esakal | मनाली: मास्क नसेल तर पाच हजारांचा दंड आणि 8 दिवस तुरुंगवास
sakal

बोलून बातमी शोधा

मनाली: मास्क नसेल तर पाच हजारांचा दंड आणि 8 दिवस तुरुंगवास

मनाली: मास्क नसेल तर पाच हजारांचा दंड आणि 8 दिवस तुरुंगवास

sakal_logo
By
विनायक होगाडे

मनाली : लोकप्रिय पर्यटनस्थळ मनाली येथे कोविडच्या प्रोटोकॉलचे पालन होत नसल्याचे आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाने चिंता व्यक्त केली आहे. तिसऱ्या लाटेचे संकट असताना पर्यटकांकडून होणारा हलगर्जीपणा रोखण्यासाठी कडक दंडाची तरतूद करण्यात आली आहे. मास्क न घालणाऱ्या पर्यटकास पाच हजाराचा दंड किंवा ८ दिवसाचा तुरुंगवास अशी तरतूद करण्यात आली आहे.

हेही वाचा: 'सहकार क्षेत्र बुडविणाऱ्यांना नव्या खात्यासंदर्भात भीती'

गेल्या काही दिवसांपासून हिमाचलच्या अनेक भागात पर्यटकांची गर्दी दिसून येत आहे. मनाली, कुलू, धर्मशाला, सिमला आदी ठिकाणी पर्यटकांची संख्या वाढल्याने हॉटेलही फुल्ल झाले आहेत. सोशल डिस्टन्सिग आणि मास्कच्या नियमांचे पालन होत नसल्याने संसर्गाचा प्रसार होण्याची भीती वाढत चालली आहे. त्यामुळे कुलूचे पोलिस अधीक्षक गुरुदेव शर्मा यांनी नियमांचे पालन न करणाऱ्या पर्यटकांना जबर दंड आकारण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे काही दिवसांतच ३ लाखांचा दंड वसूल केला आहे. मास्क न घातल्यास पाच हजार रुपये किंवा ८ दिवसाचा तुरुंगवासाची शिक्षा होवू शकते, असे शर्मा यांनी म्हटले आहे. निर्बंधात शिथिलता आणल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून जनजागृती मोहीम राबवण्यात आली होती. तरीही पर्यटकांनी त्याचे फारसे पालन केले नाही. हिमाचल, उत्तराखंड येथील मनाली, मसुरी येथे पर्यटकांची होणारी गर्दी पाहता केंद्र सरकारने पर्यटनस्थळी निर्बंध लावण्याचा इशारा दिला आहे. आयसीएमआर आणि आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भात वारंवार सूचना दिल्या जात असून नियमांचे पालन होत नसल्यास निर्बंध पुन्हा लागू होवू शकतात, अशी शक्यता वर्तविली आहे.

हेही वाचा: 'कोव्हॅक्सिन'चा आपत्कालीन वापराच्या यादीत लवकरच समावेश

नदीकाठावर पर्यटकांची गर्दी

उष्णतेपासून बचाव करण्यासाठी पंजाब, हरियाना, दिल्लीतील पर्यटक मोठ्या संख्येने कुलू आणि मनाली येथे दाखल होत आहेत. हे पर्यटक बियास नदीच्या किनाऱ्यावर धिंगामस्ती करत आहेत. मात्र जिल्हा प्रशासनाने अशा पर्यटकांवरही दंड आकारण्यास सुरवात केली आहे. सध्या पाऊस असल्याने आणि बर्फ वितळत असल्याने पाणी पातळी वाढत चालली आहे. त्यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे नागरिकांनी नदीकाठावर जाऊ नये, असे आवाहन केले जात आहे.

loading image