रामजन्मभूमीचा लढा हा विटा-मातीच्या इमारतीसाठीचा संघर्ष नव्हे!

आशुतोष अडोणी
Sunday, 10 November 2019

राम जीवनाचा परमोत्कर्ष, तर कृष्ण मुक्त जीवनाची सिद्धी आणि शिव ही असीमित व्यक्तिमत्त्वाची संपूर्णता आहे. म्हणूनच रामजन्मभूमीचा लढा हा विटा-मातीच्या इमारतीसाठीचा संघर्ष नाही. तो राष्ट्रीय अस्मितेचा, स्वाभिमानाचा विषय आहे.

शेकडो वर्षांपासून कोट्यवधी भारतीयांच्या मनात निनादणारा 'हम मंदिर नया बनाएँगे' हा संकल्प पूर्णत्वाला येण्याची प्रासादचिन्हे सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या ऐतिहासिक निर्णयानंतर राष्ट्रीय आसमंतात प्रगटली आहेत. आजचा निर्णय केवळ न्यायालयीन नाही, ते देशाच्या अंतरात्म्याचे प्रगटीकरण आहे. राष्ट्रचेतनेचे शुभंकर आहे. राम, कृष्ण, शिव ही हिंदुस्थानची महान व परिपूर्ण स्वप्ने आहेत. राम जीवनाचा परमोत्कर्ष, तर कृष्ण मुक्त जीवनाची सिद्धी आणि शिव ही असीमित व्यक्तिमत्त्वाची संपूर्णता आहे. म्हणूनच रामजन्मभूमीचा लढा हा विटा-मातीच्या इमारतीसाठीचा संघर्ष नाही.

देशातील प्रत्येक नागरिकाला जीवन कसं जगावं, आदर्श जीवनमूल्य म्हणजे काय, याचा वास्तूपाठ देणाऱ्या राष्ट्रीय आदर्शाच्या गौरवाचा तो विषय आहे. तो राष्ट्रीय अस्मितेचा, स्वाभिमानाचा विषय आहे. त्यावर घाला घालणाऱ्या परकीय आक्रमणाचा कलंक कायमचा पुसून टाकायचा की, षंढासारखा मिरवायचा, हा जळजळीत प्रश्न उपस्थित करणारा हा विषय आहे. 

- Ayodhya Verdict : अडवानी म्हणतात, 'मी देवाचे आभार मानतो'

मुळात प्रश्न मशीद वा मंदिराचा नाहीच. तो तसा रंगविण्याचा प्रयत्न केला तरी, कोणत्याही सच्च्या मुसलमानाने त्या स्थानाला कधीच मशीद मानले नाही. तसेही कुणा दुसऱ्याच्या जमिनीवर त्याच्या परवानगीशिवाय मशीद बांधण्यास पवित्र कुराणाने बंदीच घातली आहे. पवित्र हदीसमध्ये पैगंबर साहेबांनी दिलेल्या एका निकालाचा उल्लेख आहे. एका यहुदी प्रजाजनाची जागा बळकावून इस्लामी सरकारच्या अधिकाऱ्यांनी तेथे मशीद बांधली. पैगंबर साहेबांनी ती जागा त्याला परत करावी, असा निकाल दिला. त्याप्रमाणे त्याला ती परत करण्यात आली. 

श्री रामजन्मभूमीवरील आक्रमणाचा इतिहास तर इसवीसन पूर्व दुसऱ्या शतकातील ग्रीक सेनानी मिनांडरपासून सुरू होतो. सन 1528 मध्ये मुघल आक्रमक बाबर भारतावर चाल करून आला. त्याचा धर्मांध वरवंटा अयोध्येतील श्रीजन्मभूमीवर फिरला. इतिहासकार कनींघमने लिहून ठेवलंय की, बाबरचा सेनापती मीर बाकी याने श्रीराम जन्मभूमीवर तोफ गोळे डागून भारतीय अस्मितेचा मानभंग केला. सुमारे 15 दिवस सतत चाललेल्या या धुमाकुळाने 1 लाख 74 हजार हिंदू साधू, संत, बैरागी आणि सामान्य नागरिक यांची कत्तल अयोध्येत घडवली.

श्रीरामजन्मभूमीच्या विध्वंसानंतर मंदिराच्या मलब्यातील अवशेषांचा उपयोग करून त्याच जागेवर मीर बाकीने ढाचा निर्माण केला. त्याला जाणत्या धार्मिक मुस्लिम बांधवांनी मशीद म्हणून कधीच मान्यता दिली नाही. त्यामुळे खरेखुरे धार्मिक मुसलमान त्याठिकाणी कधीच नमाज पडायला गेले नाहीत. वस्तुस्थिती तर ही आहे, 1934 पासून तेथे नमाज अदा झालीच नाही. या ढाच्याला तो उभा करण्याऱ्या मीर बाकीनेही मशीद म्हटलेले नाही. त्याने तेथे जो शिलालेख प्रवेशद्वारी बसवला, त्यात फारसीमध्ये 'फरिश्‍तों के ठहरने का ठिकाना', असेच म्हटले होते. बाबरी मशीद या नावाची नोंद महसुली नोंदीतही नाही, नोंद आहे ती 'मस्जिद जन्मस्थान' या नावाची.

- Ayodhya Verdict : अयोध्या निकालानंतर मालेगावात काय प्रतिक्रिया?

भक्कम पुरावे 

श्रीरामजन्माचा आणि तो तिथेच जन्मला याचा पुरावा मागणाऱ्यांसाठी विश्व हिंदू परिषदेने 'एव्हिडन्स ऑफ दि राम जन्मभूमी मंदिर' असे पुस्तकच प्रसिद्ध केले आहे. त्यात 1. पौराणिक काळातील उल्लेख 2. हिंदूंच्या बाजूचा कागदोपत्री पुरावा 3. प्रत्यक्ष स्थळाविषयीचा पुरावा 4. मुस्लिम कागदपत्रांचा पुरावा 5. युरोपियन कागदोपत्री पुरावा 6. राजस्व नोंदीतील पुरावा 7. पुरातत्त्वीय पुरावा 8. इतिहासपूर्व काळातील पुरावा आणि 9. ऐतिहासिक पुरावा असे भक्कम पुरावे दिलेले आहेत. 

त्यातील केवळ मुस्लिम लेखकांच्या लेखनाचा आढावा घेतला तरी वस्तुस्थिती स्पष्ट होते. सतराव्या शतकापासून या पुढील काळाचा जो प्रादेशिक इतिहास उपलब्ध समकालीन सूत्रांप्रमाणे, मुस्लिम लेखकांनी लिहून ठेवलेला आहे, त्या सर्वांनी कोट रामचंद्र, परगणा हवेली, अवध येथील जन्मस्थानावरच्या दशरथ महल, राम मंदिर आणि सीता रसोई या सर्व वस्तू मीर बाकीने बाबराच्या हुकमावरून आणि सय्यद मुसा आशिकान या फकिराच्या प्रोत्साहनाने पाडल्या आणि तेथे 1528 मध्ये मशीद बांधली, याची निसंदिग्ध पुष्टी करणाऱ्या आहेत. यातील सर्वांत पहिले लेखन औरंगजेबच्या नातीचे आहे. 'सोफिया-ए-चहल-नसाइह-बहादुर शाही', असे त्या पुस्तकाचे नाव. 
सर्वांत महत्त्वाचे पुरावे पुरातत्त्वीय आहेत. 6 डिसेंबर रोजीच्या बाबरी ढाचा विध्वंसातून जो मलबा बाहेर आला, त्यात असलेल्या प्राचीन मंदिराचा जो शिलालेख गवसला, त्यामुळे तर मंदिर विरोधकांची बोलतीच बंद झाली.

या मुख्य शिलालेखाव्यतिरिक्त वनमाला धारण केलेली विष्णुमूर्ती, भैरव मूर्ती असे अनेक अवशेष हाती लागले. मुख्य शिलालेखाचे सरकारी परवानगीने वाचन करण्यात आल्यानंतर तर त्या स्थानी मंदिरच होते, यावर शिक्कामोर्तब झाले. सलक्षणाचा पुत्र अल्हण. त्याचा मुलगा नयचंद्राने अकराव्या शतकात पूर्वी कधी उभारले गेले नसेल, असे भव्य शोभिवंत आणि सुवर्ण शिखर असलेले विष्णू हरीचे मंदिर त्या ठिकाणी उभारले, असा स्पष्ट उल्लेख त्या शिलालेखात आहे. 

- Ayodhya Verdict : हिंदूंनी मशीद बांधण्यासाठी निधी द्यावा : रामदेव बाबा

पुढे लखनौ खंडपीठाच्या निर्देशानुसार फेब्रुवारी 2003 मध्ये ग्राउंड पेनट्रेटिंग रडार सर्व्हे म्हणजे भूगर्भात खोलवर जाणाऱ्या रडारमार्फत सर्वेक्षण झाले. ते टोजो इंटरनॅशनल संस्थेने केले. 12 मार्च ते 7 ऑगस्ट 2003 या काळातील या उत्खननाचा अहवाल अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठात सादर केल्यावर, त्यांनी 25 ऑगस्ट 2003 रोजी उघडून जाहीर केला. त्यात या वादग्रस्त ठिकाणी भव्य बांधकाम पूर्वी होते, यावरच शिक्कामोर्तब झाले. 

या सुस्पष्ट वास्तविकतेनंतरही रामजन्मभूमीचा विषय विवादित ठरवण्यात आला. कधी न्यायालयीन निर्णयाचा गुंता, तर कधी अल्पसंख्य समुदायाच्या अनुनयापोटी हिंदू जनभावना पायदळी तुडवण्याचा खेळ राजकारणी खेळले. या अन्यायाचा उद्रेकच 6 डिसेंबर 1992 रोजी झाला. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने या आंदोलनाच्या सैद्धांतिक भूमिकेवर एका अर्थाने शिक्कामोर्तब झाले आहे.

रामजन्मभूमी आंदोलन हा राष्ट्राचे आत्मतेज जागृत करणारा अभूतपूर्व महायज्ञ आहे. लाखो भारतीयांनी त्यात स्व जीवनाच्या समिधा अर्पण केल्यात. कारण, मर्यादा पुरुषोत्तम राम हे त्याचे आराध्य! आनंदाचे क्षण जास्त कसोटीचे असतात. तथापी, आदर्श, मर्यादा आणि विवेकाचा जागर मनामनात निरंतर जागविण्यासाठीच राममंदिर घडवायचे आहे, याचे भान मंदिर समर्थकांनी ठेवणे आवश्‍यक आहे.

सविस्तर लेखांसाठी क्लिक करा esakal.com डाऊनलोड करा 'सकाळ'चे मोबाईल अॅप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ashutosh Adoni write a article about Ram Janmbhoomi