Shirish Kanekar : हेवा वाटावा, अशी लोकप्रियता मिळालेला लेखक

शिरीषची आणि माझी भेट एका किरकोळ वादातून झाली.
शिरीष कणेकर,
शिरीष कणेकर, sakal

निरंजन घाटे

शिरीषबद्दल शिवाजी पार्क कट्ट्यावरचे त्याचे हयात मित्र आणि इतर निकटवर्तीय लिहितीलच. एखादी जागा एखाद्या व्यक्तीच्या टिंगलटवाळी करणाऱ्या गप्पाष्टक मंडळामुळं प्रसिद्ध व्हावी, ही घटनाही क्वचितच घडते, त्यातले जे उरले त्यांचे अनुभव वाचनीय असणारच. याशिवाय कला, क्रीडा क्षेत्रातील अनेक दिग्गज त्याच्या बद्दल लिहितील, यात शंकाच नाही, पण म्हणून मी त्याच्याबद्ल लिहू नये असं थोडंच आहे.

ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याप्रमाणे, राजहंसाचे चालणे भूतळी जहालिया सहाणे, म्हणोनी आणिके काय कोणे चालावेचिना! त्याच प्रमाणे मी हे लिहायचे धाडस करतोय.यात काही गफलती झाल्या असल्यास चूक भूल देणे घेणे.

शिरीषची आणि माझी भेट एका किरकोळ वादातून झाली. आनंद अंतरकरांचं ऑफीस तेव्हा पंतांच्या गोटाच्या टिळक रस्त्याच्या टोकाला होतं. एकदा तिथं मी गेलो होतो तेव्हा तिथे एक बुटका, कोरीव मिशी असलेला साधारणपणे माझ्या वयाचा मुलगा बसला होता. आनंद केतकर तेव्हा पीटीआयचा पुणे प्रतिनिधी म्हणून काम करीत होता. त्याने मला शिरीष पुण्यात येणार असल्याचं सांगितलं होतं. रविवारी सकाळी ‘नवल’च्या ऑफीसमध्ये आपण जाऊ, तिथे त्याला भेटता येईल, असंही तो म्हणाला होता.

तेव्हा आम्ही सायकलवरून सर्वत्र भटकत होतो. त्यानुसार मी आणि आनंदा ‘नवल’च्या ऑफिसमध्ये पोहोचलो. आम्ही अंतरकरांनी मागवलेला चहा प्यायलो. तू काय करतो, मी काय करतो, अशा गप्पा झाल्या. अंतरकरांचं वैशिष्ट्य म्हणजे ते समोर हजर असलेल्या माणसांच्या ऐवजी तिसऱ्याच गैरहजर व्यक्तीबद्दल बोलत. त्यात काहीही निंदात्मक नसे.

त्या काळात माझ्या या ना त्या कारणानं मुंबईत बऱ्याच फेऱ्या होत. शिरीष राहात असलेल्या ले. गुप्ते मार्गावर माझे बरेच ओळखीचे लोक राहात. त्यात आनंद केतकर हा मित्र होताच. शिरीषच्या जवळ त्याची खोली होती. त्याला घेऊन शिरीषकडे जायचं हा नेहेमीचा उद्योग झाला होता.

तेव्हा शिरीषचे एकपात्री स्टँड अप कॉमेडी प्रयोग सुरू झाले नव्हते.

माझा चुलत भाऊ शेखर तेव्हा नुकताच कॉलेजमध्ये जाऊ लागला होता. मी दादरला त्यांच्याच घरी उतरत असे. मी बाहेर पडू लागलो की तोही माझ्याबरोबर येई. शिरीषकडे जाणार हे त्याला ठाऊक झालं होतं. शिरीषला ऐकायला तोही उत्सुक असे. मधे कुणा आचरट माणसाने शिरीषमुळे लता मंगेशकर मोठ्या झाल्या, असं लिहिलं होतं. त्याच पद्धतीने मीही माझ्यामुळे शिरिष स्टँडअप कॉमेडियन झाला असा दावा मी करू शकतो. तेव्हा आम्ही त्याला ऐकलं नसतं तर त्याला सराव झाला नसता.

आमच्यासारखे श्रवणभक्ती करणारे श्रोते त्याला मिळाले त्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढला, असं म्हणू शकतो. खरं तर शिरीषला ऐकणं ही कानांसाठी एक सुंदर मेजवानी असे. तो बोलतांना आपण मधेच बोलणे कधी डोक्यातच येत नसे. वाग्देवी त्याच्यावर प्रसन्न होती. त्याच्या लेखणीला जशी धार होती तशीच ती जिभेलाही होती.

शिरीषला खूप चाहते होते. तसंच त्याचं वाचणारे आणि त्यानं कुणाच्यातरी श्रद्धास्थानाची खिल्ली उडवल्यावर त्याला कडकडून शिव्या देणारे, या दोन्ही प्रकारची माणसं मी अनुभवली आहेत. त्याचा लेख पाठवायला उशीर झाला, की का रे, या वेळेला उशीर झाला? असं विचारणारे तसंच तो * * * कणेकर तुमचा मित्र आहे ना, त्या * * * कणेकरला म्हणावं तू नागपुरात पाय ठेऊन तर बघ नाही तंगड मोडून हातात दिलं तर नाव नाही सांगणार अमूक तमूक म्हणून! शिरीष मला वाटतं त्यावेळी लोकसत्तामध्ये लिहीत होता.

त्यानं देवानंदचं वर्णन करतांना ‘मान कापलेल्या कोंबड्यासारखा तिरकी मान करून चालणारा देवानंद’, असं केलं होतं. तो देवानंदचा वेडा फॅन होता.त्याला हे माहीत नव्हतं की देवानंद शिरीषच्या लेखनाला दाद देत असे. अगदी अलिकडचं उदाहरण एका बायोपिक् फेम अभिनेत्याचं.

मधे एका जुन्या मित्राचा फोन आला. तुझी आणि शिरीष कणेकरची ओळख आहे ना? मी हो म्हटलं. चांगलीच आहे ना? चांगली म्हणजे आम्ही एकमेकांशी बोलतो, तेव्हा एकमेकांना अरे - तुरे म्हणतो. कधी कधी एकमेकांना मित्रही म्हणतो. काम काय आहे बोल?

काय सांगतो? त्याला कुणी मित्र असतील असं वाटलं नव्हतं. असं लिहिणाऱ्या माणसाला चक्क मित्र, कमाल आहे!

भरपूर मित्र आहेत. जवळचे, लांबचे. तुझं काय काम आहे, ते बोल?

मला त्यांचं लेखन खूप आवडतं, एकदा बोलायचं होतं.

मी फोन नंबर देतो, दुपारी बारा ते चार सोडून दिवसा दहानंतर रात्री नऊ पर्यंत केव्हाही.

बोलतील ना? फोन तर कर!

दोन दिवसांनी त्याचा फोन आला.’ मी फोन केला.छान बोलले.’

लेखकाच्या लेखनाचे स्वरूप आणि त्यावरून त्याच्या स्वभावाबद्दल अंदाज बांधणे, हे पूर्वापार चालत आले आहे. विज्ञान लेखक हा शिक्का बसल्यामुळे मला विनोदाचे किंवा वाह्यातपणाचे वावडे असणार, हे वाचक गृहीत धरतात. तसंच शिरीषबद्दल मत व्यक्त करणाऱ्या माझ्या मित्राचं झालं होतं.

शिरीषबद्दल आणखी एक आठवण सांगायची म्हणजे तो तेव्हा इंडियन एक्स्प्रेसमध्ये होता. त्याचं ऑफिस एक्स्प्रेस टॉवर्समधे होतं. मी आकाशवाणीत होतो आणि नंतरही बरेच वेळा मीटिंग्जच्या निमित्ताने आकाशवाणी केंद्रावर जात असे. आकाशवाणीतलं काम संपलं की शिरीषला भेटायला जायचो. पोटाच्या विकारामुळे शिरीष त्याचा डबा पूर्णपणे खाऊ शकत नसे. आनंद केतकर कट्टर शाकाहारी. त्यामुळे शिरीषच्या भातातली कोळंबी मला मिळायची. सीकेपी घरगुती चवीच्या त्या कोळंबी पुढे हॉटेलमध्ये मिळणारी कोळंबी खातांना आपण का हे खातोय? असा विचार मनात डोकावून जाई. नाईलाज को क्या विलाज, असं म्हणत ती कोळंबी खाणं अपरिहार्य होतं.

गेली काही वर्षे आम्ही फोनच्या माध्यमातून भेटतो. त्याला मधनंमधनं नैराश्याचे झटके येतात. त्याला फोन करून किंवा व्हॉट्स ॲप वरून त्याच्या वाचकप्रियतेची आठवण करून दिली की तो ताळ्यावर येतो. तो त्याच्या नैराश्यावर हमखास लागू पडणारा उतारा आहे. त्याचं बहुपेडी व्यक्तिमत्त्व तसं शब्दात पकडणं अवघडच आहे.

शिरीषची टिंगल केली तर तिला तो दाद देतो. त्याने मागे एकदा ‘मी अमूक असतो तर..’ असा लेख लिहिला होता. तेव्हा मी ‘मी शिरीष असतो तर..’ असा एक लेख लिहिला आणि तो त्यालाच पाठवला. तो त्याच्या प्रतिक्रियेसह पुढे दिलाय.

मी शिरीष कणेकर असतो तर? मी ज्या वृत्तपत्रात लिहितो, त्याचा संपादक आचरट असूनही त्याची टिंगल करता येत नाही, याचे मला वैषम्य वाटले असते. आयुष्यभर बायको आणि सासूची टिंगलटवाळी करणारे लेखन केले, मला आणखी सासवा आणि बायका नाहीत, नाहीतर आणखी विषय मिळाले असते, या विचाराने मी हैराण झालो असतो. माझा मित्र (?) जयसिंगपुरात राहायला गेला, आता मला तो भेटत नाही, त्याबद्दल नक्की काय वाटायला हवे हे न कळल्यामुळे मी विचार करून थकलो असतो. घाटेची २०० पुस्तके झाली तर माझीही ७५ झाली आहेत या विचाराने सुखावलो असतो. भाग एक समाप्त.

घाटेला दुसरा भाग लिहायची बुद्धी होऊ नये म्हणून केलेल्या प्रार्थनेस देव पावला म्हणून देवाला नारळ फोडला असता. भाग दुसरा समाप्त.

शिरीषचा ऐंशिवा वाढदिवस सहा जूनला आहे, त्या निमित्ताने या शाब्दिक शुभेच्छा.

(निरंजन घाटे ज्येष्ठ लेखक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com