esakal | अमरिंदर सिंग अखेर नमले! सिद्धूंच्या पदग्रहण समारंभाला लावणार हजेरी
sakal

बोलून बातमी शोधा

Amarinder Singh and Sidhu

अमरिंदर सिंग अखेर नमले! सिद्धूंच्या पदग्रहण समारंभाला लावणार हजेरी

sakal_logo
By
अमित उजागरे

चंदीगड : पंजाब काँग्रेसमध्ये सध्या जो वाद सुरु आहे, तो आता संपताना दिसतो आहे. कारण पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी नवज्योत सिंग सिद्धू यांच्या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या पदग्रहण कार्यक्रमाला हजेरी लावण्यास तयार झाले आहेत. तसेच त्यांनी काँग्रेसच्या सर्व आमदार, खासदार आणि पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना शुक्रवारी सकाळी १० वाजता पंजाब भवनात चहापानाचं निमंत्रण दिलं आहे. पंजाबच्या मुख्यमंत्री कार्यालयानं ही माहिती दिली.

चंदीगड येथील पंजाब काँग्रेस भवनात पंजाब काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू यांच्या पदग्रहण समारंभाची जोरदार तयारी सुरु आहे. पंजाब काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष कुलजीत सिंह नागरा या कार्यक्रमाचं निमंत्रण घेऊन सिसवा येथे गेले होते. यानंतर मुख्यमंत्र्या माध्यम सल्लागारांकडून निवेदन जाहीर करण्यात आलं की, मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग हे पंजाब भवनातील कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. यासाठी चार कॅबिनेट मंत्री या कार्यक्रमाच्या तयारीत गुंतले आहेत. यावेळी सिद्धू आपल्या चार कार्यकारी अध्यक्षांसोबत पंजाब काँग्रेसचं अध्यक्षपद स्विकारणार आहेत.

हेही वाचा: पूरस्थितीमुळं कोकण रेल्वे विस्कळीत; ६,००० प्रवाशी अडकले!

पंजाबचे मंत्री सुखजिंदर सिंह रंधावा यांच्या नेतृत्वाखाली ही तयारी सुरु असून त्यांच्यासह तृप्त राजिंदर सिंह बाजवा, चरणजीत सिंह चन्नी आणि रजिया सुल्ताना हे तीन कॅबिनेट मंत्री मदत करत आहेत. नव्या पंजाब भवनात सिद्धू यांच्यासह संगत सिंह गिलजिया, सुखविंदर सिंग डॅनी, पवन गोयल आणि कुलजीत सिंह नागरा हे चार कार्यकारी अध्यक्ष पदग्रहण करणार आहेत.

कॅप्टन आमच्यासाठी पितृतुल्य - गुरजीत सिंह

काँग्रेसचे खासदार गुरजीत सिंह यांनी म्हटलं की, "पक्षाचे वरिष्ठ नेते आणि कार्यकर्ते पंजाब काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पदग्रहण समारंभात सहभागी होणार आहेत. कॅप्टन अमरिंदर सिंग आमच्यासाठी पितृतुल्य आहेत. अमरिंदर सिंग आणि नवज्योत सिंग सिद्धू हे मिळून २०२२ मध्ये पंजाबमध्ये सरकार स्थापन करतील."

loading image