होळी साजरी करण्यामागचा इतिहास अन् विज्ञान जाणून घ्या|Holi 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

holi 2022
होळी साजरी करण्यामागचा इतिहास अन् विज्ञान जाणून घ्या|Holi 2022

होळी साजरी करण्यामागचा इतिहास अन् विज्ञान जाणून घ्या

दा. कृ. सोमण
गुरुवार, 17मार्च रोजी होळी, हुताशनी पौर्णिमा , होलिका प्रदीपन आहे. शुक्रवार, 18 मार्च रोजी धूलिवंदन, अभ्यंगस्नान, वसंतोत्सवारंभ आहे. यावर्षी या उत्सवावर कोरोना व्हायरसचे संकट आले आहे. त्यामुळे हा सण साजरा करतांना सर्वांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
उत्तर भारतात या सणाला ‘ होरी - दोलायात्रा ‘ म्हणतात. दक्षिण भारतात या सणाला ‘ कामदहन ‘ असे म्हणतात. महाराष्ट्रात ‘ होळी किंवा शिमगा ‘ या नावाने हा सण ओळखला जातो. कोकण- गोमंतकात या सणाला ‘ शिग्मा किंवा शिग्मो ‘ असे म्हणतात. रा. चिं. ढेरे यांनी हा शब्द कसा तयार झाला याविषयी व्युत्पत्ती सांगितली आहे. देशीनाममालेत हेमचंद्राने या उत्सवाला ‘ सुगिम्हअ ‘ म्हणजे ‘ सुग्रीष्मक ‘ असे नाव दिले आहे. या नावापासून कोकण-गोमंतकात ‘ शिग्मा ‘ हा शब्द रूढ झाला . त्यानंतर त्याचे ‘ शिमगा ‘ असे रूप रूढ झाले आहे.

हेही वाचा: वसंत ऋतूत आरोग्य जपायचंय! आयुर्वेदानुसार हा घ्या डाएट प्लॅन

शिमगा

शिमगा

असा आहे इतिहास

होलिकोत्सवाविषयी वेगवेगळ्या कथा सांगितलेल्या आहेत. कृष्ण लहान असताना , त्याला ठार मारण्यासाठी कंसाने पूतना राक्षसीला पाठविले. पण दूध पीत असताना , तिचा प्राण शोषून कृष्णाने त्या दुष्ट पूतना राक्षसीला यमसदनाला पाठवले. त्याचे प्रतिक म्हणून होळीच्या दिवशी रात्रीच्या वेळी पूतना राक्षसीला जाळण्यात येते. महाराष्ट्रात याविषयी आणखी एक कथा सांगितली जाते. पूर्वी ढुंढा नावाची एक दुष्ट राक्षसीण लहान मुलांना पीडा देत असे. तेव्हा तिला शिव्या देऊन ठिकठिकाणी अग्नी पेटवून हाकलून देण्याची प्रथा सुरू झाली. होलिकोत्सव साजरा केला म्हणजे गावच्या मुलांना ढुंढा राक्षसी त्रास देत नाही असा समज आहे.

हेही वाचा: काय सांगता राव! जावयाला गाढवावर बसवून मिरवणारेही आहे गाव!

हे आहे विज्ञान
होळीचा सण हा शिशिर ऋतूमध्ये थंडीच्या दिवसात येतो. या दिवसात अनेक वृक्षांची पानगळ चालू असते. घराच्या परिसरात पानगळ झाल्याने रोगराई पसरण्याची शक्यता असते. अस्वच्छता हीच खरी ढुंढा राक्षसी ! अस्वच्छतेमुळे लहान मुले पटकन आजारी पडतात. पानगळीत पडलेला पालापाचोळा एकत्र करून तो जाळण्याची प्रथा पडली. स्वच्छता झाली की रोगराईची ढुंढा राक्षसीण मुलांना त्रास देत नाही. त्याकाळी पालापाचोळ्यापासून खत निर्माण होते ही कल्पना नव्हती. तरी कोकणात फार प्राचीन कालापासून हा पालापाचोळा शेतातील भाजावळीसाठी वापरण्याचीही प्रथा होती. पूर्वी धार्मिक गोष्टी लोक मनापासून पाळीत असत. म्हणून होलिकादहनाची प्रथा पडली आहे. आता लोक सांस्कृतिक व वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही याकडे पाहतात.

हेही वाचा: गेल्या १५० वर्षांपासून या गावांत साजरी झाली नाही होळी! धक्कादायक कारण जाणून घ्या

स्वच्छतेचा सण

होळी हा सण स्वच्छतेसाठी आहे. घर, परिसर आणि मन स्वच्छ ठेवण्यासाठी आहे. मनातील विकृती, घाण दूर करून मन स्वच्छ व पवित्र ठेवण्यासाठी हा सण असतो. हा सण रंगांचा आहे पण तो केमिकल , हानीकारक रंगांचा नाही . तर नैसर्गिक रंगांचा आहे. मन आनंदी रहावं. दु:ख, द्वेष, मत्सर आणि सूडभावना दूर करून मन पवित्र रहावं यासाठी हा सण येत असतो.
वसंतऋतूच्या आगमनाप्रीत्यर्थ होळीचा सण साजरा केला जातो. “ होळी जळाली, थंडी पळाली “ असे म्हटले जाते. परंतु यावर्षी थंडी केव्हाच पळाली. यावर्षी तशी थंडी कमीच होती. हवामानात होणारा हा बदल चांगला नाही. अवकाळी पाऊस , गारपीट यामुळे शेतीचेही मोठे नुकसान होत आहे. निसर्गात होणार्या या बदलाला अर्थात आपणच कारणीभूत आहोत. आपण जर निसर्गाला जपले नाही तर निसर्ग आपणास जपणार नाही. म्हणूनच पर्यावरणाकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन करण्याची खरी गरज आहे. त्यामुळे होळीचा सण साजरा करीत असतांना वृक्षतोड होणार नाही याकडे आपण जास्त लक्ष देण्याची गरज आहे. आपले सण-उत्सव पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी असतात. भक्षण करण्यासाठी नसतात.

Web Title: Holi Festival Celebration Science And History Da Kru Soman Share Festival Rituals

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..