निष्क्रीय राहून बोलणं म्हणजे आत्मपरिक्षण नसतं; अधिर रंजन चौधरींची कपिल सिब्बल यांच्यावर टीका

adhir ranjan choudhary
adhir ranjan choudhary

कोलकाता : बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या निराश कामगिरीबाबत कपिल सिब्बल यांनी अलिकडेच एका मुलाखतीत करडे बोल ऐकवले होते. स्वत:च्याच पक्षातील आत्मपरिक्षणाबाबतच्या विदारक परिस्थितीबाबत त्यांनी निराशा व्यक्त केली होती. यावर आता काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी टीका केली आहे. स्वत: काहीच न करता नुसतंच बोलणं म्हणजे आत्मपरिक्षण नसतं, अशी परखड टीका चौधरी यांनी केली आहे. 

कपिल सिब्बल यांनी अलिकडेच काही विधाने केली आहेत. ते काँग्रेसबाबत फारच चिंतेत दिसतायत आणि आत्मपरिक्षणाची गरज व्यक्त करताहेत. पण बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश वा गुजरात निवडणुकीत कुठेही आम्ही त्यांचं तोंडदेखील पाहिलं नाहीये. अशी खोचक टीका अधीर रंजन चौधरी यांनी केलीय. 

हेही वाचा - जामिनावर बाहेर असलेल्याला मंत्रीपद? तेजस्वींनी केला नितीश कुमार यांच्यावर हल्लाबोल
पुढे त्यांनी म्हटलंय की, कपिल सिब्बल बिहार किंवा मध्य प्रदेशला गेलेले? जर ते गेले असते आणि काँग्रेसची स्थिती मजबूत केली असती तर ते जे बोलत आहेत ते बरोबर ठरलं असतं. नुसत्या बाता मारण्याने काहीही साध्य होणार नाहीये. काहीच न करता निव्वळ बोलण्याने आत्मपरिक्षण होत नाही, अशी टीका त्यांनी केली आहे. 

सिबल यांनी म्हटलं होतं की, काँग्रेसला अडचणीत आणणाऱ्या समस्या आणि त्यांची उत्तरे माहित आहेत पण काँग्रेसला ती उत्तरे शोधायच्या मार्गात येणाऱ्या अडचणींना ओळखायचेच नाहीये. आमच्यातील काहींनी आमचं म्हणणं ऐकून घेण्याऐवजी आमच्याकडे पाठ फिरवली. आणि आपण सगळे त्याचे परिणाम पाहतोय. फक्त बिहारमधीलच नव्हे तर देशातील लोक जिथे कुठे पोटनिवडणुका होतायत तिथे काँग्रेसला एक चांगला पर्याय म्हणून पाहत नाहीत. गुजरातच्या पोटनिवडणुकीत देखील काँग्रेसला पराभव बघायला लागला. तीन ठिकाणी उमदेवारांचे डिपॉझीट जप्त होण्याची वेळ आली. उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुकीतही असेच घडले. देशातील लोक आपल्याकडे सक्षम पर्याय म्हणून पाहतच नसल्याचे दिसून येतंय, असं त्यांनी म्हटलंय. 

याआधी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी कपिल सिब्बल यांच्यावर टीका केली  होती. त्यांनी म्हटलं होतं की, माजी केंद्रीय मंत्री असलेल्या व्यक्तीने पक्षाच्या अंतर्गत असलेल्या बाबींना असं मीडियामध्ये आणणे चुकीचे होते यामुळे त्यांनी देशभरातील कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या आहेत असे म्हणत त्यांनी सिब्बल यांना लक्ष्य केले होते.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com