मुघल म्युझियमला आता छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव; CM योगींनी केले नामकरण

सकाळ वृत्तसेवा
Monday, 14 September 2020

आपले नायक मुघल असू शकत नाहीत. शिवाजी महाराज आपले नायक आहेत असं योगी आदित्यनाथ म्हणाले.

लखनऊ - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आग्र्यातील मुघल म्युझियमचे नाव बदलून ते छत्रपती शिवाजी महाराज असं केलं आहे. सोमवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आग्र्यातील विकास कार्यांचा आढावा घेतला. त्यावेळी मुघल म्युझियमचे नाव बदलण्याची घोषणा त्यांनी केली. योगी आदित्यनाथ म्हणाले की, आग्र्यातील सध्या बांधकाम सुरु असलेलं मुघल म्युझियम यापुढे छत्रपती शिवाजी महाराज नावाने ओळखलं जाईल. 

नामकरण करताना योगी आदित्यनाथ म्हणाले की, उत्तर प्रदेश सरकार राष्ट्रवादी विचारांना पुढे नेणारी आहे. गुलामीची मानसिकता निर्माण करणाऱ्या गोष्टींना मागे टाकून राष्ट्राभिमान निर्माण कऱणाऱ्या गोष्टींना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. आपले नायक मुघल असू शकत नाहीत. शिवाजी महाराज आपले नायक आहेत असं योगी आदित्यनाथ म्हणाले. 

जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या ताजमहालाच्या पूर्वेकडील गेटवर मुघल म्युझियम तयार होत आहे. यामध्ये मुघलांच्या वैभवासह छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित काही वस्तू आणि महत्त्वाची कागदपत्रे असणार आहेत. याआधी लखनऊमध्ये पर्यटन सचिव जितेंद्र कुमार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली होती. यामध्ये आग्र्यातील म्युझियममध्ये छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या वस्तूंसाठी गॅलरी तयार करण्याचे आदेश पर्यटन अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

हे वाचा - 'कोरोनाच्या संकटात मोदींमुळे मोठा अनर्थ टळला'; आरोग्य मंत्र्यांची लोकसभेत माहिती

म्युझियममध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि आग्र्याशी संबंधित तसंच आग्र्याहून महाराज निसटल्याच्या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रांचा गॅलरीमध्ये समावेश असेल. या म्युझियममसाठी 140 कोटी रुपयांचा खर्च केला जात असून शिल्पग्रामजवळ हे म्युझियम उभारलं जात आहे. मुघलांच्या इतिहासाशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित इतिहासही याठिकाणी लोकांना समजावा याचाही प्रयत्न केला जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agra yogi adityanath change name mughal museum as chatrapati shivaji maharaj museum