भाजपला ओबीसींचा पक्ष बनवलं ते वसंतरावांच्या माधव पॅटर्नने... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vasantrao Bhagwat

भाजपला ओबीसींचा पक्ष बनवलं ते वसंतरावांच्या माधव पॅटर्नने...

सध्या राज्यात ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणावरुन गदारोळ चालूये. त्याच कारणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. सुप्रीम कोर्टाने आता या रखडलेल्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे राज्य सरकारची गोची झाली असून ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाशिवाय या निवडणुका घ्याव्या लागणार आहेत. त्यामुळे सध्या यावरुन राजकीय वातावरण पेटलंय. यासंदर्भात भाजपाच्या देवेंद्र फडणवीस यांनी आज ओबीसी मेळावा आयोजित केला होता. त्यामध्ये त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन महाविकासआघाडीला फटकारलं असून भाजप ही ओबीसीची पार्टी आहे असं म्हटलंय. पण शेठजी आणि भटजींचा पक्ष म्हणून ओळखल्या जाणारा भाजप हा ओबीसींचा पक्ष कसा आणि कुणी बनवला आपल्याला माहितीये का?

BJP

BJP

साल १९८० चा काळ. त्यासाली भाजपची स्थापना झाली. भाजपच्या स्थापनेच्या आधी जनसंघ नाव असलेला हा पक्ष फक्त ब्राम्हणांचा आणि उच्चवर्णीयांचा पक्ष म्हणून ओळखला जायचा. पण महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील राजकारणात पाय रोवायचा असेल तर आपल्याला फक्त एका समाजाला टार्गेट करून चालणार नाही हे भाजपला चांगलंच माहिती होतं. १९८० च्या दशकात मराठा समाजाला धरुन कॉंग्रेस पक्ष सत्तेत होताच त्यामुळे मराठा समाजाला टार्गेट करुन जास्त फायदा नव्हता हे त्यांना कळून चुकलं होतं. त्यामुळे त्यांनी एक रणनिती आखली आणि आपला मोर्चा बहुजन समाजाकडे वळवला. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात आपलं बीज रोवण्यासाठी भाजपाने सुरू केला 'माधव पॅटर्न...'

Atal Bihari Vajpayee

Atal Bihari Vajpayee

काय आहे माधव पॅटर्न?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वसंतराव भागवतांनी राज्यात 'माधन पॅटर्न' साठी पुढाकार घेतला आणि महाराष्ट्रातील बहुजन समाजातल्या वेगवेगळ्या नेत्यांना एकत्र करून आपल्या कामाला सुरुवात केली. ‘मा’ म्हणजे माळी, ‘ध’ म्हणजे धनगर आणि ‘व’ म्हणजे वंजारी या फॉर्म्युल्याने हा माधव पॅटर्न सुरू झाला आणि पुढे भाजप ओबीसींचा पक्ष म्हणून ओळखला जाऊ लागला. वंजारी समाजाचे गोपीनाथ मुंडे, धनगर समाजाचे अण्णा डांगे तर माळी समाजाचे ना. स. फरांदे हे नेतृत्व पुढं आलं आणि भाजपने या नेत्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या राजकारणात आपले बीजे पेरायला सुरूवात केली होती.

कोण आहेत वसंतराव भागवत?

भाजपला महाराष्ट्रात बीजे रोवण्यासाठी मोठा हात होता तो वसंतराव भागवतांचा. ते मूळचे रत्नागिरीचे. पुण्यात शिक्षणासाठी आले आणि त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रवेश करत ते संघाचं काम करु लागले. १९८० च्या दरम्यान भाजपची स्थापना झाली त्यावेळी महाराष्ट्रातील पक्ष संघटनेमधला सर्वात मोठा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले गेले आणि त्यांच्याकडे पक्षाची मोठी कामगिरी सोपवण्यात आली. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रात भाजपला पसरवण्यासाठी आपल्या भात्यातून ओबीसी नावाचा बाण काढला आणि बहुजन समाजाच्या वर्मी बसला. तेव्हापासून भाजप हा बहुजनांना देखील आपला पक्ष म्हणून ओळखला जाऊ लागला. भाजपला ओबीसींचा किंवा बहुजनांचा पक्ष करण्यासाठी माधवराव भागवतांचा मोठा वाटा होता.

Gopinath Munde, Fadanvavis And Khadse

Gopinath Munde, Fadanvavis And Khadse

माधव पॅटर्नने महाराष्ट्राच्या राजकारणात कसे पाय पसरले?

त्याचबोरबर भाजपचा संपूर्ण राज्यामध्ये प्रसार व्हावा, समाजातील सगळ्या घटकांपर्यंत हा पक्ष पोहचावा यासाठी वसंतराव भागवत यांनी राज्यभरातून दहा तरुण कार्यकर्ते निवडले होते. या सर्वांनी भागवतांपासून प्रेरणा घेऊन पक्षाचे पूर्ण वेळ काम करण्याचा निर्णय घेतला. या मुलांमध्ये प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, विश्वास गांगुर्डे, रो धरमचंद चोरडिया, प्रकाश जावडेकर, भाऊसाहेब फुंडकर, चिंतामण वनगा, अरुण अडसड यांचा समावेश होता. त्याचबरोबर मधू पवार, माधव भांडारी, रमेश मेढेकर यांनाही भागवतांचे मार्गदर्शन लाभले. या सर्वांनी राज्यामध्ये पक्षाचा प्रसार करण्यासाठी पूर्ण वेळ वाहून घेतले. या बहुजन समाजाच्या नेत्यांना धरून प्रमोद महाजनांसारख्या ब्राह्मण समाजाच्या नेत्याची सांगड घालत भाजपाने महाराष्ट्रात आपले साम्राज्य हळूहळू पसरवलं आणि शेठजी आणि भटजींचा पक्ष म्हणून ओळख असलेल्या भाजपला बहुजनांचा पक्ष म्हणून ओळख निर्माण झाली.

त्यानंतर भाजपने शिवसेनेसोबत युती करत निवडणुका लढवल्या आणि त्यांचे हे आघाडी सरकार १९९५ मध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रात सत्तेत आलं आणि भाजपला त्यावेळी उपमुख्यमंत्रीपद मिळालं. गोपीनाथ मुंडे हे भाजपकडून बहुजनांचा चेहरा म्हणून उपमुख्यमंत्रीपदासाठी देण्यात आला आणि लोकांच्या मनामध्ये परत एकदा भाजप हा बहुजन समाजाचा नवा चेहरा म्हणून उदयास आला. त्यादरम्यान प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांचं चांगलंच सूत जुळलं होतं. त्यानंतर धनगर समाजाच्या आण्णासाहेब डांगे आणि माळी समाजाच्या फरांदे यांना विधानसभेचं अध्यक्षपद देऊन राजकारणापासून पद्धतशीरपणे बाजूला सारण्यात आलं होतं. पण गोपीनाथ मुंडे हे पक्षातील आपली जागा टिकवण्यात यशस्वी झाले आणि महाजन-मुंडे यांच बहुजन-ब्राह्मण हे सूत जुळलं आणि भाजपची महाराष्ट्रातील सूत्रे या जोडीच्या हाती आली.

Gopinath Munde-Pramod Mahajan-Vilasrao Deshmukh

Gopinath Munde-Pramod Mahajan-Vilasrao Deshmukh

माधव पॅटर्न आणि आजचा भाजप...

२०१४ च्या विधानसभा निवडणुकानंतर गोपीनाथ मुंडे यांचं अपघाती निधन झालं आणि महाराष्ट्रातील जनतेने भाजपाचा बहुजन समाजाचा नेता गमावला. त्यानंतर भाजपमध्ये बऱ्याच घडामोडी घडल्या. गोपीनाथ मुंडे हे २०१४ ला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार असताना त्यांच्या निधनानंतर देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यात आलं आणि भाजपच्या माधव पॅटर्नचे सूत्रे फडणवीसांच्या हातात आली. त्यांच्या नेतृत्वाखाली आजही भाजप हा पक्ष माधव पॅटर्ननुसार चालतोय. मधल्या राजकीय उलथापालथीमध्ये पक्ष सत्तेतून गेला पण तरीही मुंडे महाजन यांनी दाखवून दिलेल्या वाटेवरच भाजप चालेल असं फडणवीस यांचं म्हणणं आहे. आजही भाजप ओबीसींचा पक्ष आहे हे त्यांनी ओबीसी मेळ्याव्यात बोलून दाखवलंय.