निर्भयाला न्याय : चारही दोषींना अखेर फासावर लटकवलं!

Delhi-Nirbhaya_Case
Delhi-Nirbhaya_Case

Nirbhaya Case : नवी दिल्ली : संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या नवी दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही दोषींना अखेर फाशी देण्यात आली. याप्रकरणात एकूण सहा आरोपी दोषी ठरले होते. त्यातील एक अज्ञान होता. त्यामुळं त्याला सुधारगृहात ठेवून शिक्षा पूर्ण करावी लागली, तर प्रकरणातील मुख्य आरोपीने तिहार कारागृहात आत्महत्या केली होती.

उर्वरीत चार आरोपींना आज पहाटे साडे पाच वाजता तिहार कारागृहात फासावर लटकवण्यात आलं. गेल्या दोन महिन्यांत चारही आरोपींनी फाशी टाळण्यासाठी कायद्याच्या सर्व मार्गांचा अवलंब केला. परंतु, अखेर पीडित तरुणीला आठ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर न्याय मिळाला. 

काय घडलं होतं?

16 डिसेंबर 2012 रोजी नवी दिल्लीतील रस्त्यांवर चालत्या गाडीमध्ये एका तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. पॅरा मेडिकल क्षेत्रातील विद्यार्थी असलेली तरुणी आपल्या मित्रासोबत सिनेमा पाहून होस्टेलवर परतत असताना सहा नराधमांची तिच्यावर वाकडी नजर पडली होती. खासगी मिनी बसमधून लिफ्ट देण्याच्या बहाण्याने आरोपींनी संबंधित तरुणी आणि मित्राला गाडीत घेतलं होतं.

बसमध्ये इतरही काही प्रवासी होते. पण, ते उतरल्यानंतर दोषी आरोपींनी संबंधित तरुणीवर बलात्कार केला. तिच्या मित्राला जबर मारहाण करून फुटपाथवर फेकून दिलं. संबंधित तरुणीवर बलात्कार करून तिच्यावर शारिरीक अत्याचार करण्यात आले होते. बलात्कार करून त्या तरुणीला रस्त्यावर फेकून देण्यात आलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी देशभरात या घटनेचे पडसाद उमटले होते. दिल्लीतील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्चचिन्ह निर्माण झालं होतं. 

सहा आरोपींपैकी चौघांनाच फाशी 

या दोषींना फाशी सुप्रीम कोर्टानं चारही दोषी आरोपींना फासावर लटकवण्याचे आदेश दिले होते. त्यात मुकेश सिंह, अक्षय ठाकूर, विनय शर्मा, पवन गुप्ता यांचा समावेश होता. याप्रकरणातील मुख्य आरोपी आणि मिनी बसचा चालक आणि मालक राम सिंह याने तिहार कारागृहात आत्महत्या केली होती. त्यामुळं उर्वरीत अक्षय, विनय, पवन आणि मुकेश यांच्या विरोधात खटला चालला होता. त्यात हे चौघे आणि प्रकरणातील अल्पवयीन आरोपी दोषी आढळले होते. अल्पवयीन आरोपी विरोधात बालकांच्या विशेष न्यायालयात खटला चालला होता. कायद्यानुसार त्याला सुधारगृहात शिक्षा भोगावी लागली. ती शिक्षा पूर्ण केल्यानंतर त्याची मुक्तता करण्यात आली.

कायद्याच्या पळवाटा

गेल्या दोन महिन्यांत चारही आरोपींनी कायद्याच्या अनेक पळवाटा अवलंबून फाशी टाळण्याचा किंवा फाशीचं रुपांतर जन्मठेपेच्या शिक्षेत करण्याचा प्रयत्न केला. त्या प्रकारावर निर्भयाच्या आईने अनेकदा टीका केली होती. तसेच कायद्याच्या या पळवाटांमुळं निर्भयाला न्याय मिळणार की नाही, अशी शंका सर्वसामान्यांच्या मनात आली होती. पण, अखेर आज, या पळवाटा फुटकळ ठरल्या आणि त्यापुढं कायदाच श्रेष्ठ ठरला. दोषींना फाशीची शिक्षा मिळाल्यानंतर देशभरातून समाधान व्यक्त होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com