वडिलांना सायकलवरून घेऊन जाणाऱ्या ज्योतीने फेटाळला चक्क क्रीडामंत्र्यांचा प्रस्ताव; सांगितले महत्वाचे कारण

jyoti
jyoti

पाटणा ः वडिलांना घरी आणण्यासाठी बाराशे किलोमीटर सायकलिंग केलेली ज्योती कुमारी अक्षरशः एका रात्रीत स्टार झाली. तिने सायकलिंगमध्ये कारकीर्द घडवावी, यासाठी क्रीडामंत्री प्रयत्नशील आहेत, मात्र ज्योतीने आपल्यासाठी सध्या अभ्यास जास्त महत्त्वाचा आहे, असे सांगत सरावास नम्र नकार दिला.

ज्योतीचे वडिल हरियाणात काम करीत होते. ते जखमी झाले होते. लॉकडाऊनमध्ये वडिलांना घरी नेण्यासाठी कोणतेही साधन नव्हते, म्हणून ज्योतीने वडिलांना सायकलच्या कॅरीअरवर बसवले आणि सात दिवस बाराशे किलोमीटर सायकलिंग करीत घरी नेले. ज्योतीच्या या अतुलनीय कामगिरीचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाला. तिच्या कामगिरीची न्यूयॉर्क टाइम्ससह जगभरातील अनेक वर्तमानपत्रांनी दखल घेतली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इव्हांका ट्रम्प हिनेही ज्योतीच्या धैर्याला सलाम केला. 

ज्योतीने सायकलिंगमध्ये कारकीर्द करावी, यासाठी क्रीडामंत्र्यांनी भारतीय सायकलिंग महासंघ तसेच क्रीडा प्राधिकरणास सूचना दिली. ज्योतीबरोबर तातडीने संपर्क साधण्यात आला. तिला लॉकडाऊन संपल्यानतंर दिल्लीत येऊन चाचणी देण्यास सांगण्यात आले. त्यासाठीचा सर्व खर्च करण्यात येईल, असेही सांगण्यात आले, मात्र ज्योतीने त्यास नकार दिला आहे. मला पहिले अभ्यासाकडे लक्ष द्यायचे आहे. सध्या तर मी खूपच खचले आहे, असे ज्योतीने सांगितले. आमच्या कुटुंबासमोर अनेक प्रश्न होते, त्यामुळे मला शिकता आले नव्हते. मला घरचे काम करावे लागत होते, पण आता मला अभ्यास करायचा आहे. दहावी उत्तीर्ण व्हायचे आहे, असे तिने सांगितले. तिच्या शिक्षणाचा सर्व खर्च करण्याची तयारी लोकजनशक्ती पार्टीचे प्रमुख चिराग पासवान यांनी दाखवली. 

ज्योतीचे वडील मोहन कुमार यांनी कन्येला चाचणीस पाठवण्याची तयारी दाखवली होती. तिने कालच नववीत प्रवेश घेतला आहे. तिने दहावी पूर्ण करावे, असे आम्हाला वाटत आहे. ज्योतीला पिंदारुच हायस्कूलमध्ये प्रवेश देण्यात आला आहे. तिला नवी सायकल, शाळेचा युनिफॉर्म तसेच शूज भेट देण्यात आले आहेत. बिहारच्या या कन्येला सायकलिंग महासंघाने चाचणीसाठी बोलावले असल्याचे महासंघाचे अध्यक्ष ओंकार सिंग यांनी सांगितले होते. सायकलिंगसाठी आवश्यक असलेली ताकद तसेच शारिरीक क्षमता तिच्याकडे नक्कीच आहे, असे त्यांनी सांगितले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com