Coronavirus : 'तुला पाहते रे'फेम अभिनेत्रीला कोरोना? चाहत्यांचे फोनवर फोन

वृत्तसंस्था
बुधवार, 25 मार्च 2020

अभिज्ञाच्या या व्हिडिओनंतर चाहत्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला. तसेच तिला आणि तिच्या परिवाराला काळजी घेण्याचे आवाहनही केले आहे. महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा ११६ वर पोहोचलेला असून, आतापर्यंत चार मृत्यू झाले आहेत.

कोरोनाने अगदी सामान्यांपासून ते सेलिब्रेटींपर्यंत सगळ्यांनाच जंगजंग पछाडले असून सगळेचजण आता खबरदारीचे उपाय अवलंबत आहेत. बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका कनिका कपूर हिला कोरोना झाल्यानंतर आता मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रीलाही कोरोना झालाय का अशी शंका उपस्थित केली जात आहे.

'तुला पाहते रे'फेम अभिनेत्री अभिज्ञा भावे हिला कोरोना झाला असल्याच्या अफवा पसरत आहेत. त्यासाठी तिला फोनही येऊ लागले आहेत. या फोन्समुळे हैराण होऊन अभिज्ञाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केलाय, ज्यात ती, तिला कोरोना झालेला नसल्याचे स्पष्ट करत आहे. शेअर केलेल्या व्हिडिओत अभिज्ञा म्हणते, 'माझी आई १८ मार्चला दुबईहून भारतात परत आली. विमानतळावर तिची पूर्ण वैद्यकिय चाचणी केल्यानंतरच तिला घरी सोडण्यात आले. दरम्यान, तिला विलगीकरण कक्षात राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. त्यामुळे आम्ही तिच्यापासून लांब दुसऱ्या घरात राहू लागलो. परंतु, आश्चर्यकारक बाब म्हणजे काही लोकांना वाटलं की मलाच करोना झालाय. त्यामुळे मी आईपासून वेगळी राहत आहे. कदाचित लोकांना कोरोना आणि क्वॉरंटाईन यातला फरक समजत नसावा. पण तुम्हीही कोरोनाबाबत काळजी घ्या, घरात राहा.' असं तिने या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तसेच या व्हिडिओत तिने कोरोना आणि क्वॉरंटाईन यातला फरक चाहत्यांना समजाऊन सांगितला आहे.  

अभिज्ञाच्या या व्हिडिओनंतर चाहत्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला. तसेच तिला आणि तिच्या परिवाराला काळजी घेण्याचे आवाहनही केले आहे. महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा ११६ वर पोहोचलेला असून, आतापर्यंत चार मृत्यू झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनापासून बचावण्यासाठी २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे सर्व देश १४ एप्रिलपर्यंत बंद राहिल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rumours of Marathi actress Abhidnya Bhave is corona positive