‘कृष्णा-मराठवाडा’ प्रकल्प वर्षाअखेरपर्यंत मार्गी लागणार : जयंत पाटील

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 मार्च 2020

वर्षअखेरपर्यंत ही कामे मार्गी लागतील, पश्चिम नद्यांचे पाणीही मराठवाड्यास उपलब्ध करून दिले जाणार आहे, यासाठी सुरू असलेली कुठलीही कामे रद्द करण्यात आलेली नाहीत.

औरंगाबाद : कृष्णा खोऱ्यातील पाणी मराठवाड्याला उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असून कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्प राबविला जात आहे. त्यासाठी ८५० कोटी रुपयांची तरतूद केलेली असून, वर्षाअखेरपर्यंत या प्रकल्पाचे काम मार्गी लागेल, अशी ग्वाही जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी येथे दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहरातील विविध कार्यक्रमांसाठी शनिवारी (ता.७) प्रमुख अतिथी म्हणून आलेल्या जलसंपदा मंत्री पाटील यांनी आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी भवनात आयोजित मेळाव्यास संबोधित केले. तत्पूर्वी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, मराठवाड्यातील दुष्काळाची समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी कृष्णा खोऱ्यातील पाणी मराठवाड्यात आणून उस्मानाबाद, लातूर आणि काही अंशी बीड जिल्ह्यातील काही तालुक्यांसाठी उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 

- 'वर्षा'च्या भिंतींवर 'त्या' मजकूराबद्दल अमृता फडणवीस म्हणतात...

मराठवाड्याला कृष्णा-मराठवाडाच्या माध्यमातून ७ टीएमसी पाणी उपलब्ध करून दिले जाईल, यासाठी कृष्णा खोऱ्यातील बोगद्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हे पाणी अगोदर उजनी धरणात सोडून नंतर ते मराठवाड्यासाठी उपलब्ध करून दिले जाईल. त्यासाठी अर्थमंत्री अजित पवार यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात भरीव ८५० कोटींची तरतूद केली आहे.

- #पीएम_पनौती : 'या' कारणामुळे मोदी होत आहेत ट्रोल!

वर्षअखेरपर्यंत ही कामे मार्गी लागतील, पश्चिम नद्यांचे पाणीही मराठवाड्यास उपलब्ध करून दिले जाणार आहे, यासाठी सुरू असलेली कुठलीही कामे रद्द करण्यात आलेली नाहीत, असेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला खाते उघडता आले नाही, याचा खेद वाटतो. त्यास काही आमच्या आणि काही स्थानिक पातळीवरच्या चुका आहेत, अशी कबुलीही पाटील यांनी यावेळी दिली. 

- Video : 'मला तुमच्यात देव दिसतो,' असं म्हणताच मोदींना अश्रू अनावर!

मराठा संघटनांची घोषणाबाजी 

मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मुंबई येथील आझाद मैदानावर ४० दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. त्याची सरकारने दखल घ्यावी, यासाठी मराठा संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मंत्री पाटील यांचे भाषण सुरू असतानाच सभागृहात प्रवेश करीत घोषणाबाजी केली. यावेळी पाटील यांनी आपले भाषण सुरूच ठेवले. आपली दखल घेत नाहीत, हे लक्षात येताच आंदोलकांनी पुन्हा घोषणा सुरू केल्या. त्यानंतर राष्ट्रवादीच्या युवा कार्यकर्त्यांनी आंदोलकांना सभागृहाबाहेर नेले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Krishna Marathwada project will be completed by the end of the year says Jayant Patil