Coronavirus : २४ तासांत कोरोनाच्या ६९३ नव्या केसेस; तबलिगींच्या संपर्कात...

वृत्तसंस्था
Monday, 6 April 2020

खासदारांच्या मासिक मानधनात ३० टक्के कपात करण्यात आल्याचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.

नवी दिल्ली : देशभरात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाच्या ६९३ नव्या केसेस पुढे आल्या आहेत. त्यामुळे देशभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ४०६७ एवढी झाली आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महत्त्वाची गोष्ट ही की, यापैकी १४४५ रुग्ण हे तबलिगी जमातच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते, किंवा त्यांच्या संपर्कात आले होते, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अगरवाल यांनी दिली. 

- ...या ग्रंथात दिला आहे सोशल डिस्टंसिंगचा संदेश

अगरवाल पुढे म्हणाले की, आतापर्यंत समोर आलेल्या कोरोना केसेसमध्ये ७६ टक्के पुरुष, तर २४ टक्के महिलांचा समावेश आहे. रविवारी (ता.५) ३० लोकांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या १०९ झाली आहे. यातील ६३ टक्के मृत व्यक्ती या ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या होत्या. तर ४० ते ६० वयोगटातील ३० टक्के रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ७ टक्के लोक हे ४० वर्षांपेक्षा लहान या वयोगटातील आहेत. 
तबलिगी जमातीशी निगडीत महत्त्वाची माहितीही आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

- सायबर भामटेगिरीला आलाय ऊत, 'या' पाच गोष्टींनी तुमची होऊ शकते फसवणूक...

आतापर्यंत २५ हजारहून अधिक तबलिगी जमातीतील लोक आणि त्यांच्या संपर्कात आलेल्यांना क्वॉरंटाइन करण्यात आले आहे. तसेच हरयाणातील ज्या ५ गावांमध्ये हे लोक गेले होते, त्या सर्व गावांना सील करण्यात आलं आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाच्या संयुक्त सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी दिली. 

अन्नधान्याचा पुरवठा

नॅशनल हेल्थ मिशन फंड्स अंतर्गत राज्यांसाठी ११०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. त्यानंतर सोमवारी (ता.६) पुन्हा ३००० कोटी रुपयांचा अतिरिक्त निधीलाही मंजूरी देण्यात आल्याचे अगरवाल यांनी सांगितले. यावेळी त्यांनी भारतीय रेल्वेचे विशेष कौतुक केले. गेल्या १३ दिवसांमध्ये रेल्वेने १३४० डब्यांद्वारे माल वाहतूक केली. संपूर्ण देशभरात १६.९४ मेट्रिक टन गहू, तांदूळ आणि इतर अन्नधान्याची वाहतूक करण्यात आली आहे. 

- Fight with Corona : राष्ट्रपती, पंतप्रधानांसह खासदारांच्या वेतनात ३० टक्के कपात; केंद्र सरकारचा निर्णय

दरम्यान, खासदारांच्या मासिक मानधनात ३० टक्के कपात करण्यात आल्याचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. तसेच खासदार निधी २ वर्षांसाठी रद्द करण्यात आला असून पगारातील कपात ही पुढील एक वर्षासाठी राहणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 693 new COVID19 cases have been reported in the last 24 hours declared Health Ministry