ममतांना धक्क्यांवर धक्के; मंत्र्याच्या राजीनाम्यानंतर पाच स्थानिक नेत्यांचाही राजीनामा

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 17 December 2020

पुढील वर्षी पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजणार आहेत.

कोलकाता : पुढील वर्षी पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजणार आहेत. मात्र, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणाची गरमागरम हवा आतापासून वाहण्यास सुरवात झाली आहे. या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला धडा शिकवण्याचा मानस भाजपचा आहे. त्यासाठी कंबर कसून आतापासूनच भाजप कामाला लागला आहे. शक्य तितक्या पातळ्यांवर आतापासूनच टीएमसीला धक्के देण्याचे डावपेच भाजपने आखलेले आहेत. याआधी तृणमूल काँग्रेसचे नेते सुवेंदू यांनी राजीनामा दिल्यानंतर पक्षाला मोठा हादरा बसला आहे. यानंतर आता तृणमूल काँग्रेसमधील पाच स्थानिक नेत्यांनीही पक्षाचा राजीनामा दिला आहे.

हेही वाचा - मोबाईलपासून ते टिव्हीच्या सिग्नल्सचा दर्जा सुधारणारे सॅटेलाईट होणार लाँच

सुवेंदू अधिकारी हे ममता बॅनर्जी यांच्या मंत्रीमंडळात मंत्री होते. त्यांनी अचानकच बुधवारी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. त्यांच्या धक्कादायक राजीनाम्यानंतर ते भाजप पक्षात जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. ते 19 डिसेंबर रोजी भाजपमध्ये जातील अशी चर्चा रंगली आहे. त्यांचा असा हा राजीनामा आणि भाजपप्रवेशाच्या चर्चा या तृणमूलसाठी मोठा धक्का मानला जात आहे. हा धक्का अद्याप ताजा असतानाच तृणमूलच्या इतर पाच स्थानिक नेत्यांनीही पक्षाचा राजीनामा दिला आहे. यामध्ये गोबिंदपूर-महेशपूर, बामोण गोला, पकुआ हट, जोग्गोडोल आणि चांदपूर येथील अध्यक्षांनी पदाचे राजीनामे दिले आहेत. जिल्हाध्यक्ष मोसम नूर आणि जिल्हा समन्वयक बाबला सरकार यांच्याकडे हे राजीनामे या नेत्यांनी सुपूर्द केले आहेत.

हेही वाचा - जिओची जाहिरात करणारे मोदी एकमेव पंतप्रधान; नवज्योतसिंग सिद्धूंची सडकून टीका

हा राजीनामा देत असताना त्यांनी म्हटलंय की, पक्षामध्ये सन्मान मिळत नसल्याने लोकांची कामे करता येत नाहीयेत. त्यामुळे पक्षाचा राजीनामा देत आहे, असं त्यांनी स्पष्ट केलंय. याबाबत तृणमूल काँग्रेसचे मालदाचे जिल्हा समन्वयक बाबला सरकार यांनी म्हटलंय की, राजीनामे महत्त्वाचे नसून प्रत्येक विभागात समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत. याआधी सुवेंद अधिकारी यांनी ममतांच्या मंत्रीमंडळातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यानंतर आता त्यांनी थेट आमदारकीचाच राजीनामा दिला आहे. या कुरघोड्या भाजप करत असून भाजपच नेत्यांना फोडत असल्याचा आरोप तृणमूलने केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 5 tmc leaders resign after suvendu adhikari an another jolt to mamata banerejee