Kiss Day Special Love Story: आरोह आणि सावनीच्या एंगेजमेंटला आज एक वर्ष पूर्ण होणार होतं; सावनीच ऑफिस alternate saturday असतं आणि नेमकं आज तिला ऑफिसला जावं लागणार होतं, सध्या तिच्या ऑफिसमध्ये खूप गडबड सुरू होती; त्यांच्या कंपनीचं एक महत्वाच्या प्रेझेंटेशनसाठी आज कॉन्फरन्स होती.
आजची कॉन्फरन्स संपवून ती लवकरात लवकर घरी येणार होती; सावनीच्या काहीही लक्षात नव्हतं... याचा फायदा घेत आरोहने सुद्धा तिला कोणीही आठवण करून देणार नाही अशी सक्त ताकीद घरच्या आणि जवळच्या मित्र-मैत्रिणींना दिली होती. आरोहने सगळी तयारी करून ठेवली; सावनी ७-७.३० पर्यंत घरी येणार होती.
त्याने मुद्दाम त्यांच्या बेडरूमच्या बाल्कनीमध्ये सगळा प्लॅन केला, आल्या आल्या तिला काहीही कळू नये म्हणून... तिला आवडतो तसा त्याने स्पंज केक सुद्धा केला होता. तिच्यासाठी छान असा एक वनपीस तो घेऊन आलेला आणि तिला आवडतात ती सगळी फुलं आणून स्वतःच्या हाताने सगळी सजावट केली होती.
६ वाजता निघालीस का हे विचारायला त्याने सावनीला फोन केला पण तिने तो उचलला नाही. शंभर फोन करून हैराण करण्यातला आरोह कधीच नव्हता, त्याने स्वतःसाठी चहा ठेवला आणि सोशल मीडिया स्क्रोल करत बसला; ८ वाजले तरी सावनी आली नाही म्हणून त्याने तिला परत फोन केला पण तिचा फोन बंद लागत होता, आता घरच्यांचे फोन त्याला यायला लागले होते, त्याने १० वाजेपर्यंत फोन अवॉइड केले, आता मात्र आरोहला काळजी वाटायला लागली होती.
त्याने तिच्या ओळखीतल्या काही लोकांना फोन करायला सुरुवात केली, पण कोणाकडेच तिचा काहीच पत्ता नव्हता; त्याला आता घरच्यांपासून काहीही लपवणं कठीण होत होतं.. त्याने घरी कळवलं... रात्रीच्या १२.३० वाजता घराची डोअर बेल वाजली, सावनी घरी आली होती, आरोहने दार उघडलं.. सावनी खूप रडत होती, तिने आल्या आल्या आरोहला घट्ट मिठी मारली, कसंबस त्याने तिला सोफ्यावर बसवलं आणि पाणी दिलं.
सावनी हुंदके देत रडत होती, आरोह खूप घाबरला होता, त्याने तिचा हात हातात घट्ट धरला आणि तिला विचारलं..
"सानू.. काय झालंय? कुठे होतीस तू?"
"हॉस्पिटलमध्ये.. अनयला अॅडमिट केलं आहे, मी ऑफिसमधून निघाले तेव्हा मला कॉल आला त्याचा अॅक्सिडेंट झाला आहे असा... खूप रक्त वाहिलंय, डोक्याला मार लागलाय, जर उद्यापर्यंत शुद्धीवर नाही आला तर कोमामध्ये जाऊ शकतो असं म्हणताय.."
हे सगळं बोलत ती परत रडायला लागली.. आरोहने तिला जवळ घेतलं, तिच्या केसांवरून हात फिरवून तिला शांत केलं, हा अनय म्हणजे सावनीचा ex. त्यावेळी आरोहच्या मनात काय सुरू असेल हे फक्त तोच सांगू शकत होता.
त्याने तिला शांत करून थोडंसं खाऊ घालून झोपवलं आणि घरी सगळं काही कळवलं.. सावनीच्या माहेरचे खूप चिडले होते, त्यांच्या मते हे अगदी चूक होतं कारण आज तिने आरोहला वेळ द्यायला हवा होता. सावनी नेहमीच असे घोळ घालते इतपत घरच्यांच मत झालं, आरोहने आज ती दमली आहे काहीही बोलू नका म्हणून त्यांना शांत राहायला लावलं.
दुसऱ्या दिवशी सावनी उठली तेव्हा तिने आपला फोन चेक केला, घरच्यांचे, मित्रांचे, आरोहचे खूप फोन आले होते, आरोह जीमला गेला होता. तिने स्वतःसाठी कॉफी बनवली आणि बाल्कनीत येऊन पिऊ लागली, तेव्हा तिने सगळं डेकोरेशन बघितलं, एकेक घरून घरी फोन लावायला सुरुवात केली.
घरचे सगळे तिच्यावर चिडले होते, तिला आठवण करून दिली की आरोहने किती प्रेमाने तिच्यासाठी सगळ्या गोष्टी प्लॅन केल्या होत्या आणि ती कशी चुकली होती, तिच्या बहिणीने लग्नानंतर आपल्या ex शी contact ठेवण्याची गरजच काय? तुझ्या मनात अजूनही तोच आहे का? इतपत तिला सुनावल.. सावनी कशी चुकली आहे हे सगळ्यांनी तिला पटवून दिलं, ती परत रडायला लागली.. आरोह घरी आला.
सावनीने त्याला जाऊन मिठी मारली आणि खूप रडायला लागली.. त्याला सॉरी म्हणू लागली, तिचं चुकलं होतं तिने आरोहला एक फोन तरी करायला हवा होता पण तिचा फोन डिस्चार्ज झाल्यामुळे बंद पडला होता. सावनी खूप रडत होती, तिला काहीही सुचत नव्हतं आपला निर्णय चुकला असं तिचं म्हणणं नव्हतं पण तेव्हा तिने आरोहच्या भावना दुखावल्या होत्या.
आरोहने तिला शांत केलं आणि एका ठिकाणी बसवलं, आणि म्हणाला..
"सानू.. एक सांग.. तू मुद्दाम केलंस?"
"नाही.."
"तेव्हा तिथे न जाता इकडे आली असतीस तरी इकडे लक्ष लागलं असतं?"
"नाही.. पण आरोह माझ्या मनात अनयबद्दल काहीच नाहीये.. खरंच.. पण तेव्हा तो फोन आला नी मला नाही सुचलं की कसं वागाव... आणि आता आपली गरज तिथे जास्त आहे म्हणून मी तिकडे गाडी फिरवली."
"ठिके ना मग"
"पण मला तुला दुखवायच नव्हतं, माझ्या मनात अनयबद्दल काहीच नाहीये.. खरंच.."
"सानवी, मी कधीच हा आरोप नाही केला ना माझ्या मनात कधी असं काही आलं... तो विश्वास आहे माझा तुझ्यावर.. आणि कायम असेल. फक्त बोलत जा काहीही झालं तरी, सांगत जा.."
"तुला काहीच प्रॉब्लेम नाहीये?"
"का असेल? फक्त काही लपवू नकोस माझ्यापासून... तेवढच कर, हम्म?"
"हम्म"
"चल आवर, अनयला भेटायला जाऊयात, माझं झालं तुझ्या मित्राशी बोलणं आला आहे तो शुद्धीवर.. He is all right now ..."
सावनीने आरोहला परत मिठी मारली आणि thank you म्हणाली.. फोनवर आईने एवढा सोन्या सारखा नवरा मिळाला आहे हे म्हटलेलं वाक्य तिला आठवलं आणि तिच्या डोळ्यात पाणी आणि चेहऱ्यावर हसू आलं..
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.