
NCP: सिंघवींनी शरद पवारांच्या खास माणसाला समोर आणून अजित पवार गटाला पाडलं उघडं?
नवी दिल्ली- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाबाबत आज दिल्लीत निवडणूक आयोगासमोर सुनावणी पार पडली. आयोगाने पुढील सुनावणीची तारीख २६ नोव्हेंबर दिली आहे. यावेळी शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी माध्यमांशी संवाद साधला. अजित पवार गटाने खोटी प्रतिज्ञापत्रं सादर केली असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. तसेच यासंदर्भात एक सबळ पुरावा देखील माध्यमांसमोर ठेवला.
२६ ऑक्टोंबर रोजी निवडणूक आयोगासमोर प्रतिज्ञापत्रं सादर करण्यात आले होते की, प्रताप चौधरी हे अजित पवार गटाचे समर्थन करतात. पण, प्रताप चौधरी स्वत: याठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना जेव्हा याबाबत कळालं तेव्हा त्यांना धक्का बसला. कारण ते कट्टर शरद पवारांचे समर्थक आहेत. त्यामुळेच ते निवडणूक आयोगासमोर आज आले. आणि त्यांनी खरं प्रतिज्ञापत्रं दाखल केलंय, अशी माहिती सिंघवी यांनी दिली.
अजित पवार गटाकडून खोटी प्रतिज्ञापत्रं सादर केली जात आहेत. कुंवर प्रताप सिंग चौधरी हे शरद पवारांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक सदस्य आहेत. त्यांची खोटी स्वाक्षरी करुन निवडणूक आयोगासमोर प्रतिज्ञापत्रं सादर करण्यात आले. चौधरी स्वत: याठिकाणी उपस्थित आहेत. त्यामुळे अजित पवार गटाकडून कशी दिशाभूल केली जातीये हे स्पष्ट होतंय, असंही सिंघवी म्हणाले.
सत्याचा विजय होईल असा आम्हाला विश्वास आहे. अजित पवारांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये कुठेही उल्लेख नाही की, शरद पवार आमचे नेते नाहीत. कोणत्याही प्रतिज्ञापत्रामध्ये शरद पवारांच्या विरोधात काहीही लिहिलं नाही. त्यामुळे ही प्रतिज्ञापत्रं खोटं बोलून घेतली असल्याचं स्पष्ट होतंय. यावर योग्य निर्णय आमच्या बाजूने होईल, असा आम्हाला विश्वास आहे, असंही ते म्हणाले.
झोमॅटो बॉयचे शपथपत्र आहेत, एलआयची व्यक्तीचे, मेलेल्या व्यक्तीचे, अल्पवयीन मुलांचे, राज्याबाहेरील व्यक्तीचं प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहेत. त्यामुळे ही फसवणूक आहे, असंही सिंघवी म्हणाले. दरम्यान, सुनावणीवेळी शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड इत्यादी नेते उपस्थित होते. (Latest Marathi News)