Video : 'मला तुमच्यात देव दिसतो,' असं म्हणताच मोदींना अश्रू अनावर!

PM-Modi
PM-Modi

नवी दिल्ली : जगातील प्रभावशाली नेत्यांमध्ये गणना होणाऱ्या आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपण नेहमीच धडाडी आणि कणखर भूमिकांमध्येही पाहतो. मात्र, इतर माणसांसारखे तेदेखील भावूक होतात, हे आज आणखी एकदा पाहायला मिळाले. मोदी भावूक झाल्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात ट्रेंडिंग आहे. 

पंतप्रधान भारती जनऔषधी योजनेच्या (पीएमबीजेपी) लाभार्थींशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान मोदी संवाद साधत होते. यादरम्यान, एका लाभार्थी महिलेनं मोदींचे आभार मानल्यावर त्यांना रडू कोसळले. दीपा शाह असं या लाभार्थी महिलेचं नाव असून त्या उत्तराखंडच्या डेहराडून येथून मोदींशी संवाद साधत होत्या.

२०११ मध्ये त्यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यामुळे त्यांना नीट बोलताही येत नव्हतं. उपचारावर खूप खर्च होत असल्याने त्यांना घर चालवणंही कठीण झालं होतं. मात्र, जेनरिक औषधे घेण्यास सुरवात केल्यानंतर त्यांना फरक जाणवू लागला. तसेच पैशांमध्येही बचत होऊ लागली. 

पूर्वी महिन्याकाठी ५ हजार रुपये औषधांवर खर्च व्हायचे मात्र, आता जनऔषधी योजनेद्वार फक्त १५०० रुपयांमध्येच त्यांना सर्व औषधे मिळतात. उरलेल्या ३ हजार रुपयांमध्ये फळे आणि इतर आवश्यक गोष्टींवर खर्च होत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.  

ही माहिती देत असताना त्यांनी 'मी देव पाहिला नाही, पण मोदीजी तुमच्या रुपात मला देव दिसला,' असे म्हणत तिने आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. हे पाहिल्यावर मोदींनाही आपल्या भावना अनावर झाल्या. तेव्हा त्यांच्याही डोळ्यात अश्रू तरळल्याचे दिसून आले. 'तुमची प्रबळ इच्छाशक्ती हाच तुमचा देव आहे. तुम्ही तुमच्या आजाराला हरवलं आहे,' असं म्हणत भावूक झालेल्या मोदींनी त्या महिलेला आधार दिला.

भावनांना आवर घालत मोदींनी देशात येऊन ठेपलेल्या कोरोना व्हायरसबद्दलही आपले मत व्यक्त केले. कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी एकमेकांशी हातमिळवणी टाळा. शंका आल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा. तसेच कोरोनाबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहनही त्यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com