Mahendra_Singh_Dhoni
Mahendra_Singh_Dhoni

'माही जैसा कोई नहीं!'

पुणे : टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार असा मान मिळालेल्या कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीने शनिवारी (ता.१५) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. मात्र, त्याच्या या निर्णयामुळे धोनीचे जगभरातील चाहते कमालीचे नाराज झाले आहेत. आपल्या शैलीला साजेसा असाच निर्णय त्याने घेतल्याच्या प्रतिक्रियाही संपूर्ण क्रीडा विश्वातून व्यक्त होत आहेत.

आयसीसीच्या सर्व प्रकारांमधील विजेतेपदं मिळवून देणारा जगातील एकमेव कर्णधार असलेल्या भारताच्या या खेळाडूने आपली आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दही चांगलीच गाजवली आहे. धोनीने अनेक विक्रमांची नोंद केली आहे. २००७ मध्ये टी-२० संघाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळली आणि पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला हरवत पहिला टी-२० विश्वचषक जिंकला. त्यानंतर एकदिवसीय आणि कसोटी संघाचे कर्णधारपदही त्याने आपल्या हटक्या स्टाईलनेच भूषविले. 

कसोटीमध्ये त्याने टीम इंडियाला आयसीसीच्या रँकिंगमध्ये टॉपवर नेले. त्यानंतर भारताच्या भूमीत झालेल्या २०११ च्या वनडे वर्ल्डकपमध्येही आपला करिष्मा कायम ठेवत आयसीसीचे जेतेपद पटकावले. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात श्रीलंकेला हरवत भारताने दुसऱ्यांदा जेतेपदावर नाव कोरले. तत्पूर्वी, भारताने कपिल देव यांच्या नेतृत्वात १९८३ ला पहिला वनडे वर्ल्डकप जिंकला होता. 

२०१३ साली झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये इंग्लंडला त्यांच्याच भूमीत पराभूत करत धोनीच्या नेतृत्वाखालील भारताने आयसीसीची तिसरी ट्रॉफी पटकावली. यासोबतच धोनीने व्यावसायिक क्रिकेट लीगमध्येही आपली कॅप्टन कूल ही इमेज कायम राखली. इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) चेन्नई सूपर किंग्ज संघाचे नेतृत्व करताना त्याने आतापर्यंत तीनवेळा आयपीएलचे जेतेपद जिंकले आहे. २०१०, २०११ आणि २०१८ मध्ये त्याने आयपीएल ट्रॉफीवर चेन्नईचे नाव कोरले. तसेच चॅम्पियन्स लीग टी-२० मध्येही २०१० आणि २०१४ चे जेतेपद चेन्नईला जिंकून दिले आहे. त्यामुळे त्याला 'थाला' ही पदवीही समस्त एमएसडीएन्सनी बहाल केली. 

दरम्यान, २०१९च्या विश्वचषक स्पर्धेत भारताचे जेतेपद हुकले. सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळताना भारताला फक्त काही धावांची गरज असताना धोनी रनआउट झाला आणि तिच त्याची शेवटची खेळीही ठरली. 

धोनीच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीवर नजर टाकल्यास धोनीला टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार का म्हटले जाते हे समजून येईल. तिसऱ्या क्रमांकापासून सातव्या क्रमांकापर्यंत कोणत्याही वेळी फलंदाजी करण्याची तयारी ठेवणाऱ्या या कॅप्टनने अनेक रेकॉर्ड आपल्या आणि टीम इंडियाच्या नावेही केले आहेत. 

धोनीने ९० कसोटी सामने खेळताना ३८.१ च्या सरासरीने ४८७६ धावा केल्या. यामध्ये २२४ त्याने सर्वोच्च खेळीची नोंद केली. कसोटीमध्ये त्याने ३३ अर्धशतके आणि ६ शतके फटकावली आहेत. तसेच ३५० वनडे सामन्यात त्याने ५०.६च्या सरासरीने १०७७३ धावांची बरसात केली. पाकिस्तानविरुद्ध नाबाद १८३ ही सर्वोत्तम धावसंख्या त्याने नोंदविली. वनडे सामन्यात धोनीचा स्ट्राईकरेट ८७.६ इतका राहिला. जो सर्वोत्तम फलंदाजांचे लक्षण समजला जातो. याचजोडीला त्याने ७३ अर्धशकते आणि १० शतके झळकावली आहेत. 

टी-२० मध्येही धोनीने ९८ सामन्यात ३७.६च्या सरासरीने १६१७ धावा ठोकल्या आहेत. १२६.१ च्या स्ट्राईक रेटने धावांची बरसात करणाऱ्या धोनीने केवळ २ अर्धशकते झळकावली आहेत मात्र, त्याला टी-२०मध्ये शतक करता आले नाही. अशाच प्रकारची खेळी त्याने आयपीएलमध्येही केली आहे. १९० आयपीएलचे सामने खेळताना ४२.२ च्या सरासरीने त्याने ४४३२ धावा केल्या आहेत. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट राहिला आहे १३७.८ जो त्याच्या संपूर्ण क्रिकेट कारकीर्दीतला सर्वोत्तम ठरला आहे. धोनीने आयपीएलमध्ये २३ अर्धशतके झळकावली आहेत मात्र, इथेही त्याला शकत करता आलेले नाही. 

कोणत्याही क्रमांकावर खेळण्याची तयारी असणारा, खेळाडूंवर विशेषत: गोलंदाजांवर कमालीचा विश्वास ठेवणारा, तळाच्या फलंदाजांना सोबतीला घेत सामन्याचा रोख पालटवणारा आणि अविश्वसनीय अशा विजयाची नोंद करत शांतपणे मैदानातून पॅव्हेलियनमध्ये परतणारा हा खेळाडू आपल्या याच हटक्या अंदाजामुळे अनेकांच्या गळ्यातला ताईत बनला. आणि त्याच अंदाजात त्याने आज क्रिकेटला अलविदा केला.

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com