बस अपहरण करणाऱ्या प्रदीप गुप्ताची पोलिसांसोबत चकमक

up bus hijack
up bus hijack

आग्रा - उत्तरप्रदेशात 34 प्रवाशांसह बस अपहरण नाट्यात आता नवी माहिती समोर येत आहे. बसचे अपहरण करणारा मुख्य सूत्रधार प्रदीप गुप्तासोबत गुरुवारी पोलिसांची चकमक झाली. गुरुवारी सकाळी झालेल्या या चकमकीत प्रदीप गुप्ताला गोळी लागली असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. फतेहाबाद भागात आल्यावर चेकींग सुरु असताना ही चकमक झाली. दुचाकीवरून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या प्रदीप गुप्ताला थांबवण्याचा प्रयत्न करत असताना त्याने पोलिसांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखाल पोलिसांनी गोळीबार केला. त्यामध्ये प्रदीप गुप्ता जखमी झाला. 

पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा इटावा इथल्या एका धाब्यावरून अपहरण करण्यात आलेली बस UP75 M 3516 ताब्यात घेतली होती. बुधवारी सकाळी बसचे 34 प्रवाशांसह अपहरण करण्यात आले होते. यानंतर मोठी खळबळ उडाली होती. तेव्हा सुरुवातीला फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी बस नेल्याचं म्हटलं जात होतं. मात्र नंतर काही वेगळीच माहिती समोर आली. 

बसच्या अपहरण प्रकरणाचा मुख्य सूत्रधार प्रदीप गुप्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पैशांच्या व्यवहारातून हा प्रकार घडल्याचं समोर आलं. बसचे मालक अशोक अरोरा आणि प्रदीप गुप्ता यांच्यात व्यवहारावरून वाद होता. यामुळेच बसचे अपहरण करताना फायनान्स कंपनीचे नाव घेण्यात आले होते. आग्र्याच्या एसएसपींनी फायनान्स कंपनीनेच अपहरण केलं असंही म्हटलं होतं. 

आरोपींनी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी फायनान्स कंपनीचे नाव गोवले. प्रदीपने आग्रा पोलिसांना सांगितलेल्या माहितीमुळे आग्रा पोलिस संभ्रमात पडले. दरम्यान, आदल्या दिवशीच बसचे मालक अशोक अरोरा यांचा मृत्यू झाला होता. त्यांचा मुलगा पवनने प्रदीप गुप्ताला ओळखल्यानंतर घटनेचा खरा उलगडा झाला. गुरुग्रामवरून निघालेली बस आग्र्यातून पळवून नेली होती. तेव्हा प्रवाशांना दुसऱ्या बसमधून झाशीला पाठवलं होतं. 

ग्वाल्हेरची बस UP 75 M 3516 गुरुग्रामवरून मध्यप्रदेशला निघाली होती. बसमध्ये 34 प्रवाशी, 2 कंडक्टर आणि ड्रायव्हर होते. ड्रायव्हर आणि कंडक्टरने पोलिसांना बसच्या अपहरणाची माहिती दिली होती. कारमधील तरुणांनी स्वत: फायनान्स कर्मचारी असल्याचं सांगत बस थांबवली आणि प्रवासांना घेऊन निघून गेले असं त्यांनी सांगितलं होतं. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com