
भारतात सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक यांच्या व्हॅक्सिन आपत्कालीन परिस्थितीत वापरण्यासाठी डीजीसीआयने मंजुरी दिली आहे.
नवी दिल्ली - भारतात सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक यांच्या व्हॅक्सिन आपत्कालीन परिस्थितीत वापरण्यासाठी डीजीसीआयने मंजुरी दिली आहे. दरम्यान, केंद्र सरकार कोरोना लशीच्या लसीकरण मोहिमेची तयारी करत असून देशात अनेक भागात पहिली ड्राय रन पार पडली. यानंतर आता दुसऱ्या ड्राय रनची तयारी सुरु असून 8 जानेवारीला ती होणार आहे. यामध्ये व्हॅक्सिनचा वापर होत नाही. लसीकरणाच्या आधीची सर्व तयारी करण्यात येते.
लसीकरण मोहिम सुरू करण्याआधी त्यामध्ये काही अडथळे येतात का हे पाहण्यासाठी ड्राय रन घेतली जात आहे. यात लस ताब्यात घेण्यापासून, लसीकरण प्रक्रिया, भागात कोविनचा वापर, रिपोर्टिंग, समन्वय करणे, अडथळे असतील त्यांची माहिती घेणे आणि प्रत्यक्ष कामाबाबत मार्गदर्शन आणि सुधारणांची गरज असेल तर त्याची नोंद करणे याबाबत माहिती होईल. कोविन अॅपच्या माध्यमातून रिअल टाइम मॉनिटरिंगची चाचणीही होईल.
हे वाचा - PM मोदींच्या मतदारसंघातच 'ड्राय रन'ची पोलखोल; लसीकरणाच्या पूर्वतयारीचा फज्जा
ड्राय रन म्हणजे पूर्ण लसीकरण प्रक्रियेची रंगीत तालीम असेल. लसीकऱण मोहिमेत जे जे केलं जाईल ते सर्व यामध्ये होतं. यात फक्त व्हॅक्सिनचा वापर नसतो. डमी व्हॅक्सिन कोल्ड स्टोरेजमधून काढून ते लसीकरण केंद्रापर्यंत पोहोचवलं जातं. यात साइट आणि क्राउड मॅनेजमेंटची टेस्टही केली जाते.
हे वाचा - भारत बायोटेकला तिसऱ्या टप्प्यातील चाचणीआधीच सरकारने मंजुरी का दिली?
ड्राय रन झाल्यानंतर एक रिपोर्ट तयार करण्यात येईल. हा रिपोर्ट राज्य स्तरावर टास्क फोर्सला पाठवला जाईल. या रिपोर्टची समीक्षा केल्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला अहवाल पाठवण्यात येतो. यात सर्व काही ठरल्याप्रमाणे झाल्यास याच पद्धतीने लसीकरण मोहिम पार पाडली जाईल. अडथळे आल्यास ते दूर करून लसीकरण सुरळीत पार पडावे यासाठी आवश्यक ते बदल केले जातील.