Coronavirus : पिंपरी-चिंचवडमधील कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींची प्रकृती स्थिर - श्रावण हर्डीकर

PCMC
PCMC

पिंपरी - महापालिकेच्या वायसीएम व भोसरी रुग्णालयात दाखल व्यक्तींच्या घशातील द्रव्यांचे नमुने पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरालॉजी (एनआयव्ही) प्रयोगशाळेत तपासले जात आहेत. आतापर्यंत ११ व्यक्तींचा एनआयव्ही अहवाल पॉझिटिव्ह आलेला असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. अहवाल निगेटिव्ह आलेल्यांना घरी सोडले असून त्यांना घरातच थांबण्याची (होम क्वारंटाइन) सूचना केली आहे. त्यांच्या सहवासात आलेल्यांचीही तपासणी केली जात असल्याची माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.

महापालिका क्षेत्रात चीन व अन्य देशांतून आलेल्या प्रवाशांचा १४ दिवस वैद्यकीय विभागामार्फत राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पाठपुरावा केला जात आहे. आतापर्यंत १८० प्रवाशांचा पाठपुरावा केला आहे. त्यांना घरातच थांबण्याच्या सूचना केल्या आहेत. पिंपरीत वायसीएम व भोसरी नवीन रुग्णालयात आयसोलेशन कक्ष सुरू केला आहे. वायसीएममध्ये दहा बेड व भोसरीत ६० बेडची व्यवस्था आहे. गरज पडल्यास पिंपरीतील जिजामाता रुग्णालयात १०० आणि नेत्र रुग्णालयात ३० अशा १३० बेडची व्यवस्था केली आहे. पूर्वानुभव म्हणून स्वाइन फ्लूच्यावेळी केलेल्या आयसोलेशन कक्षात काम केलेले डॉक्‍टर, नर्स व कर्मचाऱ्यांची कोरोना आयसोलेशन कक्षासाठी नियुक्ती केली आहे. त्यांना सर्व सुरक्षा साधने पुरवलेली आहेत. साधारणतः एका शिफ्टमध्ये २५ डॉक्‍टर व कर्मचारी काम करीत आहेत. 

खबरदारीसाठी उपाययोजना 
मॉल्स, मल्टिप्लेक्‍स थिएटरच्या चालकांना उपाययोजना करण्याबाबत सूचना केल्या आहेत. पालिकेची रुग्णालये, दवाखान्यांमधील रुग्ण, डॉक्‍टर, कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत; तसेच थुंकणाऱ्यांवर १५० रुपये दंडाची कारवाई केली जात आहे. आरोग्य विभागामार्फत कीटकनाशक फवारणी सुरू आहे. त्यासाठी २५ पथके नियुक्त केली आहेत. 

ई-मेल वापरा 
महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालय व अन्य विभागीय कार्यालयांत पाठवायचे तातडीचे टपाल फक्त संबंधित विभागाच्या ई-मेलद्वारेचे पाठवावे. मुख्य कार्यालयाबाहेरील पालिका कर्मचाऱ्यांनी अनावश्‍यक कामकाजासाठी मुख्य कार्यालयात येऊ नये. येणे आवश्‍यक असल्यास विभागप्रमुखांची पूर्वपरवानगी घ्यावी. मुख्यालयात बैठकव्यवस्था असलेल्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या नियंत्रणाखालील उपविभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना अनावश्‍यक कामकाजासाठी मुख्य कार्यालयात बोलवू नये, असा आदेश आयुक्त हर्डीकर यांनी दिला आहे.

तातडीचे काम असेल तरच पोलिस ठाण्यात या - संदीप बिष्णोई
‘तातडीचे काम असेल तरच पोलिस ठाणे व आयुक्तालयात या, अथवा ई-मेल, ई-कम्प्लेंट करा, त्याची तातडीने दखल घेतली जाईल,’’ असे आवाहन पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी केले आहे. 

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाकडून सर्व पोलिस ठाण्यांमध्ये कर्मचाऱ्यांसाठी तीन हजार एन ९५ मास्क व तीन हजार ग्लोव्हजचे वाटप केले आहे. आयुक्तालयासह उपायुक्त कार्यालय, सहायक आयुक्त कार्यालय, वाहतूक विभाग कार्यालय सर्व चौकींसह पोलिस ठाणे, पोलिस वसाहती व परिसराचे निर्जंतुकीकरण केले 
जात आहे. गर्दी टाळण्यासाठी व कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महत्त्वाचे काम असेल तरच नागरिकांनी पोलिस ठाण्यात अथवा आयुक्तालयात यावे, अथवा ई-कम्प्लेंट करावी, त्याची तातडीने दखल घेतली जाणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले. यासह महापालिकेच्या आरोग्य व वैद्यकीय विभागास ज्याठिकाणी बंदोबस्त आवश्‍यक असेल त्याठिकाणी तो पुरविला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

विनाकारण गर्दी करू नये, सरकारने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन होऊ नये, यासाठी गस्तीवरील पोलिसांकडून वारंवार आवाहन केले जात आहे. परदेशातून आलेल्या नागरिकांपैकी ज्यांचे विलगीकरण करण्यात आले आहे. त्यांच्यावर सोसायटीधारकांनी बहिष्कार टाकू नये, त्यांना विनाकारण त्रास देऊ नये, असे करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com