संत तुकाराम महाराज बीज विशेष : संत तुकारामांचे शिक्षणशास्त्र

संत तुकारामांचे शिक्षणशास्त्र चिरनुतन असल्यामुळे काळाच्या उदरातून वेळोवेळी उद्भवलेल्या शैक्षणिक समस्येची उत्तरे त्यात निश्चितच सापडतात.
Sant Tukaram Maharaj
Sant Tukaram MaharajSakal

वर्तमान शैक्षणिक वास्तव प्रचंड अस्वस्थ करणारे आहे. स्वतःच्या शिक्षणासाठी जेवढा ताण पालकांनी कधी घेतला नव्हता तेवढा ताण आज मुलांच्या शिक्षणासाठी घेत आहेत. स्पर्धेच्या युगात आपला पाल्य मागे राहू नये म्हणून अविश्रांतपणे मुलांना पळवत त्यामागे आपणही पळत आहेत. पालकांच्या दृष्टीने पाल्य आज रेसचा घोडाच बनला आहे. शिक्षणाच्या बाजारात नर्सरी पासूनच नीट व आयआयटी फाउंडेशन वर्गाच्या जाहिराती केल्या जाऊ लागल्या आणि पालकही त्याला बळी पडू लागले. मुक्तपणे खेळण्या बागडण्याच्या कोवळ्या वयात अभ्यासाच्या अवास्तव ओझ्याने मुलांचे बालपण चिरडले जात असून, त्याचा दूरगामी परिणाम भावी आयुष्यावर होत आहे. या पार्श्वभूमीवर संत तुकारामांचे शिक्षणशास्त्र समाजासमोर येणे गरजेचे वाटते. संत तुकारामांनी केवळ शिक्षणासंदर्भात स्वतंत्र विचार मांडला नसला तरी पारमार्थिक उपदेशासंदर्भात ओघाने जे चिंतन केले ते एका अर्थाने त्यांचे शिक्षणशास्त्रच होते. संत तुकारामांचे शिक्षणशास्त्र चिरनुतन असल्यामुळे काळाच्या उदरातून वेळोवेळी उद्भवलेल्या शैक्षणिक समस्येची उत्तरे त्यात निश्चितच सापडतात.

वर्तमान शिक्षण व्यवस्थेत एकाच साच्याचा गणपती बनवण्याचा जो अट्टहास चालू झाला त्यातून आजची जीवघेणी स्पर्धा आली. ही स्पर्धा प्रगतीबरोबरच माणसाला अस्वस्थता आणि अशांतीकडे घेऊन जाताना दिसते. मुलाची कुवत, कल आणि गुणवत्ता न पाहता शेजाऱ्याकडे पाहून आपल्या मुलांची शाळा आणि अभ्यासक्रम निवडून त्याला पळायला भाग पाडले जात आहे. यातून काही मोजकी मुलं यशस्वी झाल्याचे चित्र दिसत असले, तरी या दुष्टचक्रात उद्धवस्थ होणाऱ्यांचे प्रमाण मात्र अगणित आहे. ‘अधिकार तैसा करावा उपदेश। साहे ओझें त्यास तें चि द्यावे। मुंगीवरी भार गजाचें पाळण। घालितां ते कोण कार्यसिद्धी।।’ या अभंगात ज्याचा जेवढा अधिकार असेल त्याला त्याच्या कुवती इतकाच उपदेश करावा. ज्याला जेवढे वाहून नेणे शक्य असेल तेवढेच ओझे द्यावे. एखाद्या हत्तीच्या पालनपोषणाचा भार मुंगीवर घालून तो तिला कसे झेपेल? आणि त्यातून काय साध्य होईल? असे संत तुकाराम विचारतात. हत्तीचा आहार मुंगीच्या मुखात कोंबण्याचा प्रयत्न केला तर मुंगी गुदमरून मरेल असे संत तुकाराम सांगतात. आज कोवळ्या मुलांच्या मनावर आपल्या अवास्तव अपेक्षांचे ओझे लादून त्यांना पळवणारे पालक आणि वर्तमान शिक्षण व्यवस्थेच्या दृष्टीने हे संत तुकारामांचे चिंतन अत्यंत उद्बोधक आहे.

वर्तमान शिक्षण व्यवस्थेतून घरोघरी डॉक्टर आणि इंजिनिअर निर्माण होतीलही परंतु बहुश्रुत, समृद्ध, सुजान, सृजनशील, विवेकी माणूस क्वचितच दिसेल. उद्या गरज पडल्यास डॉक्टर आणि इंजिनिअर आयात करता येतील; पण येथील मानवी जीवन सुंदर, समृद्ध आणि उन्नत करणारे कलावंत, संशोधक, विचारवंत, हे कोणतीही किंमत मोजून आयात होत नाहीत. ते याच मातीतून निर्माण व्हावे लागतात. त्यासाठी शिक्षणव्यवस्था ही माणसाच्या अद्वितीयत्वाला फुलवणारी असली पाहिजे. संत तुकाराम माणसाच्या अद्वितीयत्वाला विलक्षण महत्त्व देतात. ‘तुका म्हणे झरा। आहे मुळीचाची खरा।।’ ही त्यांची भूमिका आहे. पण, आज मूळ गुणवत्तेपेक्षा गुणपत्रिकेला अधिक महत्त्व असल्यामुळे आजचे शिक्षण सृजन, संशोधन आणि ज्ञाननिर्मितीच्या दृष्टीने कुचकामी ठरताना दिसते.

आज प्रत्येक परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावणारा विद्यार्थी जीवनात मात्र सपशेल नापास होताना दिसतो आहे. केवळ पाठांतरप्रधान पोपटपंची शिक्षण वास्तव जीवनाला सामोरे जाण्याच्या दृष्टीने कुचकामीच ठरते. शिक्षणाला अनुभूतीचा आधार असावा याबाबत संत तुकाराम विलक्षण आग्रही आहेत. ‘अनुभव आले अंगा। ते या जगा देत असे।।’ असे ते स्वतःबद्दल सांगतात. आपली शिकवण इतरांच्या मस्तकात उतरवण्यासाठी प्रत्येक शब्दाला अनुभूतीचा आधार आवश्यक ठरतो. अनुभवाधिष्टीत शिक्षण माणसाला कृतिप्रवण बनवतो, हा संत तुकारामांचा ठाम विश्वास आहे. ‘बोलाचीच कढी बोलाचाच भात।’ या अभंगात बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात जेवून कोण तृप्त झाला? कागदावर साखर शब्द लिहून तो चाटला तर साखरेची गोडी कळेल का? असे प्रश्न उपस्थित करून शाब्दिक ज्ञानाची निरर्थकता संत तुकाराम स्पष्ट करतात. अनुभूतीशून्य शाब्दिक ज्ञान आरशातील धनाप्रमाणे निरुपयोगी असल्याचे ते आपल्या एका अभंगात नमूद करतात.

आज समाजातील सर्वस्तरात शिक्षणाचा प्रसार होऊनही समाजाचा नैतिक स्तर मात्र म्हणावा तसा उंचावताना दिसत नाही. याची कारणं वर्तमान पाठांतरप्रधान पोपटपंची शिक्षणव्यवस्थेतच सापडतात. यादृष्टीने संत तुकारामांच्या पुढील अभंगातला विचार महत्त्वपूर्ण ठरतो. ‘अर्थेवीण पाठांतर कासया करावे। व्यर्थ चि मरावें घोकुनियां।। घोकुनियां काय वेगीं अर्थ पाहे। अर्थरूप राहे होऊनिया।।’ अर्थ समजून न घेता कोणत्याही शास्त्रांचे अथवा ग्रंथांचे पाठांतर कशाला करावे? घोकून फुकट मरावे कशासाठी? नुसते घोकून काय उपयोग? लगेच अर्थ पहा आणि अर्थाप्रमाणे तुम्ही व्हा, असे संत तुकाराम सांगतात. ‘कथनी पठणी करुनि काय। वांचुनि रहणी वांयां जाय।।’ सद्विचाराप्रमाणे वागणूक नसेल तर केवळ त्यांचा अभ्यास, वाचन, आणि कथन करून काय उपयोग? असा सवाल संत तुकाराम करतात. शिक्षणातून मूल्यांची रुजवणूक होऊन समाजाचा नैतिक स्तर उंचावला पाहिजे यावर संत तुकारामांचा कटाक्ष आहे.

मुलांच्या शिक्षणासाठी केवळ पालक धावपळ करून आणि ताण घेऊन काहीही साध्य होत नाही. विद्यार्थ्यांच्या मनात ज्ञानलालसा कशी असावी हे विशद करताना दैनंदिन जीवनातील निरनिराळे दाखले संत तुकाराम देतात. ‘मुंगीचिया घरा कोण जाये मूळ। देखोनिया गुळ धाव घाली।।’ मुंगीच्या घरी कोणी गूळ खायला या असं निमंत्रण धाडत नाहीत; तर तीच गुळाचा शोध घेत गुळा पर्यंत पोचते. त्याच प्रमाणे आपल्या आवडीच्या ज्ञानापर्यंत जाण्यासाठी आपणच धडपडले पाहिजे असे संत तुकाराम सांगतात. जीवनाची काही अंग तर इतकी सूक्ष्म असतात, की तिथं बाहेरच्या मदतीपेक्षा माणसाच्या मनाची भरारीच महत्त्वाची असते. ‘मीचि मज व्यालो। पोटा आपुलिया आलो।।’ या अभंगातून आपल्यातील गुणवत्तेचा अंतर्मुख होऊन शोध घेत आपलं जीवनध्येय आपणच ठरवलं पाहिजे अशी भूमिका संत तुकाराम मांडतात.

संत तुकारामांच्या शिक्षणशास्त्राला समत्वभावाचे अधिष्ठान आहे. ‘मेघवृष्टीने करावा उपदेश’ या अभंगात गुरूने समवृत्तीनं आणि निरपेक्ष भावनेनं सर्वांना उपदेश करावा. कोणत्याही प्रकारचा भेदभाव करू नये. ज्ञान घेणारा आपली भावना, जिज्ञासा, विचारशक्ती, इच्छाशक्ती, आवाका, जीवनविषयक दृष्टिकोन यांना अनुसरून एखादी गोष्ट स्वीकारेल वा स्वीकारणार नाही परंतु देणाऱ्यांनी पक्षपात करता कामा नये, असे संत तुकाराम बजावून सांगतात. ‘ओनाम्याचे काळे। खडे मांडविलें बाळे।। तें चि पुढें पुढें काई। मग लागलिया सोई।।’ या अभंगात विद्यार्थ्यांच्या ग्रहण क्षमतेनुसार अभ्यासक्रमाचे स्वरूप असावे ही संत तुकारामांची भूमिका ध्वनित होते. भविष्यकाळात विद्यार्थ्यासाठी सामाजिक आणि

भावनिक बुद्धयांक महत्त्वाचे ठरणार आहेत. उद्याला क्रिएटिव्हिटी, कम्युनिकेशन, कोलेब्रेशन आणि क्रिटिकल थिंकिंग ही कौशल्य महत्त्वाची आहेत. या सर्व कौशल्याचे संवर्धन करून उद्याचा समृद्ध माणूस उभा करण्याच्या दृष्टीने संत तुकारामांच्या शिक्षणशास्त्राविषयी संशोधन होणे गरजेचे ठरते.

(लेखक देगलूर येथील वै. धुंडा महाराज देगलूरकर महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com