esakal | रामदेव बाबांच्या संस्थांमध्ये कोरोनाचा शिरकाव; कुंभमेळ्यातील आणखी साधू संक्रमित

बोलून बातमी शोधा

रामदेव बाबांच्या संस्थांमध्ये कोरोनाचा शिरकाव; कुंभमेळ्यातील आणखी साधू संक्रमित

रामदेव बाबांच्या संस्थांमध्ये कोरोनाचा शिरकाव; कुंभमेळ्यातील आणखी साधू संक्रमित

sakal_logo
By
टीम इ सकाळ

देहरादून : योगगुरु रामदेव बाबा यांच्यामार्फत चालवल्या जाणाऱ्या पतंजलीच्या आचार्यकुलम, योगपीठ आणि योगग्राममधील 39 स्टाफ मेंबर्स आणि विद्यार्थ्यांना कोरोना संक्रमण झाल्याचे गेल्या रविवारी निष्पन्न झाले आहे. हरिद्वार आरोग्य विभागातर्फे घेण्यात आलेल्या आरटी-पीसीआर चाचणीमध्ये जूना आखाड्यातील नऊ आणि निरंजनी आखाडा येथील दोन ऋषींचीही चाचणी घेण्यात आली असून त्यांचेही रिपोर्ट गेल्या रविवारी पॉझीटीव्ह आल्याचं निष्पन्न झालं आहे. हरिद्वारचे मुख्य वैद्यकीय अधिकारी (सीएमओ) डॉ. एसके झा यांनी सांगितलंय की, रविवारी 2034 रॅपिड एँटीजन टेस्ट घेण्यात आल्या असून त्यापैकी 23 पॉझीटिव्ह निघाले आहेत, तर दिवसभरात जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून 852 आरटी-पीसीआरचे नमुने घेण्यात आले होते, त्यांचे रिझल्ट्स येत्या 24 ते 48 तासांमध्ये मिळतील.

हेही वाचा: कोरोनाचा उद्रेक, कुंभमेळा प्रतिकात्मक घ्या; PM मोदींचे आवाहन

CMO च्या सांगण्यानुसार, कुंभमेळ्याची अधिकृतपणे सुरुवात झाल्यापासून म्हणजेच एप्रिलपासून आतापर्यंत 150 हून अधिक साधूंना हरिद्वारमध्ये कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. शनिवारी रात्री उशिरा मेळ्यातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या हेल्थ बुलेटिननुसार, एकट्या देहरादूनच्या मेळा भागात घेण्यात आलेल्या 700 आरएटी चाचणीमध्ये 188 लोक पॉझीटीव्ह निघाले आहेत. तर, शनिवारी मेळा क्षेत्रात एकूण 9462 चाचण्या घेण्यात आल्या असून त्यामध्ये 327 जण पॉझीटीव्ह निघाले आहेत. हरिद्वारमध्ये सुरु असलेला कुंभमेळा आता कोरोना विषाणूसाठीचा हॉटस्पॉट बनला आहे. देशात कोरोनाची इतकी मोठी महाभयंकर साथ असताना अशाप्रकारच्या मेळ्याच्या आयोजनाला प्रशासनाने परवानगी दिलीच कशी, असा सवाल आता उपस्थित होत आहे. या कुंभमेळ्यामध्ये आता मध्य प्रदेशहून आलेले निर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्वर कपिल देव यांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

हेही वाचा: Breaking - राहुल गांधी यांना कोरोनाची लागण

तर निरंजनी आखाड्याचे रविंद्र पुरी हे देखील कोरोना संक्रमित आढळले आहेत. याआधी त्यांनी आपल्या एका टि्वटमध्ये म्हटलं होतं की, कुंभमेळ्यात कोविड-19 ची बिघडती परिस्थिती पाहता आमच्या दृष्टीने या आयोजनाचे समापन झाले आहे. मुख्य शाही स्नान संपुष्टात आलं आहे. आमच्या आखाड्यातील अनेक लोकांना कोरोनाची लक्षणे दिसत आहेत. मेळ्यात अनेक साधून कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत, असंही त्यांनी म्हटलं होतं. गेल्या वर्षी तबलिगी जमातच्या मरकजमुळे कोरोना पसरल्याचा आरोप मोठ्या प्रमाणावर करण्यात येत होता. त्याचप्रमाणे यंदा कुंभमेळ्यात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. मात्र, या आरोपांना उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी सरळसरळ धुडकावून लावलं होतं.