Science In Spirituality : ज्ञान आणि विज्ञानातूनच होऊ शकते इश्वर प्राप्ती l Science In Spirituality bhagvat geeta lord krishna mahabharat | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Science In Spirituality

Science In Spirituality : ज्ञान आणि विज्ञानातूनच होऊ शकते इश्वर प्राप्ती

श्रुती आपटे

Science In Spirituality : बहूनां जन्मनामन्ते ज्ञानवान्मां प्रपद्यते।

वासुदेवः सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः।।

ज्ञानी भक्त पुष्कळ जन्मांच्या शेवटी मला, म्हणजेच परमेश्वराला येऊन प्राप्त मिळतो. सर्वच वासुदेवमय आहे, असे जाणणारा महात्मा सापडणे खूपच कठीण आहे.

ज्ञानी भक्त सर्वश्रेष्ठ असतो. त्याला सर्वकाही वासुदेवच आहे, अशी अनुभूती सतत येत असते. तो आणि ईश्वर भिन्न नसतात. ‘वासुदेव’ म्हणजे सर्वव्यापी, सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, सर्वांच्या ठिकाणी प्रकाशणारे तत्त्व. सर्व भूतमात्रांच्या ठाई वास करणारा देव.

गीतेचा सातवा अध्याय, म्हणजेच ज्ञान-विज्ञान योग. यात ज्ञान म्हणजे काय आणि विज्ञान म्हणजे काय हे समजून घेणे आवश्यक आहे. या विश्वाच्या उत्पत्तीचे कारण श्रीकृष्ण, म्हणजेच ईश्वर आहे. हे जाणणे म्हणजे ज्ञान आणि सर्व काही वासुदेव श्रीकृष्णच आहे हा अनुभव होणे, हे विज्ञान आहे. अनुभवामुळे ईश्वराशी एकरूपता साधली जाते. त्यामुळे ईश्वरप्राप्तीसाठी ज्ञान आणि विज्ञान दोन्ही आवश्यक असतात. जसे मोगऱ्याच्या फुलाला सुगंध असतो हे माहिती असणे हे ज्ञान आणि स्वतः फुलाचा वास घेऊन सुगंधाचा आनंद अनुभवणे हे विज्ञान.

सर्वच भक्त श्रेष्ठ प्रतीचे ज्ञानी असत नाहीत. मग त्यांनी केलेल्या उपासनेचे फळ त्यांना मिळते का? काही जण मनात कोणतीतरी इच्छा ठेवून वेगवेगळ्या देवांची भक्ती करतात. श्रीकृष्ण म्हणतो, ‘जो जो भक्त ज्या ज्या देवतेची भक्ती करतो तिथे त्याची श्रद्धा मीच निर्माण करतो. त्या आराधनेचे फळही त्यांना मिळते. परंतु ते टिकणारे नसते.’

वासुदेव: सर्वम्। या न्यायाने त्या देवतांमध्येही ईश्वर असतोच. गीतेमध्ये श्रीकृष्णांनी मांडलेला हा विचार किती सूक्ष्म आणि महत्त्वाचा आहे हे लक्षात घ्यायला हवे. आपण सर्वजण निरनिराळ्या प्रसंगी अनेकांना देवता मानून पूजा करतो. वड, पिंपळ, औदुंबर अशा वृक्षांना आपण देव मानतो‌. गाय, बैल, नाग यांची आपण पूजा करतो‌. शेतकरी भूमातेची पूजा करतात. ती पूजा ईश्वराचीच पूजा असते‌. त्यामुळेच इतर देवतांची पूजा करणाऱ्यांचा आपण द्वेष करत नाही. हा श्रीकृष्णांनी केलेल्या उपदेशाचाच परिणाम आहे.