महेंद्र सिंह धोनीचं क्रिकेटमधील योगदान प्रेरणादायी : शरद पवार

सुशांत जाधव
Sunday, 16 August 2020

ज्यावेळी धोनीकडे भारतीय संघाची धूरा देण्यात आली त्यावेळी शरद पवार बीसीसीआयचे अध्यक्ष होते.  

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी याने एका सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्याची घोषणा केली. त्याच्या पुनरागमनाची आतूरतेने वाट पाहणाऱ्या त्याच्या चाहत्यांसाठी हा मोठा धक्काच होता. धोनीच्या या निर्णयानंतर सोशल मीडियावर धोनीमय वातावरण दिसत आहे. अनेक जण त्याने मैदानातून निवृत्ती घ्यायला हवी होती, अशी भावना व्यक्त केली आहे.   

'माही जैसा कोई नहीं!'

माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील धोनीच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी ट्विटच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. क्रिकेटशी माझा दिर्घकाळ संबंध आला. धोनीची कर्णधारपदी निवड करत असताना तो भारतीय संघाचा यशस्वी कर्णधार ठरेल, याची खात्री होती. धोनीचे क्रिकेटमधील योगदान हे अद्वितीय आणि प्रेरणादायी आहे, असा उल्लेखही शरद पवारांनी आपल्या ट्विटमध्ये केलाय.  द्रविडच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला 2007 मध्ये झालेल्या मर्यादीत षटकांच्या विश्वचषकात लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागला. द्रविडने नेतृत्व सोडल्यानंतर महेंद्र सिंह धोनीची कर्णधारापदी नियुक्ती करण्यात आली होती. ज्यावेळी धोनीकडे भारतीय संघाची धूरा देण्यात आली त्यावेळी शरद पवार बीसीसीआयचे अध्यक्ष होते.  

Big Breaking : धोनीची निवृत्तीची घोषणा​

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील धोनीच्या भावी वाटचालीसाठी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अनतुलनिय कामगिरी केली आहे. विश्वचषकाच्या वेगवेगळ्या प्रकारात त्याने भारताला विश्व विजेता ठरवले आहे, अशा आशयाचे ट्विट अमित शहा यांनी केले आहे. क्रिकेट जगतातूनच नव्हे तर राजकीय क्षेत्रातूनही धोनीच्या योगदानाच्या आठवणीला उजाळा देण्यात येत आहेत. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी तर बीसीसीआयकडे धोनीसाठी फेअरवेल सामना खेळवण्याबाबतही विनंतही केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MS Dhonis Contribution To Cricket Unique And Inspiring Sharad Pawar