मैत्रीत आला दुरावा; स्टोरी काँग्रेसच्या राहुल ब्रिगेडची!

टीम ई-सकाळ
रविवार, 2 ऑगस्ट 2020

पिढ्यांमधील फरक हे काँग्रेसचं महत्त्वाचं दुखणं म्हणता येईल. कारण याच कारणामुळे राहुल गांधींच्या यंग ब्रिगेडमधील अनेकजण पाय रोवू शकले नाहीत, तर काहीजणांनी बंड पुकारले.

आज 'फ्रेंडशिप डे' जगभरात साजरा होतोय, अनेकजण आपापल्या मित्र-मैत्रिणींना शुभेच्छा देत आहेत. अनेकांच्या मैत्रीचे किस्सेही सोशल मीडियात तसेच टेलिव्हिजनवर सांगितले जात आहेत. राजकीय वर्तुळातही असे अनेक मैत्रीचे किस्से प्रसिद्ध आहेत. मात्र, या मैत्रीच्या आड कधीकधी दुरावा येतो आणि आपण विचारही करू शकत नाही अशी परिस्थिती निर्माण होते. अशीच ही स्टोरी आहे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि त्यांच्या यंग ब्रिगेडची.

देशातील प्रमुख कुटुंबांपैकी एक असणाऱ्या गांधी घराण्याने देशाच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मात्र, २०१४च्या लोकसभा निवडणुकीनंतर गांधी कुटुंबीय आणि एकूणच काँग्रेस पक्ष बॅकफूटवर पडला. या पक्षाला उभारी देण्यासाठी पक्षाचं नेतृत्व राहुल गांधींकडे सोपवलं आणि त्यांनी तरुण आणि धडाडीच्या नेत्यांना पक्षाच्या धुरा सोपवल्या, पण राहुल गांधी यांचं नेतृत्व कमी पडत असल्याची चर्चा जोर धरू लागली. अनेक ज्येष्ठ नेते आणि तरुण नेत्यांमधील मतभेद समोर येऊ लागले. याचा प्रत्यय २०१९च्या लोकसभा निवडणुकांच्या निकालातून दिसून आला. काही ठिकाणी काँग्रेसला विजय मिळाला तर अनेक जाग्यांवर सपाटून मार खावा लागला. 

या निवडणुकांमध्ये राहुल गांधी यांच्या यंग ब्रिगेडने भरपूर काम केले. मात्र, त्यांना काही जागांवर यश मिळाले, तर काही जागी पराभव पत्करावा लागला. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली ज्या काही तरुण नेत्यांनी प्रामाणिकपणाने काम केले ते अंतर्गत राजकारण आणि गटबाजीचे बळी ठरले. त्यामुळे त्यांच्यात नाराजी पसरली. काहींनी बंड पुकारले तर काहींनी वेगळी वाट धरली. 

"राफेलमध्ये बेरोजगारी आणि आर्थिक संकट दूर करण्याची क्षमता आहे का?"​

मध्यप्रदेशमध्ये ज्योतिरादित्य सिंधिया आणि आता राजस्थानमध्ये सचिन पायलट यांनी बंडाचे निशाण उभारल्यानंतर काँग्रेस नेत्यांच्या नजरा राहुल गांधी यांच्या युवा ब्रिगेडवर खिळल्या आहेत. सिंधिया आणि पायलट पाठोपाठ आता कोणता युवा नेता काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार का? अशी भीती काहीजणांना वाटत आहे. 

जेव्हा राहुल गांधी यांच्याकडे पक्षाची धुरा सांभाळण्याची जबाबदारी सोपवली गेली, तेव्हा त्यांनी युवा नेत्यांकडे महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या. एकदा काँग्रेसच्या सर्वोच्च नीति निर्धारक समिती सीडब्ल्यूसीच्या सदस्याने म्हटले होते की, ज्यांच्याकडे कमी वेळातच काँग्रेसची जबाबदारी सोपवली गेली, ज्यांच्या प्रतिभेचा उपयोग पार्टी भविष्यातील रणनीती आखण्यासाठी करणार होती, तेच जर संतुष्ट नसतील, तर पक्षात नक्कीच काहीतरी चुकीचे घडत आहे, ज्यावर आताच विचार करणे गरजेचे बनले आहे.   

त्यानंतर सिंधिया आणि आता पायलट यांनी बंडखोरी केली. त्यामुळे आता कोण? हा प्रश्न अनेकांच्या मनात सुरू आहे. राहुल गांधींच्या यंग ब्रिगेडमधील नाराज नेत्यांमध्ये अशोक तंवर, पूर्व मुंबईचे प्रमुख मिलिंद देवरा आणि संजय निरुपम, मध्यप्रदेशचे अरुण यादव,  पंजाबचे प्रताप सिंह बाजवा, झारखंडचे अजॉय कुमार आणि कर्नाटकच्या दिनेश गुंडू राव यांचा समावेश आहे.  

यांच्याव्यतिरिक्त उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशचे महासचिव राहिलेले मधुसूदन मिस्त्री, मोहन प्रकाश, दीपक बाबरिया, उत्तर प्रदेशचे राज बब्बर, के. सी. वेणुगोपाल, राजस्थानचे प्रभारी महासचिव अविनाश पांडे हे देखील याच यादीत मोडत आहेत. 

डिप्लोमाच्या प्रवेशाला मुहूर्त सापडेना; वेळापत्रकाकडे लागले विद्यार्थ्यांचे लक्ष!

कमी वयात युवा काँग्रेसची धुरा सांभाळलेल्या आणि त्यानंतर हरियाणा काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवलेल्या अशोक तंवर यांचं म्हणणं आहे की, राहुल गांधींनी ज्यांच्यावर जबाबदारी सोपवली ते ती जबाबदारी योग्यरित्या पार पाडू शकले नाही, असे बोलण्याला काहीही अर्थ नाही. उदाहरण द्यायचं झालं तर पायलट यांचं देता येईल. राजस्थान विधानसभा निवडणुकांमध्ये पायलट यांच्यामुळेच काँग्रेसला १०० चा आकडा गाठता आला. हरियानातही युवा काँग्रेसमुळे ३० पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवला. युवा नेत्यांना पुरेपूर संधी मिळाली असती तर पार्टीची स्थिती वेगळी असली असती. 

पिढ्यांमधील फरक हे काँग्रेसचं महत्त्वाचं दुखणं म्हणता येईल. कारण याच कारणामुळे राहुल गांधींच्या यंग ब्रिगेडमधील अनेकजण पाय रोवू शकले नाहीत, तर काहीजणांनी बंड पुकारले. जुने मुरब्बी नेते आपली जागा सोडण्यास तयार नाहीत. आणि राहुल ब्रिगेडमधील नेते बदल होत नसल्याने आणि पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून उपेक्षितांसारखी वागणूक मिळत असल्याने बंडाचे निशाण उभारू लागले आहेत. 

ज्येष्ठ-युवा संघर्षाचा जुना इतिहास 
काँग्रेस नेते आणि माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी हे देखील ज्येष्ठ नेते आणि युवा नेते या संघर्षाचे बळी ठरले होते. तसेच ममता बॅनर्जी, वायएस जगन मोहन रेड्डी, हेमंत बिस्वा शर्मा, जतीन प्रसाद, दीपेंद्र सिंह हुड्डा, आरपीएन सिंह, संदीप दीक्षित आणि खुद्द राहुल गांधीही या संघर्षाचे शिकार झाले आहेत. 

काँग्रेसमधील अनेक ज्येष्ठ नेत्यांना राहुल गांधी यांच्याव्यतिरिक्त अन्य कोणत्याही दुसऱ्या युवा नेत्याचे नेतृत्व मान्य नाही. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा, गुलाम नबी आझाद, अहमद पटेल, मुकुल वासनिक, मल्लिकार्जुन खर्गे, सुशीलकुमार शिंदे या सर्व काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना काँग्रेस परिवारातील कोणतीही व्यक्ती अध्यक्षस्थानी हवी आहे. त्यामुळे या सर्वांचे पार्टीवर नियंत्रण राहील, असे त्यांना वाटते. तर दुसरीकडे यंग ब्रिगेडमधील अनेकांना या सर्व ज्येष्ठ नेत्यांकडून वारंवार डावलले जात असल्याने त्यांच्यातील नाराजी वाढत चालली आहे. राहुल गांधी या आपल्या यंग ब्रिगेडची नाराजी दूर करण्यात असमर्थ ठरत असल्याचे सध्याचे चित्र आहे. राहुल गांधी लवकरच पक्षातील हा ज्येष्ठ-युवा संघर्ष मिटवतील, असा काहीजणांना आशेचा किरण दिसत आहे. तर सिंधिया, पायलट यांच्यासारखे स्वाभिमानी युवा नेते आपली नाराजी उघड करण्यापासून स्वत:ला रोखू शकत नाहीत, हेही तितकंच खरं आहे. 

परीक्षा घेताना 'एमपीएससी'चीच लागणार कसोटी; उमेदवारांसाठी घेतला 'हा' निर्णय!​

राहुल गांधी यांच्या जवळच्या मित्रपरिवारात ज्योतिरादित्य सिंधिया आणि सचिन पायलट या नेत्यांना विशेष स्थान होते. मात्र, पक्षांतर्गत राजकारण, गटबाजी आणि ज्येष्ठ नेत्यांच्या दबावामुळे राहुल गांधी यांनी वेळीच पाठिंबा न दिल्याने सिंधिया आणि पायलट यांनी बंड पुकारले. मैत्रीत दुरावा आल्याने मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसला सत्ता गमवावी लागली, तर आता राजस्थानमध्ये राजकीय गोंधळ उडाला आहे.

काँग्रेसला येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये कमाल करून दाखवायची असेल, तर त्यांना या युवा नेत्यांची नाराजी नक्कीच दूर करावी लागणार आहे. तसेच दूरदृष्टीने विचार करत ज्येष्ठ नेत्यांनीही पक्षाची जबाबदारी युवा नेत्यांकडे सोपवली पाहिजे. तरच काँग्रेसला 'अच्छे दिन' येतील.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article about Congress leader Rahul Gandhi and Young Brigade