
Mahabharat : श्री कृष्णाला अपेक्षित असलेले ज्ञान कोणते, जाणून घ्या
Best Tips For Students :
न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते।
तत्स्वयं योगसंसिद्धः कालेनात्मनि विन्दति।
ज्ञानासारखे पवित्र या जगामध्ये दुसरे काहीही नाही. कर्मयोग सिद्ध झाला, त्याला स्वतःला ते ज्ञान काही काळानंतर स्वतःच्या ठिकाणीच प्राप्त होते.
स्वकर्म समर्पण बुद्धीने केले असता आत्मज्ञान होते, असा संदेश देणारा हा श्लोक सर्वांसाठीच फार महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे. जगातील सर्वांत पवित्र गोष्ट ज्ञान हीच आहे. आणि सर्व प्रयत्नांनी ते मिळवणे हेच आपले ध्येय असायला हवे.
शाळा महाविद्यालयात मिळणारे शिक्षण जीवनासाठी आवश्यक आहेच. इथे श्रीकृष्णाला अपेक्षित असलेले ज्ञान कोणते ते समजून घेऊ या.
कथा
छांदोग्य उपनिषदात महर्षी आरुणी आणि श्वेतकेतू या पिता-पुत्रांची फार सुंदर कथा आहे. महर्षी आरुणींचा पुत्र श्वेतकेतू गुरुगृही बारा वर्षे राहून वेदाध्ययन करून आला होता. आपल्याला पुष्कळ ज्ञान मिळाले या कल्पनेने तो अतिशय गर्विष्ठपणे वागू लागला.
तेव्हा त्याच्या पित्याने त्याला प्रेमाने विचारले, की बाळा तुला असे कोणते ज्ञान मिळाले आहे ज्यामुळे तू गर्वाने ताठर झाला आहेस? जे ऐकल्यावर सर्व ऐकल्यासारखे होते, जे जाणल्यावर न जाणलेले सर्व जाणल्यासारखे, होते असे काही तुला समजले का? श्वेतकेतू उत्तर देऊ शकत नाही.
मग पिता म्हणतो, की जसे मातीचे एक ढेकूळ कळले, तर सगळी माती जाणल्यासारखीच असते. तसे काही तुला विश्वाचे ज्ञान मिळाले का? श्वेतकेतू नाही म्हणतो. नंतर महर्षी आरुणी त्याला वटवृक्षाचे फळ आणायला सांगतात. ते फोडल्यावर त्यामध्ये अगदी लहान बिया दिसतात.
त्यातील एक बी फोडल्यावर त्यात काहीच दिसत नाही. त्यावर महर्षी आरुणी श्वेतकेतूला म्हणतात, ‘‘बाळा, हे जे ‘काही नाही’ आहे ना, तेच ब्रह्म आहे! तोच आत्मा आहे! आणि तेच तू सुद्धा आहेस!’’
तत् त्वम् असि या छोट्याशा बीमध्ये एक संपूर्ण वटवृक्ष निर्माण करण्याचे ज्ञान आणि सामर्थ्य अतिसूक्ष्मरूपात भरून राहिले आहे. ते जाणल्यावर सर्व काही ज्ञात होते.
श्रीकृष्ण म्हणतो, ‘श्रद्धावान तत्त्वज्ञाला ज्ञान प्राप्त होते. आणि मग तो परमशांती अनुभवू शकतो. अरे अर्जुना, अज्ञानामुळे मन संशयाने ग्रस्त होते. तो संशय स्वतःच्या ज्ञानरूपी तलवारीने छेदून टाक आणि कर्मयोगाचे आचरण कर.’
- श्रुती आपटे