्यांना हक्काचे एक व्यासपीठ मिळवून दिले. आचार्य सत्यवान नामदेव सूर्यवंशी, फादर फ्रान्सिस दिब्रिटो, कवी विश्‍वासकुमार आदी नामवंत साहित्यिकांचा ‘निरोप्या’च्या लेखकांमध्ये समावेश होतो.

निरोप्या'विषयी मला विशेष आत्मियता असण्याचे एक कारण म्हणजे माझा पहिला लेख आणि पहिली बायलाईन याच मासिकात १९७० च्या दशकात मी श्रीरामपुरात शाळेत शिकत असताना प्रसिद्ध झाली.

वि स. खांडेकरांच्या 'ययाती' कादंबरीच्या रुपाने मराठी भाषेला पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला, त्याविषयी `निरोप्या'त माझा पन्नासेक शब्दांचा लेख तेव्हाचे संपादक फादर प्रभुधर (नंतर माझे गॉडफादर - यांनी प्रसिद्ध केला.

आपले साहित्य आणि नाव पहिल्यांदाच छापून आल्यामुळे मिळणाऱ्या आनंदाचा अनुभव मलासुद्धा ‘निरोप्या’मुळेच लाभला. साल होते १९७४ आणि माझे वय १५ वर्षे. ती माझी पहिली बायलाईन. त्यावेळी भविष्यात पत्रकार म्हणून लिखाण हाच माझा पोटापाण्याचा व्यवसाय असेल याची मी कल्पनाही केली नव्हती.

एखाद्या नियतकालिकाच्या प्रकाशन स्थळात अगदी क्वचितच बदल होतात. ‘निरोप्या’च्या शंभर वर्षांच्या आयुष्यात मात्र असे प्रसंग अनेकदा घडून आलेले दिसतात. याचे कारण म्हणजे ‘निरोप्या’चे मालकीहक्क असणाऱ्या येशूसंघाचे धर्मप्रांताधिकारी यांच्यामार्फत ‘निरोप्या’च्या संपादकांची नेमणूक केली जाते.

नव्या संपादकांच्या नियुक्तीनंतर हे मासिकही ते संपादक ज्या धर्मग्रामात कार्यरत असतात तेथून प्रसिद्ध होत राहिले आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील केंदळ वळण, श्रीरामपूर, पुणे, कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा, सातारा जिल्ह्यातील कराड, त्याचप्रमाणे नाशिक वगैरे ठिकाणी ‘निरोप्या’चे कार्यालय सातत्याने स्थलांतरित होत राहिले.

या विविध जिल्ह्यांतील ख्रिस्ती धर्मियांनी अर्थातच त्यामुळे ‘निरोप्या’ची साथ सोडली नाही. त्यांच्या अनेक पिढ्यांनी या चिमुकल्या नियतकालिकावर आपली वाचनाची आणि अध्यात्माची भूक भागविली आहे.

‘निरोप्या’कार आर्चबिशप डोरिंग यांनी मराठी साहित्याला आणखी एक मोठे योगदान दिले आहे. सतराव्या शतकात गोमंतकात मराठी भाषेत लिहिले गेलेले ‘क्रिस्तपुराण’ हे अस्सल देशी महाकाव्य त्यांनी महाराष्ट्रात उजेडात आणले.

‘क्रिस्तपुराणा’ची रचना फादर थॉमस स्टीफन्स या मूळच्या इंग्रज येशूसंघीय धर्मगुरूंनी 1616 साली केली. मात्र त्याकाळात गोव्यात देवनागरी मुद्रणकला विकसित झाली नसल्याने त्यांना ते छापावे लागले.. रोमन लिपीत असल्याने मराठी सारस्वताचे या अभिजात वाङ्मयाकडे तीन शतके लक्षच गेले नाही.

आर्चबिशप डोरिंग यांनी या महाकाव्याचा अभ्यास केला व या साहित्याचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांनी या पुराणातील येशू ख्रिस्ताच्या चरित्रावर आधारित काही भागांचे देवनागरीत लिप्यांतर करून त्यांच्या तीन पुस्तिका प्रकाशित केल्या.

अशाप्रकारे मराठी भाषेत असूनही रोमन लिपीमुळे मराठी भाषिकांपासून दुरावलेल्या या महाकाव्याचा निदान काही भाग तरी आर्चबिशप डोरिंग यांच्यामुळे प्रथमतःच मराठी भाषिकांना प्राप्त झाला. हे संपूर्ण महाकाव्य 1956 साली शांताराम बंडेलू यांनी देवनागरीत आणून य. गो. जोशी यांच्या प्रसाद प्रकाशनाने प्रकाशित केले.

मराठीत साहित्यसंपदा असणारे आजचे पुण्याचे बिशप थॉमस डाबरे हे आर्चबिशप हेन्री डोरिंग यांचे उत्तराधिकारी आहेत. 1949 मध्ये वृद्धत्वामुळे आर्चबिशप डोरिंग यांनी निवृत्ती स्वीकारली आणि त्यांच्या जागी अँड्र्यू डिसोझा या धर्मगुरूंनी पुण्याचे पहिले भारतीय बिशप म्हणून सूत्रे हाती घेतली.

‘निरोप्या’तून शेवटचे बोधपत्र लिहून या मेंढपाळाने आपल्या कळपाचा निरोप घेतला. ‘निरोप्या’च्या अंकात प्रसिद्ध झालेले हे बोधपत्र पुढीलप्रमाणे आहे.

‘येशू ख्रिस्तामध्ये अतिप्रिय लेकरांनो, ईश्‍वराने तुम्हांस पुष्कळ वर्षे माझ्या हवाली केले, तरी आता तुम्हांस माझा शेवटचा सलाम सांगण्याची वेळ आली. 42 वर्षांपूर्वी 10वे प्रिय परमगुरुस्वामी यांनी मला पुण्याचे महागुरू म्हणून नेमिले आणि बायदरलीदन बिशपच्या जागी मला पुणे धर्मप्रांताचा अधिकार दिला.

सात वर्षे माझ्या कळपामध्ये शांतीने काम करता आले. मग पहिले महायुद्ध सुरू झाले, त्यावेळी मी परमगुरुस्वामींची भेेट घ्यायला रोम शहरी गेलो होतो. पुण्याला परत जाण्याचे माझे सर्व प्रयत्न व्यर्थ निघाले. मला माझ्या प्रिय लेकरांपासून लांब राहणे भाग पडले.

युद्ध संपल्यावर परमगुरुस्वामींनी मला जपान देशाला पाठविले. हिरोशिमा शहराचे अपोस्तोलिक व्हिकर म्हणून त्यांनी मला नेमिले. शेवटी 1927 साली ब्रिटिश सरकारने मला पुण्याला परत जाण्याची परवानगी दिली. तेव्हापासून मी पुन्हा तुम्हांमध्ये राहात होतो.

दुसरे महायुद्ध सुरू झाले तेव्हा नवीन अडचण व त्रास उत्पन्न झाला. काही तरुण फादर, जर्मन नागरिक असल्याकारणाने, त्यांस सरकारने कैद्यांच्या छावणीत ठेवले आणि बिशपचा व्यवहारदेखील जरा कठीण झाला.

या अवघड दिवसात विश्‍वासी आणि फादर लोकांचा विश्‍वासूपणा, प्रेम ही मला मोठ्या समाधानाची व शक्तीची कारणे होती. त्यांची आस्था आणि साहाय्य शेवटपर्यंत उपकारी मनाने मी विसरणार नाही.

युद्ध संपल्यावर माझ्या वृद्धपणाचा परिणाम अधिकाधिक मजवर झाला. प्रवास करणे मला कठीण झाल्यामुळे सर्व मिशनस्थानांची भेट वेळोवेळी घेता आली नाही.

म्हणून माझ्यापासून हे भारी ओझे काढण्यास आणि उत्साही खांद्यावर ठेवण्यास परमगुरुस्वामींची विनंती करण्यास मला योग्य वाटले.

त्यांनी माझी विनंती मान्य करून अंद्रू डिसोजा फादर यांस माझ्या जागी महागुरू म्हणून नेमले. त्यांची दीक्षा 24 ऑगस्टला झाली आणि या दिवसापासून ते महागुरूचा अधिकार चालवू लागले. ते तुमची चांगली काळजी घेतील.

म्हणून माझ्या प्रिय लेकरांनो, मी तुम्हास माझा शेवटचा बोध करितो. तुम्ही विश्‍वासात स्थिर राहून आपल्या विश्‍वासाप्रमाणे वर्तन करा. तुमच्यापुढे नवीन संकटे आहेत. येशूच्या हृदयाची आणि प.मारियेच्या निष्कलंक हृदयाची भक्ती बाळगत जा.

ती तुमची रक्षण करतील. तुमच्या नवीन महागुरुस्वामींसाठी आणि माझ्यासाठी प्रार्थना करा. मी तुम्हांसाठी रोजरोज प्रार्थना करीत जाईन, अशी खातरी मी तुम्हाला देतो. ईश्‍वर तुम्हाला आशीर्वाद देवो.”

हेन्री आर्चबिशप

निवृत्तीनंतर 17 डिसेंबर 1951 रोजी आर्चबिशप डोरिंग यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले. त्यांची कबर वा समाधी पुण्यातील सेंट पॅट्रिक कॅथेड्रलच्या अल्तारापाशी म्हणजे वेदीपाशी आजही आहे. चर्च किंवा कॅथेड्रल मध्ये समाधीचा हा मान हा फक्त बिशप, कार्डिनल आणि पोप अशा वरीष्ठ धर्माचार्यांनाच मिळतो.

व्हॅटिकन सिटीतले सेंट पिटर्स बॅसिलिका ही पहिले पोप आणि येशू ख्रिस्ताच्या बारा शिष्यांपैकी एक असलेल्या सेंट पिटर याच्या कबरीवर बांधली आहे.

या चर्चच्या भव्य संग्रहालयातच अनेक पोप चिरनिद्रा घेत आहेत,. या भव्यदिव्य सेंट पिटर्स बॅसिलिकाला भेट देण्याचा मला योग आला याचा आजही आनंद वाटतो

आर्चबिशप डोरींग यांच्या समाधीवरील शिलालेख आर्चबिशपांच्या विविध क्षेत्रातील कामगिरीविषयी माहिती देतोो. परंतु,`निरोप्या'चे संस्थापक-संपादक म्हणून अथवा मराठी पत्रकारितेतील त्यांच्या योगदानाबद्द्ल ह्या शिलालेखात उल्लेख नाही.

जर्मनीतून महाराष्ट्रात येऊन मराठी भाषा शिकून, स्थानिक निरक्षर आणि अर्धशिक्षित ख्रिस्ती समाजाला ज्ञानार्जन करणारे आर्चबिशप डोरिंग हे आज विस्मृतीत गेले असले तरी ‘निरोप्या’च्या रूपाने त्यांचे स्मारक त्यांच्या कळपाच्या भेटीस आजही दर महिन्याला नियमाने येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com