भारतीय लष्करप्रमुख पोहोचले होते चिनी सैन्याच्या छावणीजवळ; फोटो व्हायरल

टीम ई सकाळ
Thursday, 7 January 2021

लष्कर प्रमुख जनरल एम एम नरवणे यांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर दौरा केला होता. त्यावेळी जनरल नरवणे चिनी सैन्याच्या कँपपासून फक्त 200 मीटर अंतरावर होते.

नवी दिल्ली - संरक्षण मंत्रालयाच्या वार्षिक अहवालानंतर आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्याकडून नवीन संरक्षण कायदा जारी करण्यात आल्यानंतर एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. लष्कर प्रमुख जनरल एम एम नरवणे यांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर दौरा केला होता. त्यावेळी जनरल नरवणे चिनी सैन्याच्या कँपपासून फक्त 200 मीटर अंतरावर होते. त्यांनी चीनला लागून असलेल्या रेचिन ला दर्रे इथं भारतीय लष्कराच्या इन्फंट्री रेजिमेंटच्या तयारीसह आर्मर्ड ब्रिगेड आणि मॅकनाइज्ड इन्फंट्रीची तयारी पाहिली होती. 

लष्कराच्या मुख्यालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्करप्रमुखांनी ख्रिसमस आणि नववर्षानिमित्त जेव्हा लडाखला लागून असलेल्या एलएसीचा दौरा केला होता. तेव्हा त्यांनी रेचिन ला दर्रे इथंही भेट दिली जिथून चीन सैन्याची छावणी 200 मीटर अंतरावर आहे. तेव्हाचे काही फोटो लष्कराच्या मुख्यालयाकडून जारी करण्यात आले होते. त्यात जनरल नरवणे यांनी सैनिकांसोबत एक फोटो काढला होता. फोटोमध्ये बॅकग्राउंडला पर्वतावर भारतीय लष्कराचे कँप एका रेषेत दिसतील. 

हे वाचा - डोवाल यांच्या बचावात्मक आक्रमणापुढे काश्मीरमधील प्रमाणशून्य युद्धात पाकिस्तानचा पराभव झालाय!

लष्करप्रमुखांनी रेचिन ला आणि तारा पोस्टचा दौरा केला होता. चीनला लागून असलेल्या नियंत्रण रेषेवर भारतीय लष्कराने मोर्चाबंदी केली आहे. लष्कराने याभागात विशेष प्रकारचे खंदक तयार करून पहारा मजबूत केला. या तयारीचा आढावा घेण्यासाठी ते दौऱ्यावर गेले होते. 

कैलास रेंजच्या मुखपरी, मगर हिल, गुरंग हिल आणि रेचिन ला दर्रे सारख्या पर्वतांवर भारतीय लष्कराने 29-30 ऑगस्टच्या रात्री प्रीएम्प्टीव्ह ऑपरेशन करून ताबा मिळवला होता. त्यानंतर चीनच्या सैन्याचा जळफळाट झाला होता. 

हे वाचा - कोरोना लस पोहोचणार देशाच्या काना कोपऱ्यात; 8 जानेवारीपासून दुसरी ड्राय रन

भारतीय लष्कराच्या कारवाईनंतर चीनच्या सैन्याने उंच ठिकाणी भारताच्या जवानांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र भारताच्या लष्कराने चीनच्या पीएलएस लष्कराला इशारा देत गोळ्या घालायला मागेपुढे पाहणार नाही असा इशारा दिला होता. भारत आणि चीन यांच्यात गेल्या दोन महिन्यांपासून लष्करी पातळीवर कोणतीही चर्चा झालेली नाही. शेवटची बैठक 6 नोव्हेंबर 2020 ला झाली होती. राजनैतिक पातळीवर चर्चा मात्र झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: army-chief-general narwane-was 200-meters-away-from chinese cantonment