आघाडी सरकार स्थिरच; चुकीचे काम करणाऱ्यांवर कारवाई होणार

नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी नेते पी. सी. चाको यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी त्यांचे स्वागत करताना ‘राष्ट्रवादी’चे अध्यक्ष शरद पवार.
नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी नेते पी. सी. चाको यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी त्यांचे स्वागत करताना ‘राष्ट्रवादी’चे अध्यक्ष शरद पवार.

नवी दिल्ली - सचिन वाझे प्रकरण हाताळणीवरून ठाकरे सरकार अडचणीत आल्याची चर्चा असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी हे प्रकरण राज्य सरकारने चांगल्या प्रकारे हाताळले आहे, असे प्रशस्तीपत्र आज दिल्लीत दिले. एका पोलिस निरीक्षकाच्या कारवायांचा राज्य सरकारच्या स्थैर्यावर परिणाम होणार नसून या मुद्द्यावर महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणतेही मतभेद नाहीत, असा निर्वाळाही पवार यांनी दिला. 

अलिकडेच काँग्रेसला सोडचिठ्ठी देणारे केरळमधील नेते पी. सी. चाको यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी पत्रकारांशी बोलताना पवार यांनी  महाराष्ट्रातील घडामोडींसह राष्ट्रीय पातळीवर भाजपला पर्याय उभा करण्याच्या मुद्द्यावरही भाष्य केले. ते म्हणाले, की महाविकास आघाडीमध्ये वाझे प्रकरणावरून कोणतेही मतभेद नाहीत. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सर्व सहकारी पक्ष काम करतात आणि अडचणीच्या मुद्द्यांवर एकत्र बसून मार्ग काढतात, अशी टिपणी पवार यांनी केली. तसेच या घटनाक्रमामध्ये राज्य सरकारवर नाराज असल्याच्या बातम्याही पवार यांनी फेटाळल्या. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वाझे प्रकरणाचा सरकारच्या प्रतिष्ठेवर परिणाम झाल्याचेही पवार यांनी नाकारले. ‘‘एका पोलिस निरीक्षकाच्या कारवायांचा परिणाम संपूर्ण राज्य सरकारवर होईल यावर माझा विश्वास नाही. या  प्रकरणाची राष्ट्रीय तपास यंत्रणा चौकशी करत आहे. अधिकारांचा गैरवापर करणाऱ्यांची चौकशी राष्ट्रीय तपास यंत्रणेने करावी यावर महाविकास आघाडीमध्ये कोणतेही दुमत नाही,’ असेही त्यांनी स्पष्टीकरण दिले.  

स्वतंत्र पर्यायावर विचार
भाजपला पर्याय देण्यात काँग्रेस पक्ष समर्थ नसून पवार यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्या आघाडी सारखा स्वतंत्र पर्याय उभा करण्याची आवश्यकता आहे, असे मत पी. सी. चाको यांनी राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाच्या वेळी मांडले. यावर भाष्य करताना पवार यांनी काँग्रेसच्या असमर्थतेबदल बोलण्याचे टाळले. परंतु, भाजपला पर्याय देण्याबाबत अन्य पक्षांशी सातत्याने चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. सोबतच, तिसरी आघाडी किंवा अन्य पर्याय देण्याच्या निष्कर्षावर अद्याप पोहोचलेलो नाही, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. भाजप विरोधात व्यापक व्यासपीठाची नितांत गरज आहे, अशी समविचारी पक्षांकडून व्यक्त होत आहे. आजच माकप नेते सीताराम येचुरी यांनीही या भूमिकेचा पुनरुच्चार केला आहे. परंतु, यावर निर्णय झालेला नाही, असे पवार म्हणाले.  

दीदींच्या प्रचारासाठी जाणार
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या मदतीसाठी लोकशाहीवादी शक्तींनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. तसेच पुढील महिन्यात एक ते तीन एप्रिल या कालावधीत पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या प्रचारासाठी जाणार असल्याचेही पवार यांनी यावेळी सांगितले.

गृहमंत्र्यांवर कारवाई नाही
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी अलिकडेच झालेली बातचीत ही राष्ट्रीय आणि राज्याच्या प्रश्नांवर होती, असे सांगून शरद पवार यांनी अधिक भाष्य टाळले. तसेच गृहमंत्री अनिल देशमुखांवर कारवाईची शक्यताही पवार यांनी फेटाळली. हे संपूर्ण प्रकरण राज्य सरकारने चांगल्या प्रकारे हाताळले. म्हणूनच सारे काही उघडकीस आले. चुकीचे काम करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई होईल हे राज्य सरकारने दाखवून दिले आहे, असे प्रशस्तीपत्र पवारांनी दिले. मात्र, सचिन वाझे यांना अटक राष्ट्रीय तपास यंत्रणेने केली याकडे लक्ष वेधले असता, चौकशीला सुरवातच राज्य पोलिसांनी केली होती, असा दावा त्यांनी केला. मुंबई पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांच्यावरही कारवाई होणार काय या प्रश्नाच्या उत्तरादाखल पवार यांनी उद्धव ठाकरेंना विचारा, असा अंगुलीनिर्देश केला.

Edited By - Prashant Pati

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com