ब्रिटनला कोविड-19 लस मिळाली, पण भारताला मिळणे कठीण; जाणून घ्या कारण

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 2 December 2020

फायझर बायोटेकच्या कोरोनावरील लशीला मंजुरी देणारा ब्रिटन पहिला देश ठरला आहे.

नवी दिल्ली- भारताला अमेरिकेची फार्मा कंपनी फायझरची (American pharma Pfizer) कोविड-19 लस मिळणे सध्यातरी अवघड वाटत आहे. ब्रिटेनने या कंपनीच्या लशीच्या वापराला पुढील आठवड्यापासून मंजूरी दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतात कोविड-19 लशीच्या परवानगीसाठी मंजुरी मिळण्यासाठी त्याचे क्लीनिकल ट्रायल (Clinical Trial) देशात होणे आवश्यक आहे. पण, फायझरने किंवा तिच्या सहयोगी कंपनीने भारतात या लशीचे परीक्षण केलेले नाही किंवा तसे करण्याचे कोणते संकेत दिलेले नाहीत. 

फायझरने जर भारतीय कंपनीसोबत करार केला, तरी देशात याची लस उपलब्ध होण्यासाठी खूप वेळ लागू शकतो. लशीचा वापर करण्यासाठी आधी या लशीचे मानवी परिक्षण होणे गरजेचं आहे. भारत सरकारने ऑगस्ट महिन्यात फायझरशी चर्चा केली होती, पण त्यानंतर चर्चा पुढे गेली नाही. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, भारत अन्य पाच लशींकडे लक्ष ठेवून आहे. यात ब्रिटिश कंपनी अॅस्ट्राझेनेका आणि ऑक्सफर्ड यूनिव्हर्सिटीच्या  (AstraZeneca and Oxford University ) लशीचाही समावेश आहे. याशिवाय सीरम इंन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या लशीकडूनही सरकारला अपेक्षा आहेत. 

कृषी कायदे रद्द करा, अन्यथा संपूर्ण दिल्ली ब्लॉक करु; शेतकरी आक्रमक

ब्रिटनमध्ये पुढील आठवड्यापासून मिळणार लस

कोरोना विषाणूविरोधातील युद्धात ब्रिटनने ऐतिहासिक घोषणा केली. फायझर बायोटेकच्या कोरोनावरील लशीला मंजुरी देणारा ब्रिटन पहिला देश ठरला आहे. पुढील आठवड्यात सामान्य लोकांना ही लस उपलब्ध करुन दिली जाईल. भारतासह 180 देशांत कोरोनावरील लशीची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. 

जगभरात कोरोनामुळे सुमारे 6.4 कोटींहून अधिक जण बाधित झाले आहेत. तर ब्रिटनमध्ये आतापर्यंत कोरोना विषाणूमुळे 16 लाखांहून अधिक जण बाधित झाले आहेत. याचदरम्यान ब्रिटनमध्ये आता सामान्य लोकांसाठी कोरोना विषाणूवरील लशीला मंजुरी मिळाली आहे. फायझर/बायोएनटेक कोरोना लशीला सामान्य लोकांना वापरण्यास परवानगी दिली आहे. आता लवकरच ब्रिटनमध्ये सामान्य लोकांना कोरोना लस दिली जाईल.  

योगींनी मुंबईत सर्वप्रथम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ठाकरेंना भेटायला हवे होते :...

ऑक्सफर्ड विद्यापीठाची लस

यापूर्वी ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ऍस्ट्राझेन्का लशीच्या चाचणीचे प्रमुख प्रो. एँड्यू पोलार्ड यांनी फायझरच्या लशीपेक्षा 10 पट स्वस्त असेल असा दावा केला होता. फायझरची लस -70 डिग्री सेल्सियस तापमानावर ठेवावी लागेल आणि काही आठवड्याच्या अंतरावर दोन इंजेक्शन द्यावे लागतील. ऑक्सफर्डची लस फ्रिजमधील तापमानावर ठेवता येईल. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: American pharma Pfizer corona vaccine india will not gate it soon