ऐतिहासिक संधी साधणार की गमावणार

जागतिक पटलावर होणाऱ्या बदलाची संधी साधायला हवी
Ukraine Russia War
Ukraine Russia WarSakal

युद्ध थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे युक्रेनने माघार घ्यावी व संहार टाळावा, अशी सूचना कितपत योग्य आहे. अशा स्थितीत भारताला कशाप्रकारे संधी आहे, हे समोर येत आहे. जागतिक पटलावर होणाऱ्या बदलाची संधी साधायला हवी.

रशिया आणि युक्रेनमधील युद्धाने चौथ्या महिन्यात प्रवेश केला आहे. युद्धाच्या सुरवातीच्या काळात काही दिवसांत रशिया हे युद्ध जिंकेल आणि युक्रेनला माघार घ्यावी लागेल, हा जगाने बांधलेला होरा पूर्णतः उद्ध्वस्त झाला. रशियाचे सर्वेसर्वा व्लादिमीर पुतीन यांचे सर्व आडाखे आजघडीला तरी धुळीला मिळाल्याचे दिसून येते. हे पारंपरिक युद्ध एवढा काळ लांबेल याची कोणीही कल्पना केलेली नव्हती. मात्र प्रत्यक्षात तसे घडताना दिसत आहे. नेमके या घडलंय आणि काय घडतंय हे आपण नैतिकतेच्या पातळीवर पाहण्याचा प्रयत्न करू. युद्ध लांबू लागल्यामुळे जगभरातील बुद्धिजीवी युक्रेनला सल्ला देण्यास पुढे सरसावले आहेत. ९९ वर्षीय हेन्री किसिंजर म्हणतात, ‘युक्रेनने काही भूभाग देऊन तडजोड करावी. ‘न्यूयॉर्क टाईम्स’चे संपादकीय मंडळ म्हणते, ‘रशियाला पराभूत करणे अवघड आहे आणि अमेरिकेनेही पुतीन यांना टोमणे मारणे थांबवावे. युक्रेनने सौदा करून का होईना पण माघार घेणे हिताचे ठरेल.’ भारतासह संपूर्ण जगाचा कानोसा घेतला तरी याच स्वरुपाचा सल्ला सर्वच पातळ्यांवर दिला जात आहे. पाश्चात्त्य देशांनी रशियाला खिजवले आणि ‘नाटो’ने विस्ताराची घेतलेली भूमिका रशियाच्या जिव्हारी लागली आणि रशियाने युक्रेनवर आक्रमणाचे पाऊल उचलले. शेवटचा युक्रेनियन जिवंत असेपर्यंत लढत राहणार, हे नक्की.

झेलेन्स्की यांनी अजूनही वेळ न दवडता रशियाच्या अटी मान्य करून नरसंहार थांबवावा. कारण दोनबास्क प्रदेश व इतरत्र अनेक नागरिक स्वतःला रशियन मानतात आणि ते युक्रेनचा संहार होताना पाहू शकतात.हे विसरू नये. वाचकहो...आता मी एक कल्पना मांडतो. त्याबाबत विचार करा...ही निव्वळ कल्पना आहे हे लक्षात घ्या.

कल्पना करा एखाद्या उन्हाळ्यात चीनने सीमारेषेवरील तणावावरून लडाख आणि अरुणाचल या दोन्ही आघाड्यांवर हल्ले करून हा भूभाग ताब्यात घेण्याच ठरवले तर...भारत नक्कीच त्याचा मुकाबला करेल. त्यांच्यासोबत आपले जवान लढत असताना चीनच्या मदतीने पाकिस्तान काश्मीरमध्ये हल्ला करेल. या दोहोंशी लढताना भारताला नक्कीच प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. येथे दोघे एकत्र असल्याने साहजिकच त्यांची ताकद आपल्यापेक्षा जास्त असेल. मात्र तरीही आपण लढत राहू.समजा आपण काही भूभाग गमावला तरी आपण लढणे सोडणार नाही.अशावेळी ‘क्वाड’मधील आपले इतर सहकारी फ्रान्स व इस्त्राईलने मदत केली तरी आपली लढाई ही आपल्यालाच लढावी लागेल. एका टप्प्यावर शी जिनपिंग भारत आणि त्यांच्या मित्रराष्ट्रांसमोर युद्ध समाप्तीसाठी काही अटी ठेवेल. त्यामध्ये पाकिस्तानही त्यांच्या सोबत असेल...

भारताने अक्साई चीन औपचारिकरित्या सोडावे, लडाखमधील चीनची १९५९ मधील प्रत्यक्ष ताबा रेषा स्वीकारावी. अरुणाचल प्रदेशावरील हक्क सोडावा...त्यातही चीन उदारपणे फक्त तवांग जिल्हा भारताला सोडेल. दुसरीकडे काश्मीर खोरे पाकिस्तानला द्यावे आणि सहकार्य व शांतता प्रस्थापित करावी व भारताला जम्मू ठेवून लडाखमध्ये प्रवेश देऊ शकतात. दुसरीकडे लिपुलेखवरील नेपाळच्या दाव्यांचा निपटारा केला जाऊ शकतो. या सगळ्यांचा भारत तीव्र निषेध करेल. सर्व सूचना धुडकावून लावेल आणि ठामपणे उभा राहील. हे तीन अण्वस्त्रधारी देशांतील युद्ध सुरू झाले तर जग भीतीच्या छायेत वावरेल आणि मग भारताला लढण्यातील निरर्थकतेबाबत सल्ला देईल...

हिमालयातील पडीक जमिनीसाठी देशाच्या अस्तित्व धोक्यात घालण्यापेक्षा चीनसाठी ते महत्त्वाचे आहे तर त्यांना देऊन टाका, त्यांना पराभूत करणे सोपे नाही. तडजोड करणे योग्य ठरेल तसेच पाकिस्तानबाबतही करा. खोऱ्यातील लोक पाकिस्तानात खूश राहणार असतील तर त्यांना खुशाल तिकडे जाऊ द्या...निदान आपले नुकसान तरी टाळू शकतो... हे असे होईलच असे नाही. ही कल्पना आहे. मुळात चीन व पाकिस्तान भारताविरोधात अशी आगळीक करण्याचे धाडस करणार नाही. पण २४ फेब्रुवारीच्या सकाळपर्यंत जगभरात सर्वच जण रशिया आणि युक्रेनबाबत अशाच पद्धतीची मते मांडत होते.पण रशियाने हल्ला केलाच.रशियाकडे अण्वस्त्रे आहेत...परंतु तरीही त्याचे भयावह परिणाम माहिती असल्यामुळे ते अण्वस्त्रांचा हल्ला करतीलच असे नाही.जेव्हा सगळेच गमावले जाते आहे, अशी भावना तयार होईल. तेव्हा अखेरचा पर्याय म्हणून राष्ट्र अण्वस्त्रांचा हल्ला करू शकेल, अन्यथा नाही. रशिया सध्या तेच करत आहे. पुतीन यांच्या मागण्या मान्य करून युक्रेनने शिल्लक भूभाग आणि सार्वभौमत्व घेऊन जगावे, असा सल्ला युक्रेनियन लोकांना दिला जातो, ते पाहून त्यांना काय वाटत असेल. कोणत्याही राष्ट्रातील लोकांना त्यांचा राष्ट्रवाद जपण्याचा पूर्ण अधिकार आहे. जोपर्यंत ते लढण्यास तयार आहेत तोपर्यंत त्यांना सूचना करणारेही अनेक आहेत.त्यांना अशा सूचना करणे कितपत योग्य आहे.भारतावर अशी वेळ कधीच येऊ नये.आपल्या प्रदेशाच्या रक्षणासाठी आणि सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी कितीही किंमत असली तरी आम्ही एकत्रच राहू आणि सल्ला देणाऱ्यांना सुनावू...

या सर्वात भारतासाठी सकारात्मक बाब घडेल ती म्हणजे भारताच्या धोरणात्मक निर्णयामुळे जागतिक पटलावरील स्थान भक्कम होईल. हे पक्षपाती नसेल आणि सर्वांना आकर्षित करून घेणारे असेल. युद्धानंतर दुबळा रशिया, शांत चीन दिसून येईल. त्यातही शी जिनपिंग तिसरी टर्म व्यवस्थित पार पडावी यासाठी प्रयत्न करत राहातील. पाकिस्तानातील अराजक कायम राहील आणि पश्चिम देश एकत्र येण्यास प्रारंभ होईल. भारतासाठी आर्थिक, सामारिक व लष्करी मुद्यांवर बळकट होण्याची ऐतिहासिक संधी उपलब्ध होईल हे नक्की.

जागतिक संतुलन बदलेल...

रशियाने जरी हे युद्ध जिंकले आणि युक्रेन ताब्यात घेतला तरी रशिया आर्थिक आणि सामरिकदृष्ट्या कमकुवत होणार हे नक्की. बलाढ्य मित्र कमकुवत झाला हे पाहून चीनही काहीसा घाबरून जाईल. तो तातडीने अमेरिका आणि युरोपीय देशांसोबतचे संबंध दुरुस्त करण्याच्या मागे लागेल. भारतही तातडीने पश्चिमेकडे वळेल. रशियावरचे लष्करी अवलंबित्व कमी होईल. जागतिक सत्ता संतुलन पुन्हा एकदा बदलेल.

अनुवाद : प्रसाद इनामदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com