पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे जंतर-मंतरवर धरणे; म्हणाले कृषी हा राज्याचा विषय

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 4 November 2020

आज पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी सुधारित कृषी कायद्यांविरोधात दिल्लीतील जंतर-मंतर मैदानात धरणे आंदोलन केले आहे.

नवी दिल्ली : आज पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी सुधारित कृषी कायद्यांविरोधात दिल्लीतील जंतर-मंतर मैदानात धरणे आंदोलन केले आहे. त्यांना या कायद्यांसंदर्भात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याशी भेटायचं होतं. मात्र, गेल्या मंगळवारी त्यांना राष्ट्रपतींशी भेटण्यासाठी वेळ दिली गेली नव्हती. त्यांनी म्हटलंय की, कृषी हा राज्यांचा विषय आहे. आम्ही आमच्या अधिकारांचा वापर करत नवे कायदे बनवले. मात्र, अद्याप हे कायदे राज्यपालांकडे प्रस्तावित आहेत. आम्ही त्यांना ही विधेयके 20 तारखेला राज्यपालांकडे पाठवली आहेत मात्र, त्यांनी ती राष्ट्रपतींकडे पाठवलीच नाहीयेत. मी राष्ट्रपतींना भेटून त्यांना पंजाबच्या या स्थितीबाबत अवगत करुन देणार होतो. मी आशा करतो की राष्ट्रपती या कायद्यांना स्विकारतील. असं या प्रसंगी अमरिंदर सिंह यांनी म्हटलं आहे. 

यावेळी अमरिंदर सिंह यांनी असंदेखील म्हटलं की, शांती राखणं ही माझी जबाबदारी आहे. आम्ही देशासाठी आपलं खुप सारं रक्त सांडलं आहे आणि पुढेदेखील ते देण्यास तयार आहोत. आम्हाला काही वाद नकोयत. पंजाबमध्ये शांततेने आंदोलने सुरु आहेत. त्यांनी म्हटलं की, आमची इच्छा होती की आम्ही गांधीजींच्या समाधी स्थळी जाऊन तिथेच धरणे धरावे मात्र कलम 144 सुरु असल्याने आम्ही इथे बसलो आहोत. 

हेही वाचा - 'बाबा का ढाबा'च्या बाबांवर यू-ट्यूबरचा मानहानीचा आरोप, 3.78 लाख रुपये दिल्याचा दावा
पंजाबची लोकसंख्या तीन कोटींहून अधिक आहे. देशाच्या सीमेवर चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर पंजाबचे सुपुत्र बसले आहेत. आम्ही कधीच राष्ट्रविरोधी वक्तव्य करत नाही. 40 टक्के धान्य आम्ही FCI ला देतो. ग्रीन रिव्हॉल्यूशनच्या आधीपासूनवच आमच्या इथे कुशलतेने काम करण्याची यंत्रणा होती. कोणत्याही मुलीचं लग्न असेल तर अर्ध्या रात्रीदेखील कधीही पैसे मिळायचे तर सांगा ही यंत्रणा आपण का नष्ट करत आहात? तुम्ही जर कॉर्पोरेट हाऊस घ्याल कर शेतकरी काय अर्ध्या रात्री आपल्या मुलीच्या लग्नसाठी पैसे मागू शकतील?

हेही वाचा - अर्णव अटक प्रकरण : 'हा तर लोकशाहीवरचा हल्ला'; अमित शहांनी केली आणीबाणीशी तुलना

अमरिंदर यांनी पुढे म्हटलं की, शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु झालं तेंव्हा आम्ही त्यांना समजावलं. दोन गोष्टींना कधीच छेडलं नाही पाहीजे. एक म्हणजे धर्माच्या विषयाला आणि दुसरं म्हणजे पोटाच्या विषयाला. आमच्या इथे ट्रेन बंद केल्या आहेत. मी रेल्वे मंत्र्यांना म्हटलं की रेल्वे आपण सुरु करा मी जबाबदारी घेतो. आमच्या इथे पॉवर  प्लांटमध्ये कोळसा संपला आहे. वीजेची अडचण आहे. ट्रेन नाही सुरु झाल्या तर कोळसा येणार नाही. बटाट्याच्या पिकासाठी खत नाहीये. रेल्वे नसल्याने आम्ही धान्याची वाहतुक कशी करायची? असाही प्रश्न त्यांनी मांडला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: amarinder singhs punjab cm protests at jantar mantar delhi on farm bills