
इस्लाममधील 'हा' सर्वात वाईट गुन्हा; ओवैसींनी व्यक्त केला निषेध
हैद्राबाद : मागच्या आठवड्यात बुधवारी हैद्राबादमध्ये एका मुस्लीम मुलीच्या कुटुंबियाकडून तिच्या पतीची हत्या करण्यात आली होती. हिंदु मुलाने मुस्लीम मुलीशी लग्न केल्याच्या कारणावरुन नागराज नावाच्या तरुणाचा भर रस्त्यात खून करण्यात आला होता. त्यानंतर एमआयएमचे अध्यक्ष असुरुद्दीन ओवैसी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
हैद्राबादमध्ये एका हिंदू तरुणाने मुस्लीम मुलीशी लग्न केल्यामुळे तीच्या भावाने रागातून शहराच्या सरुरनगर भागात त्या तरुणाची हत्या केली होती. या लग्नाला मुलीच्या कुटुंबियाकडून विरोध असताना लग्न केल्यामुळे ही हत्या करण्यात आली असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान हैद्राबादचे खासदार ओवैसी यांनी आरोपींना अटक केली असून पोलिस तपास करत असल्याचं सांगितलं. "काही लोकांकडून याला धार्मिक रंग देण्याच्या प्रयत्न केला जातोय." असं त्यांनी बोलताना सांगितलं.
"हैद्राबादमध्ये झालेला नागराजचा खून हा इस्लामच्या विरोधात असून आतापर्यंत झालेली इस्लाम धर्मातील सर्वांत वाईट गुन्हेगारी घटना आहे." असं त्यांनी सांगितलं. "त्या मुलीने तीच्या स्वत:च्या मनाने हा निर्णय घेतला आहे आणि त्याला कायद्याचा आधार आहे. याप्रकरणी नागराजचा खून होणं ही वाईट घटना आहे. हा कायद्यानुसार गुन्हा असून इस्लाममधील सर्वांत वाईट गुन्हा आहे." असं ओवैसी बोलताना म्हणाले. दरम्यान याअगोदर काही माध्यमांनी त्यांना याबद्दल विचारले असता त्यांनी पंतप्रधान मोदींना असे प्रश्न का विचारत नाही असा प्रतिप्रश्न केला होता.
ही घटना बुधवारी सायंकाळी घडली असून त्यामध्ये मुलीचा भाऊ सय्य्द मोबीन अहमद आणि मोहम्मद मसूद अहमद या दोघांनी मिळून नागराजचा खून केला. डोक्यात लोखंडी रॉड घालून त्याला मारण्यात आलं. दरम्यान मुलीने त्यांना अडवायचा प्रयत्न केला पण तिलाही त्यांनी ढकलून दिलं होतं. त्यानंतर आोरपींनी अटक करण्यात आलं होतं.